struggle story: चाळ ते हिरानंदानीमधील फ्लॅट; एकेकाळी ठाण्यातील वर्तक नगरमध्ये रहायचा मकरंद अनासपुरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 10:12 AM2023-10-02T10:12:49+5:302023-10-02T10:26:57+5:30

Makarand anaspure: ठाण्यातील वर्तकनगरमध्ये गेलंय मकरंद अनासपुरेचं आयुष्य; आज राहतोय हिरानंदानीच्या फ्लॅटमध्ये

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे. कधी विनोदी, तर कधी गंभीर भूमिका साकारुन त्याने प्रेक्षकांची मन जिंकली.

आज मराठी कलाविश्वात मकरंद अनासपुरे याचं नाव मानाने घेतलं जातं. परंतु, ही प्रसिद्धी, यश मिळवणं वाटतं तितकं त्याच्यासाठी सोपं नव्हतं.

मकरंद अनासपुरेने त्याच्या आयुष्यात बराच मोठा स्ट्रगल केला आहे. त्यानंतर त्याने कलाविश्वात त्याच हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

मकरंद अनासपुरे याचं सगळं बालपण एका चाळीत गेलं. विशेष म्हणजे अथक प्रयत्न, मेहनत यांच्या जोरावर मकरंद याने चाळ ते हिरानंदानी येथील फ्लॅट असा प्रवास केला.

मकरंद अनासपुरे याला कलाविश्वात बरीच वर्ष झाली आहेत. मात्र, इंडस्ट्रीमध्ये तब्बल १२ वर्ष काम केल्यानंतर त्याला लीड रोल करायची संधी मिळाली.

'कायद्याचं बोला' या सिनेमात मकरंदने पहिल्यांदा मुख्य नायकाची भूमिका साकारली. याविषयी त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं. सोबतच त्याची स्ट्रगल स्टोरीही सांगितली.

"मी मूळचा छत्रपती संभाजीनगर येथला. पण, सुट्टी, सणवार यांच्या निमित्ताने मी काही काळ बीडला काकांकडे राहिलो. याच काळात कलाक्षेत्रात यायचं ठरवलं आणि मुंबई काढली. माझ्यासाठी मुंबई नवीन, त्यात कलाक्षेत्रात प्रवेश मिळवणं सारं काही कठीण होतं माझ्यासाठी. १९९४ मध्ये मुंबईत आल्यानंतर तब्बल १२ वर्षांनी मला नायक म्हणून कायद्याचं बोला हा पहिला सिनेमा मिळाला", असं मकरंद म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "मुंबईत आल्यावर सुरुवातीला काही काळ मी आमदार निवासात राहिलो. त्यानंतर घाटकोपरला मित्राकडे, मग कन्नमवार नगरला बहिणीकडे असं करत १९९९ मध्ये मी ठाण्यात वर्तक नगरला एका चाळीत राहायला आलो. त्यानंतर २००० मध्ये शिल्पा विचारेशी लग्न केलं. तिनेही मला खूप साथ दिली. मालाडची असलेल्या शिल्पाला सुरुवातीला ठाण्यात रुळायला वेळ लागला."

"माझं जाऊबाई जोरात हे नाटक छान सुरु होतं. पण, रात्रीचे प्रयोग संपवून घरी यायला मध्यरात्री व्हायची. यात बऱ्याचदा स्टेशनवर इतक्या लांब घरी जायला रिक्षा मिळायच्या नाहीत. त्यामुळे मग आम्ही मुंबईत शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. तीन वर्ष मुंबईत राहिलो. त्यानंतर २००९ मध्ये कावेसरला आलो आणि गेल्या ११ वर्षांपासून आम्ही हिरानंदानी इस्टेटमध्ये स्थिरावलो आहोत."