"'ॲनिमल'च्या यशाने रातोरात बदललं तृप्तीचं नशीब; आधी लोक चहा विचारत नव्हते अन् आता..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 10:43 AM2024-07-11T10:43:51+5:302024-07-11T10:57:34+5:30

Siddhant Chaturvedi And Tripti Dimri : सिद्धांतने 'ॲनिमल'च्या यशानंतर तृप्तीसोबत लोकांच्या वागण्यात कसा बदल झाला ते सांगितलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या चर्चेत आहे. गेल्या वर्षी रणबीर कपूरसोबत 'ॲनिमल' या चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळवलेल्या तृप्तीची आता विकी कौशलसोबत जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

'बॅड न्यूज' या चित्रपटातील 'जानम' हे नवीन गाणे रिलीज झाले आहे, ज्यामध्ये विकी कौशलसोबत तृप्ती धमाल करत आहे. 'बॅड न्यूज' नंतर, तृप्ती करण जोहरच्या 'धडक 2' चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे, जी एक लव्हस्टोरी आहे.

तृप्तीचा 'धडक 2' कोस्टार सिद्धांतने सांगितलं की, 'ॲनिमल' रिलीज झाला तेव्हा ते दोघेही त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगवरून शो पाहण्यासाठी गेले होते. सिद्धांतने 'ॲनिमल'च्या यशानंतर तृप्तीसोबत लोकांच्या वागण्यात कसा बदल झाला ते सांगितलं आहे.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धांत म्हणाला, आम्ही डिसेंबरमध्ये शूटिंग करत होतो आणि मध्येच ॲनिमल आला होता, आम्ही फर्स्ट डे, लास्ट शो बघायला गेलो होतो. आम्ही शूटवरून येत होतो आणि तिच्यासोबतबसून 'ॲनिमल' पाहत होतो. काय झाले ते आम्हाला कळलं नाही.

सिद्धांतने सांगितलं की, तो तृप्तीला खूप आधीपासून ओळखतो. हे दोघेही २०१८ मध्ये आलेल्या 'लैला मजनू' चित्रपटात एकत्र काम करणार होते. या चित्रपटासाठी सिद्धांतला शॉर्टलिस्ट करण्यात आले होते, पण नंतर ही भूमिका अविनाश तिवारीकडे गेली.

आमचं एकत्र काम करायचं राहून गेलं. अखेर आता हा चित्रपट आम्ही एकत्र केला आहे. हा एक रोमँटीक चित्रपट आहे त्यामुळे मला कोणताही पश्चाताप नाही असं सिद्धांतने म्हटलं आहे.

सिद्धांतने सांगितलं की, ॲनिमल'च्या प्रचंड यशानंतर तृप्तीसोबतच्या लोकांच्या वागण्यात बदल झाला. सेटवर लोकांचा जो प्रतिसाद होता तो कमाल होता. मी समोरच लोकांचं वागणं कसं बदललं हे पाहिलं आहे.

तृप्ती रोज चहा मागायची पण कोणीच तिचं ऐकायचं नाही. पण लोक आता स्वत:हून येऊन विचारतात, कोणता चहा हवा आहे... मसाला चहा, ग्रीन टी की आणखी काही? असं सिद्धांतने सांगितलं.

'ॲनिमल'ने तृप्ती डिमरीला रातोरात इतकं यश मिळवून दिले की, ती देशभरातील प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली. या चित्रपटानंतर तिला नॅशनल क्रश म्हटलं जाऊ लागलं.

'नॅशनल क्रश' वर तुझी क्रश नव्हती का? असा प्रश्न सिद्धांतला विचारला यावर त्याने ती खूप गोड आहे, खूप चांगली व्यक्ती आहे. पण माझा एक नियम आहे की, मी मन लावून काम करतो. मी ज्या लोकांसोबत काम करतो त्यांच्यात माझं मन अडकवून ठेवत नाही असं उत्तर दिलं आहे.

तृप्तीसोबतच्या 'धडक 2' या चित्रपटाबाबत सिद्धांत म्हणाला, मला खूप मजा आली. आणखी एक धर्मा फिल्म माझ्या खात्यावर आली आहे. मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट स्क्रिप्टपैकी ही एक आहे.

शाझिया इक्बाल (दिग्दर्शिका) सोबतचा अनुभव आमच्यासाठी कमाल होता. हे पात्र मी साकारलेल्या सर्वात कठीण पात्रांपैकी हे एक आहे. मला वाटतं की ही एक वेगळी राईड आहे, ज्या पद्धतीने त्यांनी या प्रोजेक्टवर विश्वास दाखवला आहे, ज्या पद्धतीने चित्रीकरण केले आहे ते कमाल असल्याचं सिद्धांतने सांगितलं.