पंचमदांच्या आयुष्यातील माहितीचे पंचक

By Admin | Updated: June 27, 2016 13:47 IST2016-06-27T13:38:06+5:302016-06-27T13:47:39+5:30

एकीकडे तरल.. भावूक... संवेदनशील मनाचा मुक्त असा सांगीतिक आविष्कार; तर दुसरीकडे आरडीचं संगीत म्हणजे मदहोश करणारी जादू... चैतन्याचा झंझावात... उल्हास... जोश आणि जल्लोष..

Quintet of information about Panchamad's life | पंचमदांच्या आयुष्यातील माहितीचे पंचक

पंचमदांच्या आयुष्यातील माहितीचे पंचक

>पंचमदा ऊर्फ आर. डी. बर्मन यांच्या आयुष्यातील माहितीचे पंचक... एकीकडे तरल.. भावूक... संवेदनशील मनाचा मुक्त असा सांगीतिक आविष्कार; तर दुसरीकडे आरडीचं संगीत म्हणजे मदहोश करणारी जादू... चैतन्याचा झंझावात... उल्हास... जोश आणि जल्लोष...! राहुल देव बर्मन याचं मूळ आडनाव देवबर्मन.  पंचमच्या आई मीरादेवी या सुद्धा बंगालमधल्या एक संगीतकार. आणि सचिनदेव व मीरादेवी या सुरेल दांपत्याची सुंदर रचना म्हणजे राहुलदेव बर्मन... "वरमेको गुणी पुत्रो...‘ या पठडीतली...!आज या महान सुरांच्या जादुगाराची जयंती.........!!!!त्यांच्या स्मृतीला लक्ष लक्ष प्रणाम........!!!!!
पंचमवर लहानपणापासूनच सर्वसाधारण बंगाली घरात होतात तसे रवींद्र संगीताचे संस्कार होत होते. वयाच्या अकराव्या वर्षापासून तो माऊथ ऑर्गनवर सतत काही ना काही वाजवू लागला. त्याचं ते वाजवणं ऐकून एक दिवस दादामुनी म्हणजे अशोककुमार म्हणाले, ""अरे, ये तो पंचम सूर में बजाता है.‘‘ आणि मग दादा बर्मनांचा तो लाडका "तुबलू‘ पुढे "पंचम‘ या नावानंच ओळखला जाऊ लागला. निसर्गातल्या आविष्कारातील संगीत पंचम शोधू लागला. कडाडणारी वीज, वाऱ्याचा, लाटांचा आवाज.. रेल्वे इंजिनची शिटी.. गलबतांचे भोंगे... कुत्र्यांचं धापा टाकणं... आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वर... ताल... आणि लय शोधत पंचम मोठा झाला. सुरवातीला आपल्या वडिलांचा मुख्य सहायक म्हणून आणि नंतर स्वतंत्र संगीतकार आर. डी. बर्मन! उस्ताद अली अकबर खॉं यांच्याकडे आर. डीं.नी "सरोद‘वाजविण्याचे शिक्षण घेतले. आर. डीं.ना तबल्याचे भारी वेड. पंडित ब्रिजेन विश्‍वास यांच्याकडे ते तबला शिकण्यासाठी जात.
 
