मराठी अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण, गायिका अनुराधा पौडवाल यांच्या उपस्थितीत सादर केला गाण्याचा कार्यक्रम
By ऋचा वझे | Updated: November 2, 2025 16:23 IST2025-11-02T16:22:02+5:302025-11-02T16:23:01+5:30
गायिका अनुराधा पौडवाल यांना घरी आमंत्रण देऊन अभिनेत्रीने त्यांचं औक्षण केलं. त्यांचे आशीर्वाद घेतले.

मराठी अभिनेत्रीचं स्वप्न पूर्ण, गायिका अनुराधा पौडवाल यांच्या उपस्थितीत सादर केला गाण्याचा कार्यक्रम
'लग्नाची बेडी', 'अबोली' या मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री रसिका धामणकर यांचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. रसिका या अभिनयासोबतच संगीत क्षेत्रातही सक्रीय आहेत. त्या शास्त्रीय संगीत विशारद आहेत. त्यांची स्वत:ची म्युझिक अॅकॅडमीही आहे. लहानपणीपासून त्या दिग्गज गायिका अनुराधा पौडवाल यांच्या चाहत्या आहेत. काही दिवसांपूर्वीच रसिका धामणकर यांनी अनुराधा पौडवाल यांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यासाठी त्यांना घरी आमंत्रित केलं होतं. तो दिवस कधीही विसरता न येणारा आहे अशी प्रतिक्रिया रसिका यांनी दिली. नक्की काय म्हणाल्या वाचा.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत रसिका धामणकर म्हणाल्या, "मला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. मी नागपूरची आहे. शास्त्रीय संगीतात विशारद केलं आहे. वयाच्या ३५ व्या वर्षी मी अभिनय क्षेत्रात आले. गाणं थोडं मागे पडलं होतं. मी गाण्याचे कार्यक्रम तसे लहानपणापासून करत होते. मला आधीपासून सगळे असं म्हणायचे की माझा आवाज अनुराधा पौडवाल यांच्यासारखा आहे. नंतर मी त्यांची गाणी ऐकायला लागले आणि अगदी त्यांच्यासारखं गाण्याचा प्रयत्न करत होते. हळूहळू हे प्रेम भक्तीत कधी बदललं कळलंच नाही. त्या मला गुरुस्थानी आहेत. त्यांना भेटणं हे माझं स्वप्न होतं.
त्या पुढे म्हणाल्या, "२०२२ साली मी माझी म्युझिक अकादमी सुरु केली. देश विदेशातील अनेक विद्यार्थी माझ्याकडे शिकत आहेत. ऑक्टोबरमध्ये अनुराधा ताईंचा वाढदिवस असतो. तर मी काही वर्षांपासून दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम करते. मग इकडून तिकडून ओळख करुन माझा अनुराधा ताईंशी संपर्क झाला. मला त्यांना भेटायचं होतं. सुरुवातीला त्यांनी नकार दिला. कारण मी कोण आहे हे त्यांना माहित नव्हतं. नंतर त्यांना जेव्हा माझी माहिती मिळाली की मी अभिनेत्री आहे, अमुक मालिका केली आहे, तेव्हा त्या माझ्याशी बोलल्या. मी त्यांना गाण्याच्या कार्यक्रमाला आमंत्रित केलं होतं. त्यांनी आधी मला कार्यक्रमाची रुपरेषा विचारली. मी म्हणाले की मला तुमचं पाद्यपूजन करायचं आहे. तर त्या म्हणाल्या, हे काही नको तू मला गुरु मानतेस तेच खूप आहे. त्यांनी मला औक्षण करण्याची परवानगी दिली. त्या आपल्या कुटुंबासोबत घरी आल्या. माझ्या विद्यार्थ्यांसोबत मी कार्यक्रम सादर केला. मी अगदी भरुन पावले. त्यांनीही माझ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. खरंच त्या दिवशी माझं स्वप्नच पूर्ण झालं."
रसिका धामणकर यांना पार्श्वगायनही करायचं आहे. त्यांचा मधुर आवाज, उत्तम गायन याची इंडस्ट्रीलाही ओळख आहेच. आता फक्त त्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. यासोबत अभिनयही सुरु आहे. काही दिवसांपूर्वी त्या 'अबोली' मालिकेत दिसल्या. आता त्यांना सिनेमा, वेबसीरिजमध्येही काम करण्याची इच्छा आहे.