नशीबानं थट्टा कशी मांडली..! रस्त्यावर फिरली अन् फुटपाथवर झोपली; बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने असेही दिवस पाहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 17:19 IST2023-08-04T16:20:31+5:302023-08-04T17:19:30+5:30

सोलापुरात एका मराठमोळ्या कुटुंबात या अभिनेत्रीचा जन्म झाला. वडिलांचा सोलापुरात मोठा कपड्यांचा व्यापार होता. पण अचानक त्यांचे संपूर्ण सुखी कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आले.

70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये सुमारे 100 बॉलिवूड चित्रपटांत काम केले. दीर्घकाळापासून त्या फिल्मी इंडस्ट्रीपासून दूर आहेत. शशिकला जवळकर, असे त्यांचे पूर्ण नाव. सोलापुरात एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या शशिकला यांचे आयुष्य कुठल्या चित्रपटापेक्षा कमी नाही. आज शशिकला आठवण्याचे कारण म्हणजे, आज त्यांचा वाढदिवस.

४ ऑगस्ट १९३२ रोजी त्यांचा जन्म झाला. वडीलांचा सोलापुरात मोठा कपड्यांचा व्यापार होता. त्यामुळे शशिकला यांचे बालपण अगदी ऐशोआरमात गेले. तीन भाऊ आणि तीन बहिणी असे त्यांचे कुटुंब. त्यातील शशिकला या जवळकर कुटुंबातील पाचवे अपत्य. पुढे शशिकला यांच्या वडिलांचा व्यवसाय डबघाईला आला. त्यांचे संपूर्ण सुखी कुटुंब अक्षरश: रस्त्यावर आले. याबद्दल शशिकला एका मुलाखती बोलल्या होत्या.

माझे वडील स्वत:ची अख्खी कमाई आपल्या लहान भावाला पाठवत. तो लंडनला शिकत असे. आपल्या कुटुंबापेक्षा आपल्या भावाची ते काळली घेतली. पण त्यांचा हाच भाऊ नोकरीला लागला आणि आम्हाला विसरला. माझ्या वडिलांचा व्यवसाय डबघाईला गेला. तो प्रसंग मला आठवतो.

आठ दिवस आम्ही जेवलो नव्हतो. आम्हाला कुणीतरी जेवायला बोलवाने, यासाठी प्रार्थना करत होतो. अशास्थितीत शशिकला सुंदर आहे, अभिनयही चांगला करते, असे अनेकांनी माझ्या वडिलांना सांगितले आणि आमचे कुटुंब मुंबईत आले. त्यावेळी माझे वय 11 वर्षे होते. त्या वयात मी एका स्टुडिओतून दुस-या स्टुडिओत जात काम शोधत होते. याचदरम्यान माझी ओळख नूर जहाँ यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी त्यांच्या पतीला सांगून मला काम मिळवून दिले.

1945 मध्ये शशिकला यांना ‘झीनत’ चित्रपटात कव्वाली करण्याचे काम मिळाले. या भूमिकेसाठी त्यांना त्याकाळी २० रुपये मिळाले होते. या २० रुपयात त्यांनी आपल्या भावंडाना नवीन कपडे घेतले, स्वत: ला २ साड्या घेतल्या.

१९४७ साली त्यांनी ‘जुगनू’ चित्रपटात दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका साकारली. तोपर्यंत स्ट्रगल चालूच राहिला. १९६२ सालच्या ‘आरती’ चित्रपटात त्यांना खलनायिकेची भूमिका ऑफर झाली. यामुळे शशिकला इतक्या दुखावल्या की, त्यांनी यापुढे कधीच चित्रपटात काम न करण्याचे ठरवले. परंतु चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी तिला खूप समजावून या भूमिकेसाठी तयार केले.

‘आरती’ चित्रपटातील या खलनायिकेच्या भूमिकेमुळे आयुष्याला कलाटणी मिळाली. हरियाली और रास्ता, गुमराह, हमराही, फुल और पत्थर सारख्या चित्रपटात खलनायकाच्या भूमिका त्यांनी बजावल्या.

करिअर बहरात असताना शशिकला यांनी ओम प्रकाश मेहरा यांच्यासोबत यांनी प्रेमविवाह केला. शशिकला याना दोन मुलीही झाल्या. पण कालांताने या नात्यात मतभेद वाढले. कौटुंबिक वादामुळे शशिकला यांनी आपल्या मुली, घरदार यांच्यापासून दूर राहणे पसंत केले. एका व्यक्तीसोबत जाऊन त्या परदेशी स्थायिक झाल्या. परंतु त्या व्यक्तीनेही त्यांना धोका दिला.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, त्या व्यक्तिने मला शारीरिक व मानसिक त्रास दिला. मी कशीबशी त्याच्या कचाट्यातून सुटले आणि भारतात आले. भारतात आल्यावर मी रस्त्यावर फिरत राहायचे, फुटपाथवर झोपायचे. जे मिळायचे ते खायचे. शांतीच्या शोधात मी अनेक मंदिरे, आश्रम पालथी घातली. यानंतर मी कोलकात्याला गेले आणि येथे मदर टेरेसा यांच्यासोबत रोग्यांची सेवा केली.

मदर टेरेसा यांच्यासोबत ९ वर्षे सेवा दिल्यानंतर त्या पुन्हा मुंबईला परतल्या. इथे आल्यावर आपली थोरली मुलगी कॅन्सरच्या आजाराने निधन पावल्याचे त्यांना समजले. मग धाकटी मुलगी आणि नातवंडे यांच्यासोबत त्या राहू लागल्या. नव्याने चित्रपट क्षेत्रात येऊन आपला जम बसवत आजीच्या भूमिका लीलया पार पाडल्या. छोट्या पडद्यावरील किसे अपना कहें, सोनपरी, जिना इसी का नाम है मालिकेत विविधांगी भूमिका साकारल्या. शशिकला यांचं ४ एप्रिल २०२१ रोजी निधन झालं.