Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू

By देवेंद्र जाधव | Updated: May 1, 2025 12:49 IST2025-05-01T12:32:41+5:302025-05-01T12:49:12+5:30

Raid 2 Movie Review: अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला 'रेड २' सिनेमा आज रिलीज झाला आहे. सिनेमा पाहण्याच्या विचारात असाल तर त्याआधी हा रिव्ह्यू नक्की वाचा (raid 2)

Raid 2 review starring ajay devgn riteish deshmukh vaani kapoor amit siyal | Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू

Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू

Release Date: May 01,2025Language: हिंदी
Cast: अजय देवगण, वाणी कपूर, रितेश देशमुख, सौरभ शुक्ला, सुप्रिया पाठक, अमित सियाल, रितीका श्रोत्री
Producer: भूषण कुमारDirector: राज कुमार गुप्ता
Duration: २ तास २० मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

>> देवेंद्र जाधव

२०१८ साली आलेला 'रेड'चा पहिला भाग चांगलाच गाजला होता. त्याकाळात प्रमोशनचं इतकं स्तोम माजलं नव्हतं किंवा सोशल मीडियाचाही आधार नव्हता. तरीही माउथ पब्लिसिटीच्या जोरावर 'रेड' यशस्वी चित्रपटांमध्ये गणला गेला. आता तब्बल ७ वर्षांनी 'रेड'चा दुसरा भाग रिलीज झालाय. सध्या सुरु असलेल्या IPL च्या भाषेत बोलायचं तर, शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज असताना फलंदाज क्लीन बोल्ड होतो. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत रंगणारा क्रिकेटचा सामना बघून मनोरंजन होतं पण आवडती टीम हरली म्हणून मनात काहीसं वाईट वाटतं. अशीच भावना 'रेड २' पाहून मनात येते. 

कथानक

'रेड २'चं कथानक यावेळी भोज शहरात घडतं. अमेय पटनायकवर (अजय देवगण) लाच घेतल्याचा आरोप केला जातो त्यामुळे त्याची भोज शहरात बदली होते. भोज शहरात अमेय कुटुंबासोबत राहायला येतो तेव्हा रस्त्यावर त्याला मनोहर धनकर उर्फ दादाभाईचं मोठं पोस्टर असतं. भोज शहराच्या प्रत्येक दुकानात, घरात दादाभाईचा (रितेश देशमुख) फोटो असतो. साधं राहणीमान, आईची रोज पूजा करणारा, गरजू व्यक्तींसाठी फाऊंडेशन चालवणाऱ्या दादाभाईचा अमेयला संशय येतो. मग पुढे अमेय त्याच्या साथीदारांसह दादाभाईच्या घरावर छापा टाकतो. पहिल्या भागात जसा ताऊजी रेड करण्यात अमेयसमोर अडथळे निर्माण करतो त्याविरुद्ध दादाभाई अमेयला पूर्ण सहकार्य करतो. परंतु नंतर मात्र अमेय त्याच्या साथीदारांसह दादाभाईचा चांगुलपणाचा मुखवटा कसा उतरवतो? अमेयची रेड यशस्वी होतो का? याची उत्तरं तुम्हाला 'रेड २' पाहून मिळतील. 

लेखन-दिग्दर्शन

'रेड २'चं दिग्दर्शन पहिल्या भागाप्रमाणे राज कुमार गुप्ता यांनी केलंय. पहिल्या भागात प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या ज्या गोष्टी त्यांनी वापरल्या होत्या त्याच गोष्टी दुसऱ्या भागातही राज कुमार गुप्ता यांनी वापरल्या आहेत. परंतु यावेळी त्यांना लेखनाची हवी तशी साथ मिळाली नाहीये. अमेय पटनायक ही व्यक्तिरेखा पहिल्या भागासारखी इथेही त्याच तडफदार अंदाजात समोर येते. परंतु रितेश देशमुखने साकारलेल्या खलनायकी व्यक्तिरेखेला लिखाणाची साथ न मिळाल्याने ते कॅरेक्टर छाप पाडण्यात अपयशी ठरतं.

