सुनील दत्त यांचा जावई, तरीही बहरली नाही कारकिर्द; चित्रपटांपेक्षा 'त्या' अफेअर्सचीच रंगली चर्चा!

By सुजित शिर्के | Updated: October 1, 2025 16:51 IST2025-10-01T16:36:43+5:302025-10-01T16:51:11+5:30

हिंदी सिनेविश्वात असे अनेक कलाकार सापडतील जे आपल्या करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार झाले.

हिंदी सिनेविश्वात असे अनेक कलाकार सापडतील जे आपल्या करिअरमधील पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार झाले. या कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता कुमार गौरव.

१९८१ साली आलेल्या 'लव्ह स्टोरी' या चित्रपटातून या अभिनेत्याने सिनेविश्वात पाऊल ठेवलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. अभिनेता कुमार गौरव या चित्रपटानंतर चांगलाच प्रसिद्धीझोतात आला.

कुमार गौरव हा सुपरस्टार राजेंद्र कुमार यांचा मुलगा आहे. ११ जुलै १९५६ रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे त्याचा जन्म झाला. घरातच चित्रपटाची परंपरा होती. त्यातच कुमार गौरवने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.

असंही म्हटलं जातं की,पहिल्याच चित्रपटाला मिळालेलं यश आणि प्रसिद्धीची हवा डोक्यात गेल्याने कुमार गौरवने काही चित्रपट नाकारले, त्यामुळे त्याच्या करिअरला उतरती कळा लागली.

नेहमी नव्या नायिकांसोबत काम करण्यास नकार देणाऱ्या कुमार गौरवसोबत काम करण्यास कोणतीही प्रसिद्ध अभिनेत्री तयार नव्हती. आपल्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा हा अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत राहिला.

'लव्ह स्टोरी'चित्रपटात एकत्र काम करताना त्याचे आणि विजया पंडितचे सूर जुळले होते. मात्र, राजेंद्र कुमार यांना हे नातं मान्य नव्हतं. त्यांनी कुमार गौरवचं लग्न राज कपूर यांची मुलगी रीमासोबत ठरवलं. रीमा आणि कुमार यांचा साखरपुडा झाला पण तो काही काळानंतर मोडला.

त्याकाळी कुमार गौरव आणि विजयंता पंडित यांच्या अफेअर्सच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरु लागल्या होत्या. मात्र, कुमार गौरवने या चर्चांवर कायम मौन बाळगलं.

त्यानंतर १९८४ मध्ये कुमार गौरव यांनी अभिनेता सुनील दत्त आणि नर्गिस यांची मुलगी नम्रता दत्तसोबत लग्न केलं. या जोडप्याला सची आणि सिया या दोन मुली आहेत.