एकेकाळी मुंबईच्या स्टेशनवर कोथिंबीर विकली, आता झाला सुपरस्टार; आहे कोट्यवधींचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 03:28 PM2024-02-19T15:28:53+5:302024-02-19T15:43:51+5:30

एकेकाळी मुंबईच्या स्टेशनवर कोथिंबीर विकायचा तो आता कोट्यवधींचा मालक झाला आहे.

फिल्म इंडस्ट्रीतील यशाचा प्रवास हा बहुतांशी संघर्ष आणि कठोर परिश्रमातूनच समोर येतो. अनेकांनी शुन्यापासून सुरुवात केली आहे. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. एकेकाळी मुंबईच्या स्टेशनवर कोथिंबीर विकायचा तो आता कोट्यवधींचा मालक झाला आहे.

हा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. ज्याने वर्षानुवर्षे स्टॅगल केला, धक्के सहन केले, भूक, तहान आणि गरिबीमध्ये जगला आणि चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप संघर्ष केला.

जेव्हा नवाजुद्दीनला संधी मिळाली तेव्हा त्याने स्वत:ला सिद्ध केलं आणि आज तो इंडस्ट्रीतील टॉप कलाकारांमध्ये गणला जातो. अभिनेत्याच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक किस्से जाणून घेऊया...

कपिल शर्मा शोमध्ये आपल्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने आपल्या संघर्षाचे दिवस आठवताना अनेक रंजक किस्से सांगितले होते. आर्थिक परिस्थिती बिकट असताना त्याला कोथिंबीरही विकावी लागली होती.

शो दरम्यान नवाजुद्दीनने सांगितलं की, त्यावेळी त्याला छोट्या-छोट्या भूमिका मिळायच्या आणि पैसेही मिळत नसायचे. अशा परिस्थितीत एका मित्राने मला शंभर पैकी दोनशे रुपये करायचे आहेत का, असे विचारलं, मी लगेच त्याला पद्धत विचारली.

हा किस्सा पुढे नेत नवाजुद्दीनने सांगितलं की, "आम्ही दोघे दादरच्या भाजी मार्केटमध्ये पोहोचलो आणि तेथून माझ्या मित्राने दोनशे रुपये किमतीची कोथिंबीर खरेदी केली आणि आम्ही त्याच्या जुड्या बनवल्या आणि नंतर दहा रुपये असं ओरडत कोथिंबीर विकायला सुरुवात केली."

"काही वेळातच कोथिंबीर काळी पडू लागली. आम्ही दोघे भाजी विक्रेत्याकडे परत गेलो आणि त्याचं कारण विचारलं असता त्याने सांगितलं की तुम्ही पाणी टाकलं होतं का? आम्ही हे विसरलो आणि मग तोटा सहन करत घराकडे पायी निघालो."

नवाजुद्दीन सिद्दीकीने महत्त्वाच्या ब्रेकसाठी बराच काळ संघर्ष केला. आज त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याची गणना बॉलिवूडमधील अव्वल कलाकारांमध्येच होते. नवाजुद्दीन आता कोट्यवधींच्या संपत्तीचा मालकही आहे.