"मला मुंबई अमेरिकेपेक्षा मोठी वाटते..." प्रियदर्शन जाधव यांनी व्यक्त केलं मुंबईबद्दल प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 12:51 IST2025-07-02T12:51:11+5:302025-07-02T12:51:36+5:30
अभिनेते प्रियदर्शन जाधव यांनी मुंबई ही त्यांना अमेरिकेपेक्षा मोठी वाटते असं म्हटलंय.

"मला मुंबई अमेरिकेपेक्षा मोठी वाटते..." प्रियदर्शन जाधव यांनी व्यक्त केलं मुंबईबद्दल प्रेम
Priyadarshan Jadhav On Mumbai Vs America: "मुंबई" म्हटलं की की नजरेसमोर लोकलच्या गर्दीत धडपडणारे लोक, समुद्रावर बसलेली शांत मनं, चकचकीत इमारती येतात. मुंबई हे स्वप्नं दाखवतं, पण त्यासाठी कठोर परीक्षा पण घेतं. इथं कुणालाच काही सहज मिळत नाही. या मुंबापुरीनं आजवर अनेकांना पोसलं आहे. त्यांच्या आयुष्याचा अवघा प्रवास उघड्या डोळ्यांनी बघितला आहे. कायम उत्साहाने ओतप्रोत वाहणाऱ्या या शहराला कोणी भारताचं 'न्यूयॉर्क' म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नुकतंच अभिनेते प्रियदर्शन जाधव यांनी मुंबई ही त्यांना अमेरिकेपेक्षा मोठी वाटते असं म्हटलंय.
प्रियदर्शन जाधव यांनी अलिकडेच आरपार युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मुंबईबद्दलचं प्रेम व्यक्त केलं. ते म्हणाले, "माझ्यासाठी मुंबई ही अमेरिकेपेक्षा मोठी आहे. म्हणजे एखाद्या माणसाला काही कारणास्तव भारतातून अमेरिकेत जायची संधी मिळाली. तर तिकडे गेल्यावर ती भव्य दिव्यता बघितल्यावर काय वाटतं, तसं मला आजही मुंबईबद्दल वाटतं. मला सुरुवातीला हे झेपलचं नाही की पलीकडच्या बाजूला तीन रस्ते असतात आणि ह्याही बाजूला तिन रस्ते असतात. एवढा मोठा रस्ता, एवढ्या मोठ्या इमारती, एवढा मोठा रस्ता आणि एवढी माणसं... मला आताही शब्द सुचत नाही", असं त्यांनी म्हटलं.
स्वतःच्या प्रवासाविषयी सांगताना ते म्हणाले, "मी मुंबईच्या पुर्णपणे प्रेमात आहे. मला वाटतं जगाच्या कोपऱ्यात असं कोणतं शहर नसावं. एकदम भारी शहर आहे. लोक मुंबईला बकाल, गचाळ, काय गर्दी असं म्हणतात. पण तो वेग, तिथली माणसं... आतापर्यंत खुप लोकांनी मुंबईबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक बोललं आहे. पण, मुंबईत काहीतरी गमंत अशी आहे की तुमची पराकोटीची परीक्षा बघतं, बाहेरून आलेल्या माणसाना ते सहजासहजी आत घेत नाही आणि ती परीक्षा भयंकर असते. म्हणजे मी मुंबईत २२ भाड्याच्या घरात राहिल्यानंतर २३ व्या घरात राहायला आलोय", या शब्दात त्यांनी मुंबईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
प्रियदर्शन जाधव यांनी व्यक्त केलेल्या या भावना केवळ कलाकारापुरत्या मर्यादित नाही, तर त्या प्रत्येकासाठी आहे, जो या शहरात स्वतःचं स्थान शोधतोय. प्रियदर्शन जाधव यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांची विनोदी भूमिकांपासून ते गंभीर व्यक्तिरेखांपर्यंतची अभिनयक्षमता सर्वांनाच माहिती आहे. अलिकडेच ते 'ऑल इज वेल' चित्रपटात पाहायला मिळाले. गेल्या २७ जूनला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
प्रियदर्शन यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर, काही सिनेमांचं दिग्दर्शन सुद्धा केला आहे.