 
पंचमला स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिली संधी निर्माता, अभिनेता मेहमूद यांनी दिली. चित्रपट होता "छोटे नवाब.‘ आपल्या अंगी असलेल्या सर्व क्षमतांची सिद्धता आरडींनी या एकाच चित्रपटात वेगवेगळ्या अशा आठ गाण्यांच्या पॅकेजमध्ये दाखवून दिली आहे. मुंबई ते तळोजा या प्रवासात स्टेअरिंगवर बोटे वाजवता वाजवता कंपोज केलेलं "घर आजा घिर आये बदरा सावरीया..‘ हे लतादिदींचं मालगुंजी रागात बांधलेलं गाणं म्हणजे पहिलीच निर्मिती आणि तीच "मास्टर पीस‘ असं विशेषण मिळवून गेली. या गाण्यात तबल्याचा ठेका आणि सतार व सारंगीला असलेला घुंगरांचा समन्वय.. ऐकून वाटणारही नाही, की हा कुणी नवा संगीतकार आहे म्हणून; कारण अमर्याद प्रयोगशीलता, नैसर्गिक आवाजांचा समावेश आणि ह्रिदम सेक्‍शनमध्ये तालवाद्यांचा भरपूर पण सुसूत्र वापर यामुळे आरडींच्या रचना नित्यनवीन राहिल्या.
पंचमदांनी इंडस्ट्रीला बरीच वाद्यं दिली.. जसं स्पॅनिश गिटार, मादल, फ्लेंजर इत्यादी.बेस गिटार हे असंच त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं वाद्य. भारतात बेस गिटारचा वापर असलेलं पहिलं गाणं पंचमदांनी बनवलं. 1970 ची तरुण पिढी धुंदावून सोडलेलं ते गाणं होतं, "गुलाबी आँखें जो तेरी देखी‘ (दि ट्रेन). नेपाळी "मादल‘ हे असंच पंचमप्रिय वाद्य. ते प्रथम वापरलं त्यांनी आपल्या वडिलांच्या संगीत संयोजनाखाली म्हणजे "ज्वेलथीफ‘मधल्या "होटों पे ऐसी बात‘ या गाण्यात. या गाण्याचं संपूर्ण ऑर्केस्ट्रेशन पंचमचं........!!!!!!!!
पंचमदा यामध्ये दोन संगीतकार राहत असावेत असे मला नेहमीच वाटते.......!!!!!!अभिजात संगीताबरोबर नव्या तालावर त्यांही पावले नेहमीच थिरकली''.शोले''मधील ''मेहबूबा मेहबूबा ''चे संगीत करणाऱ्या पंचमदांनी ''तेरे बिन जिंदगीसे कोई शिकवा तो नही ''यासारखी उदास विराणी देखील दिली.''आज कल पाव जमीपर ''यासारखे नितांतसुंदर गीत लतादीदींकडून ''घर'' या सिनेमासाठी गावून घेतले.''चुरा लिया है तुमने''मध्ये काचेवर चमचा आपटून जो ताल त्यांनी धरला तो साऱ्या देशभर गाजला.''अमर प्रेम ''मधील ''रैना बीत जाये''हे शास्त्रीय संगीतावर आधारित सुंदर गाणे होते ,तर ''कारवा'' चित्रपटातील ''पिया तू अब तो आजा''हे कॅब्रे सोंग होते.तेथेही ''मोनिका ओ माय डार्लिंग ''म्हणून पंचम तार स्वरात ओरडला तोही एक क्रांतिकारक बदल होता.''दम मारो दम''या गीतात आशा ताई बेफाम गायल्या .जगामध्ये तेव्हा असलेल्या अस्थिर तरुणाईचे रूप त्यांनी आपल्या आवाजातून तर आर. डी. नी आपल्या चालीतून दाखविले.
कटी पतंग,कारवा,हरे राम हरे कृष्ण,अमर प्रेम,परिचय,मासूम,खुबसुरत,१९४२ अ लव स्टोरी ,आंधी ,खुशबू,असे कित्ती सुरेल चित्रपट आणि कित्ती सुरेख गीते......!!!!!त्यांच्या संगीत कारकिर्दीत ''इजाजत ''चित्रपटाचे नाव घेतले नाही तर ती अपुरी राहील.गुलझार ,पंचम आणि आशा ताई या त्रिवेणी संगमाने अनेक स्वर पुष्पे फुलविली आहेत.त्यांचा सुगंध अजूनही दरवळत आहे ....दरवळत राहील........!!!!!
केवळ गीतकारांच्या शब्दांना फुलविण्यातच आर. डीं.नी कधी समाधान मानलं नाही. चित्रपटांना, त्यातील प्रसंगांना अधिक परिणामकारक करणारे पार्श्‍वसंगीत देण्यात आर. डीं.चा हातखंडा होता. "शोले‘ जसा गाजला, तसेच त्याचे संगीतही. "शोले‘मध्ये बसंतीचा पाठलाग होत असताना वापरलेला तबला किंवा झोपाळ्याचा "तो‘ विशिष्ट आवाज आजही आपल्या सुन्न करतो. मजरुह, गुलजार या प्रतिभावान गीतकारांच्या अनेक मुक्तछंदात्मक कवितांना आर. डीं.नी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि श्रवणीय संगीताने यथोचित न्याय दिला. ही गाणी आजही अगदी ताजी वाटतात. ती सहज ओठांवर येतात. पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात.
पाश्‍चात्त्य शैलीचा संगीतकार म्हणून आर. डीं.चा उल्लेख अनेकदा केला जातो; मात्र पश्‍चिमात्य संगीत आणि पारंपरिक भारतीय संगीत यांचा सुवर्णमध्य गाठण्यात आर. डी. अनेकदा यशस्वी ठरले आहेत. त्याचप्रमाणे अस्सल भारतीय शास्त्रीय संगीताची बैठक असणारी अनेक गाणी देऊन आर. डीं.नी आपली संगीत प्रतिभा सिद्ध केली. काळाच्या पुढचे संगीत देण्यात हा संगीतकार नेहमीच यशस्वी ठरला, म्हणूनच आज रिमिक्‍स होणाऱ्या गाण्यांत सर्वात जास्त गाणी आहेत ती आर. डीं.चीच! 
कित्येक नवीन चित्रपट येतील, नवी गाणी येतील, नवीन स्वर येतील; पण "पंचम‘ स्वर कानी पडताच मनाला हुरहूर लागेल... आणि आठवतील ...आर. डीं.ची अविस्मरणीय गाणी.........!!!! या महान सृजनशील सरस्वतीच्या उपासकास लक्ष लक्ष प्रणाम........!!!!!!!!!!!
 
