भारतीय संस्कृतीचा अभिमान : विन डिझेल
By Admin | Updated: January 16, 2017 02:51 IST2017-01-16T02:51:28+5:302017-01-16T02:51:28+5:30
हॉलिवूड अभिनेता विन डिझेलने भारतामध्ये आल्यानंतर आपल्याला अभिमान वाटल्याची भावना व्यक्त केली

भारतीय संस्कृतीचा अभिमान : विन डिझेल
- जान्हवी सामंत
हॉलिवूड अभिनेता विन डिझेल हा ‘ट्रिपल एक्स: दि रिटर्न आॅफ झेंडर केज’च्या प्रमोशनसाठी आला असताना ‘सीएनएक्स मस्ती’च्या संपादक जान्हवी सामंत यांच्याशी त्याने भारतामध्ये मिळालेले प्रेम, त्याला भावलेले आदरातिथ्य आणि या चित्रपटाविषयी गप्पा मारल्या. भारतामध्ये आल्यानंतर आपल्याला अभिमान वाटल्याची भावना विनने व्यक्त केली. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनेही या चित्रपटाविषयीचे तिचे मत व्यक्त केले.
भारतामध्ये आल्यानंतर तुला कोणते अनुभव आले?
विन - अविश्वसनीय. निव्वळ अविश्वसनीय. माझ्यावर जो प्रेमाचा प्रचंड वर्षाव झाला, त्यामुळे मी भारावून गेलो आहे. ज्याक्षणी मी विमानातून बाहेर आलो, त्या क्षणापासून मी इथल्या लोकांची संस्कृती पाहतो आहे. मी ज्यावेळी येत होतो, दीपिका माझ्याशेजारीच होती. त्याक्षणीच मला वाटले, मी इतक्या उशिरा का आलो? दीपिकाने मला प्रीमिअरवेळी बोलावण्याचे ठरविले होते, त्यानुसार मी इथे आलो. इथल्या अनेक चाहत्यांनी दिलेल्या प्रेमामुळे मी भावविभोर झालो आहे. माझ्याकडे शब्दच नाहीत.
इथे आल्यानंतर तुला पहिल्यांदा काय वाटले?
विन - इथली संस्कृती महान आहे. या संस्कृतीचा मला अभिमान वाटतो. ज्यावेळी आपण घरापासून इतक्या दूरवर आलेलो असतो, त्यावेळी मनात धाकधूक असते. हा चित्रपट करताना सोपे नव्हते. यासाठी मला खूप काही प्रवास करावा लागला. न्यूयॉर्क शहरापासून ते इथपर्यंत. परंतु या ठिकाणचे आदरातिथ्य अगदी वेगळे होते, त्यामुळे मला अगदी घरातच असल्यासारखे वाटते आहे.
तू हिंदीतून काय सांगशील?
विन - नमस्ते, शुक्रिया!
दीपिका, तू ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये एका खेडवळ मुलीची भूमिका बजावलीय. तिथून ‘ट्रिपल एक्स’पर्यंतचा हा प्रवास कसा होता?
दीपिका-‘ओम शांती ओम’ हा माझा पहिला चित्रपट. मी चित्रपटाचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नव्हते. मला थिएटर, अभिनयदेखील माहिती नव्हता. मी प्रत्येक गोष्ट शिकत गेले. काय चूक आणि काय बरोबर, याचा मला अनुभव आला. हे अगदी अविश्वसनीय होते. हा एकंदरित प्रवास खूप काही शिकण्यासारखा राहिला. ‘ट्रिपल एक्स’मुळे मला खूप मोठा जागतिक प्रेक्षकवर्ग मिळाला. हा एक फरक जाणवतो. कलात्मकता, उत्सुकता हे सारे मार्गदर्शक होते. बाकी इतर चित्रपट करताना जसे होते, तसेच‘ट्रिपल एक्स’संदर्भात सांगता येईल.
तू मराठी चित्रपटात येऊ इच्छिते?
दीपिका: का नाही? मराठी चित्रपट खूप जबरदस्त आहेत. मराठी चित्रपट चांगल्या पद्धतीने तयार होतात.