दादाभाई व्यक्तिरेखा सशक्त होण्यासाठी खूप गोष्टी करता आल्या असत्या. परंतु त्या वरवर राहतात, त्यामुळे खलनायक म्हणून दादाभाई हा अमेय पटनायकसमोर काहीसा कमकुवत वाटतो. पहिल्या भागात ताऊजी आणि अमेय यांच्यात जो शाब्दिक डाव रंगला होता, तो इथे खुलत नाही. याशिवाय 'रेड २'मध्ये येणारी गाणी कथानक पुढे घेऊन जाण्यास साथ देत असली तरीही मनोरंजनात ती बाधा आणतात. दिग्दर्शनात मात्र राज कुमार गुप्ता यांनी कमाल केली आहे. पहिल्या भागाप्रमाणे 'रेड २'सुद्धा पास्ट-प्रेझेंटमध्ये खेळत राहतो.

परंतु कथानक आणि विशेषतः सिनेमाचा शेवट अत्यंत सरधोपट केल्याने अपेक्षाभंग होतो. एकाक्षणी पुढे काय होईल, याचे प्रेक्षक म्हणून आपण मनात आडाखे बांधतो. आणि ते खरे ठरतात. 'रेड'च्या पहिल्या भागाप्रमाणे शॉकिंग क्षण असा कोणताही क्षण 'रेड २'मध्ये नाहीये. सिनेमाच्या स्टोरीवर आणखी काम केलं असतं, तर 'रेड २' नक्कीच एक संस्मरणीय सिनेमा ठरला असता. 


अभिनय

'रेड २' थोडाफार सुसह्य होतो तो कलाकारांच्या अभिनयामुळे. अजय देवगणने पुन्हा एकदा अमेय पटनायकच्या भूमिकेत चांगलं काम केलंय. विशेष गोष्ट म्हणजे, यावेळी अजय देवगणने स्टारडम बाजूला ठेऊन बॅकफूटवर राहून इतर कलाकारांना बॅटिंगची संधी दिली आहे. त्यामुळे नवखे कलाकारही अजय देवगणसोबत कोणतंही दडपण न घेता मस्त काम करतात हे जाणवतं.

दादाभाई मनोहर धनकरच्या भूमिकेत रितेशनेही उत्तम अभिनय केला आहे. कम्फर्ट झोनच्या बाहेर रितेशने व्यक्तिरेखा साकारली आहे. रितेश-अजय समोरासमोर येतात, तेव्हा त्यांच्यातील अभिनय जुगलबंदी बघायला छान वाटतं. परंतु मगाशी लिहिल्याप्रमाणे रितेशच्या व्यक्तिरेखेला लिखाणाची साथ न मिळाल्याने संपूर्ण सिनेमाभर दादाभाईचा तितकासा प्रभाव पडत नाही. 'रेड २'मध्ये खरी मजा आणलीये ती म्हणजे अमित सियाल यांनी. 'रेड'च्या पहिल्या भागात लल्लनच्या भूमिकेत दिसलेले अमित सियाल 'रेड २'मध्ये पुन्हा तीच भूमिका साकारुन मन जिंकतात. सौरभ शुक्ला, वाणी कपूर, सुप्रिया पाठक यांनीही त्यांच्या भूमिका उत्तम साकारल्या आहेत. छोट्याश्या भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री रितीका श्रोत्रीही लक्षात राहते. 

एकूणच 'रेड'चा पहिला भाग पाहून तुमच्या मनातल्या अपेक्षांची पूर्तता करण्यास 'रेड २' काहीसा कमी पडतो. कमकुवत कथानक असलं तरीही सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय सिनेमाला तारतो. त्यामुळे अजय देवगण-रितेश देशमुखचे चाहते असाल तर 'रेड २' एकदा नक्कीच बघू शकता. 

Web Title: Raid 2 review starring ajay devgn riteish deshmukh vaani kapoor amit siyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.