 
पंचमदांची दसनंबरी माहिती
 
१. त्यांचे वडील संगीतकार सचिनदेव बर्मन हे त्रिपुरा संस्थानचे प्रिन्स. हे संगीतकार पिता-पुत्र मूळ राजघराण्यातून आलेले.
२. पंचमच्या आई मीरादेवी या सुद्धा बंगालमधल्या एक संगीतकार.
३. वयाच्या अकराव्या वर्षापासून माऊथ ऑर्गनवर सतत काही ना काही वाजवू लागलेल्या आर.डींचे पंचम हे नामकरण अभिनेता अशोककुमार यांच्या "अरे, ये तो पंचम सूर में बजाता है.‘ या वाक्यातून झाले.
४.उस्ताद अली अकबर खाँ यांच्याकडे आर. डीं.नी "सरोद‘वाजविण्याचे शिक्षण घेतले.
५.  तबल्याचे भारी वेड असलेले आर. डी. पंडित ब्रिजेन विश्वास यांच्याकडे तबला शिकण्यासाठी जात.
६. पंचमदांना स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिली संधी निर्माता, अभिनेता मेहमूद यांनी छोटे नवाब या सिनेमात दिली. त्यात आठ गाणी होती.
७. सगळ्यात आधी आर.डीं.कडे आशा भोसले नव्हे, तर लता दीदी गायल्या.
८. पंचमदांनी इंडस्ट्रीला बरीच वाद्यं दिली. बेस गिटार हे असंच त्यांनी इंट्रोड्यूस केलेलं वाद्य. भारतात बेस गिटारचा वापर असलेलं पहिलं गाणं गुलाबी आँखे जो तेरी देखी...हे त्यांनीच बनवलं.
९.'चुरा लिया है तुमने''मध्ये काचेवर चमचा आपटून जो ताल त्यांनी धरला तो देशभर गाजला.
 
 
आर. डी. बर्मन यांची टॉप टेन गाणी 
 
 
आर. डी बर्मन यांच्या गाण्यांनी सत्तर-ऐंशीच्या दशकात प्रेक्षकांना वेड लावले होते. त्यांच्या काही गाण्यांनी रसिकांना ताल धरायला लावला तर काही गाण्यांनी अंतर्मुख केले. आज इतकी वर्षं होऊनही त्यांची गाणी ताजी वाटतात. आजच्या तरुण पिढीलाही त्यांची गाणी प्रचंड आवडतात. त्यांची टॉप टेन गाणी...
- दम मारो दम
- पिया तू अब तू आजा...
- मेहबूबा मेहबूबा...
- जिंदगी के सफर में गुजर जाते है...
- तेरे बिना जिंदगी से कोई
- बाहो में चले आओ
- मेरा कुछ सामान आपके पास...
- कुछ ना कहो...
- मुसाफिर हूँ यारों... ना घर है ना ठिकाना...
- तुझसे नाराज नही जिंदगी

Web Title: Quintet of information about Panchamad's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.