'फक्त अभिनेत्रींचंच वय का विचारता?' रवीना टंडन भडकली, म्हणाली, "उर्मिला, माधुरी अन् मला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 03:04 PM2024-01-18T15:04:00+5:302024-01-18T15:10:21+5:30

रवीना टंडनने उचलला फिल्म इंडस्ट्रीतील महत्वाचा मुद्दा, शिल्पा, माधुरी यांचं नाव घेत म्हणाली...

बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्न, मुलांच्या जन्मानंतर पुन्हा फिल्मइंडस्ट्रीत कमबॅक केलं. काही अभिनेत्रींचं नशीब फळफळलं तर काहींना मात्र म्हणावं तसं यश मिळालं नाही. मात्र आता ओटीटी माध्यम आले असल्याने अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

काजोल, रवीना टंडन, करिना कपूर खान, माधुरी दीक्षितसोबतच अनेक अभिनेत्री पुन्हा आजही फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहेत. मात्र जेव्हा वयाचा मुद्दा येतो तेव्हा अभिनेत्रींनाच त्यांचं वय विचारलं जातं यावर अभिनेत्री रवीना टंडनने संताप व्यक्त केला आहे.

नुकतंच रवीनाने एका मुलाखतीत इंडस्ट्रीतील अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. वयाबाबतीत फक्त अभिनेत्रींनाच प्रश्न विचारले जातात अभिनेत्यांना नाही असं ती म्हणाली. तसंच ९० च्या काळात सहकलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सर्वकाही माहित असायचं. त्यामुळे त्यांच्याशी असलेली मैत्री आजही तशीच आहे असं तिने सांगितलं.

रवीना टंडन सध्या चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे ती अक्षय कुमारच्या 'वेलकम टू जंगल' मध्ये दिसणार आहे. अनेक वर्षांनंतर आपापसातील रुसवेफुगवे विसरुन दोघंही स्क्रीन शेअर करणार आहेत. याशिवाय रवीना ओटीटीवरही पदार्पण करत आहे. तिची 'कर्मा कॉलिंग' सीरिज लवकरच प्रदर्शित होत आहे.

रवीना म्हणाली,'आता वेळ आली आहे की आपण जेंडरवर मोकळेपणाने बोलावं आणि त्यावर उपायही काढावा. तसंच वयाबाबतीत जी चर्चा होत असते मला ते फार विचित्र वाटतं. माध्यमांमध्ये तर अगदीच चढवून बोललं जातं. इंडस्ट्रीतही बंद दरवाज्यांमागे यावर चर्चा होत असेल.'

'मला तर वयाबाबतीतील तुलनाच आवडत नाही. मला फार खटकतं जेव्हा अभिनेत्यांना कोणीही त्यांचं वय विचारत नाही. पण अभिनेत्रींना आवर्जुन विचारलं जातं. उर्मिला, माधुरी आणि मला सतत वय विचारलं जातं. आम्ही वय लपवत आहोत असं मुळीच नाही त्यामुळे आम्हाला फरक पडत नाही. मला एवढंच वाटतं की तुम्ही माझ्यापासून माझं टॅलेंट हिरावून घेऊ शकत नाही.'

90 च्या दशकाबद्दल सांगताना रवीना म्हणते,'त्या काळात फोन, सोशल मीडिया आणि लग्झरी व्हॅन्स नव्हते. आता जसा शॉट संपतो लोक आपापल्या मोबाईलमध्ये घुसतात किंवा व्हॅनमध्ये जातात. आमच्याकडे त्याकाळी एकमेकांसोबत बसून गप्पा मारण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. मग ते आम्ही वाळवंटात असू किंवा जंगलाच्या मधोमध असू. सगळे सोबत बसायचे.'

तेव्हा आम्हाला सगळं माहित असायचं. कोणत्या हिरोसोबत आम्ही काम करत आहोत, कोणाचं कोणाशी अफेअर आहे, कोणी पत्नीकडून मार खाल्ला असं सगळंच. आमच्यातील तो बाँड अजूनही तसाच आहे.'

प्रतिस्पर्धी अभिनेत्रींविषयी रवीना म्हणाली,'आम्ही कायम एकमेकांना पाठिंबा दिला आहे. मग माधुरी, नीलम, सोनाली किंवा शिल्पा आम्ही एकमेकींसोबत प्रोजेक्ट्स शेअर करायचो. पण आजच्या अभिनेत्रींमध्ये तो बाँड दिसून येत नाही.'