Flashback 2025 : अर्ध्यावरती डाव मोडला! २०२५ मध्ये विभक्त झाल्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'या' लोकप्रिय जोड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 15:44 IST2025-12-23T15:38:00+5:302025-12-23T15:44:41+5:30
Flashback 2025 : २०२५ हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी जितकं व्यावसायिक यशाचं ठरलं, तितकंच ते काही कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत राहिलं.

२०२५ हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी जितकं व्यावसायिक यशाचं ठरलं, तितकंच ते काही कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत राहिलं. या वर्षी मराठी इंडस्ट्रीतील काही लोकप्रिय जोड्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. यात राहुल देशपांडे, योगिता चव्हाणसह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.

प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि त्याची पत्नी नेहा देशपांडे यांनी लग्नाच्या १७ वर्षांनंतर घटस्फोट घेतला. काही दिवसांपूर्वी राहुल देशपांडेने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, दोघांनीही अत्यंत समंजसपणे आणि परस्पर संमतीने आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे.

१७ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास थांबवताना दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल कोणताही आदर कमी झालेला नसल्याचं सांगितलं. मुलगी रेणुकाच्या हिताचा दोघेही विचार करत आहेत. तिचे संगोपन आणि भविष्यासाठी दोघेही कटिबद्ध असून, आई-वडील म्हणून आपली जबाबदारी ते एकत्रितपणे पार पाडणार आहेत.

'जीव माझा गुंतला' या मालिकेतून 'अंतरा-मल्हार' म्हणून घराघरांत पोहोचलेली योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांची जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आली होती. ३ मार्च २०२४ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र, लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांच्या नात्यात मिठाचा खडा पडला.

योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले या दोघांनीही सोशल मीडियावरून एकमेकांचे फोटो हटवले असून एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे. अद्याप दोघांनीही घटस्फोटावर अधिकृत भाष्य केले नसले तरी, त्यांच्यातील दुरावा आता लपून राहिलेला नाही.

अभिनेत्री अक्षया गुरव आणि भूषण वाणी यांच्या नात्यातही दुरावा आल्याचं समजतं आहे. २३ मे २०१७ रोजी लग्न केल्यानंतर त्या दोघांच्या आठ वर्षांच्या संसारात कटुता आली.

अक्षया आणि भूषण यांनीही एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो करत लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले आहेत. एका मित्राच्या माध्यमातून सुरू झालेली ही लव्हस्टोरी अशा प्रकारे संपुष्टात येईल, अशी कल्पना त्यांच्या चाहत्यांनीही केली नव्हती.

'संगीत देवभाबळी' या सुप्रसिद्ध नाटकात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक २०२० मध्ये कोरोनाकाळात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकले. पण पाच वर्षांच्या सुखी संसारानंतर आता २०२५मध्ये त्यांनी घटस्फोटाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

घटस्फोटानंतर अवघ्या काही महिन्यांतच शुभांगी सदावर्तेने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. आनंद ओक यांच्यासोबतच्या घटस्फोटानंतर शुभांगी आता 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेचा निर्माता सुमित म्हशीलकरसोबत विवाहबंधनात अडकली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील 'पॉवर कपल' म्हणून ओळखले जाणारे सुयश टिळक आणि आयुषी भावे यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी २०२५ मध्ये सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली होती. सुयश आणि आयुषी २१ ऑक्टोबर २०२१ रोजी विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या तीन-साडेतीन वर्षांनंतर त्यांच्यात वैयक्तिक मतभेद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

दोघांनीही अद्याप माध्यमांसमोर येऊन अधिकृतपणे घटस्फोटाची घोषणा केलेली नाही, परंतु त्यांच्या सोशल मीडियावरील हालचाली बरंच काही सांगून जातात.

















