हीट स्ट्रोकपासून ते सर्जरी, आतापर्यंत किती वेळा किंग खानला झालाय हेल्थ प्रॉब्लम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 11:59 AM2024-05-23T11:59:50+5:302024-05-23T12:35:00+5:30

Shah Rukh Khan Injured : अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) काल तब्येत बिघडल्याने त्याला अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयपीएल प्ले ऑफ (IPL) सामन्यानंतर तो अॅडमिट झाला. शाहरुखला उष्माघाताचा फटका बसल्याने डिहायड्रेशन झाले आणि त्याची तब्येत बिघडली. आता त्याची प्रकृती स्थिर आहे.

शाहरुख खान आजारी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांत शाहरुखला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे कधी-कधी शस्त्रक्रियाही करावी लागली. मात्र, प्रत्येक वेळी किंग खानने तंदुरुस्त होऊन शानदार पुनरागमन केलं आहे.

शाहरुख खानला पहिली मोठी दुखापत ही यश चोप्रा यांच्या 'डर' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. एक जंपिंग सीन करताना त्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी त्याच्या तीन बरगड्या तुटल्या होत्या, तसेच डाव्या पायाच्या घोट्यालाही दुखापत झाली होती.

1993 मध्ये एका ॲक्शन सीक्वेन्सदरम्यान शाहरुखच्या उजव्या पायाच्या बोटाला दुखापत झाली होती. शाहरुखने जेव्हा 'माय नेम इज खान' या चित्रपटाचे शूटिंग सुरू केलं, तेव्हा ती दुखापत आणखी गंभीर झाली होती.

राकेश रोशनच्या ‘कोयला’ या चित्रपटाच्या सेटवर शाहरुख खान जखमी झाल्याचं फार कमी लोकांना माहिती आहे. गुडघ्यावर स्कार्फ बांधून त्याने डान्स केला होता, हे प्रेक्षकांच्या लक्षात असेल. तर गुडघ्यावर स्कार्फ फॅशन म्हणून नाही तर दुखापतीमुळे बांधला होता.

रोहित शेट्टीच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही शाहरुखला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातानंतर लंडनमध्ये शाहरुखच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली.

फराह खानच्या 'हॅपी न्यू इयर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खान जखमी झाला होता. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शूटिंगदरम्यान शाहरुख जखमी झाल्याची बातमी आली होती. डान्स सीक्वेन्स शूट करत असताना शाहरुखच्या चेहऱ्याला आणि डोक्याला दुखापत झाली. यानंतर त्याला तातडीने नानावटी रुग्णालयात नेण्यात आलं होतं.

शाहरुख खानने 2009 मध्ये मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्याच्या डाव्या खांद्यावर आर्थोस्कोपिक सर्जरी केली होती.

शिवाय, 'कल हो ना हो'च्या शूटिंगदरम्यान शाहरुखच्या पाठीवर जर्मनीमध्ये शस्त्रक्रिया झाली होती.

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटचा 'डंकी' या चित्रपटामध्ये दिसला होता. लवकर तो 'किंग' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.