Vaishali Takkar: वैशालीला इंटिमेट फोटो लीक करण्याची वारंवार धमकी देत होता राहुल, सेटवर रडायची अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 13:38 IST2022-10-27T13:32:44+5:302022-10-27T13:38:43+5:30

Vaishali Takkar : अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने १५ ऑक्टोबरच्या रात्री इंदौर येथील राहत्या घरी आत्महत्या केली.

अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Takkar) हिने करिअर आणि लग्नाची किती स्वप्ने विणली होती ते माहीत नाही. मात्र एका व्यक्तीने वैशाली ठक्करचे आयुष्य उद्ध्वस्त केले. १५ ऑक्टोबरच्या रात्री वैशाली ठक्करने इंदौर येथील राहत्या घरी आत्महत्या केली.

सुसाईड नोटमध्ये वैशाली ठक्करने शेजारी राहणाऱ्या राहुल नवलानीवर आरोप केला आहे. राहुल आता पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, वैशालीचा मित्र आणि को-स्टार निशांत सिंग मलकानी याने खुलासा केला आहे की, राहुल वैशालीला तिचे इंटिमेट फोटो लीक करण्याची धमकी देत ​​होता.निशांत मलकानीने एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती.

निशांत आणि वैशाली टक्कर यांनी 'रक्षा बंधन' या टीव्ही शोमध्ये एकत्र काम केले होते. शोमध्ये एकत्र काम करताना निशांत मलकानी आणि वैशाली चांगले मित्र बनले होते. निशांतच्या म्हणण्यानुसार, वैशाली ठक्कर त्याच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करत होती.

निशांत मलकानीने सांगितले की, राहुल काही कारणास्तव वैशालीशी लग्न करू शकला नाही. त्याने दुसरीकडे लग्न केले. मात्र लग्न झाल्यावर वैशाली ठक्करला आणखी त्रास देण्यास सुरुवात केली.

निशांतच्या म्हणण्यानुसार, राहुल नवलानीने वैशाली आणि तिच्या फियॉन्सेला टेक्स्ट मेसेजद्वारे त्रास देण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर त्याने वैशालीला धमकी दिली होती की तो त्याच्यासोबतचे तिचे इंटिमेट फोटो तिच्या फियॉन्सेला पाठवेल.

त्यामुळे वैशाली ठक्कर खूप दडपणाखाली राहत होती आणि तिला नैराश्यही आले होते. निशांत मलकानीच्या म्हणण्यानुसार, वैशालीने एकदा मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेतली होती. निशांतच्या म्हणण्यानुसार, राहुल स्वतः विवाहित असून आणि दोन मुले असूनही वैशालीला पुढे जाऊ देत नव्हता.

निशांत मलकानीच्या म्हणण्यानुसार, राहुल आणि वैशाली ठक्कर यांच्यातील संबंध खूप विषारी होते. तो म्हणाला, 'हे खूप विषारी नाते होते. वैशाली अनेकदा सेटवर यायची आणि खूप रडायची. काहीवेळा ती खूप तणावाखाली असायची ज्यामुळे ती अभिनयदेखील करू शकत नव्हती. मी तिला या सगळ्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा सल्ला देत असे.

त्याचवेळी राहुल नवलानीच्या पोलीस कोठडीत मध्य प्रदेशातील न्यायालयाने आणखी ४ दिवसांची वाढ केली आहे. वैशाली ठक्कर हिच्या आत्महत्येच्या दिवसापासून राहुल नवलानी पत्नीसह फरार होता.

राहुलला इंदौर पोलिसांनी १९ ऑक्टोबर रोजी अटक केली होती, तर त्याची पत्नी अद्याप फरार आहे. राहुलला पकडण्यासाठी पोलिसांनी लुकआउट परिपत्रक जारी केले होते.

पोलिसांची तीन पथके तयार करून महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन वेगवेगळ्या राज्यात पाठवण्यात आली. राहुलच्या नावावर पाच हजारांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते.