परिणीती चोप्राने एका महिन्याने दाखवली लेकाची पहिली झलक, नाव ठेवलंय 'नीर'; अर्थही आहे फारच खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:06 IST2025-11-19T12:04:27+5:302025-11-19T12:06:34+5:30
परिणीती आणि राघव यांनी एका महिन्याने त्यांच्या गोंडस बाळाची पहिली झलक दाखवली आहे. यासोबतच त्यांनी लाडक्या लेकाचं नाव काय ठेवलं, हेदेखील जाहीर केलं आहे.

परिणीती चोप्राने एका महिन्याने दाखवली लेकाची पहिली झलक, नाव ठेवलंय 'नीर'; अर्थही आहे फारच खास
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा काही दिवसांपूर्वीच आईबाबा झाले. १९ ऑक्टोबरला परिणीतीने त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आता परिणीती आणि राघव यांनी एका महिन्याने त्यांच्या गोंडस बाळाची पहिली झलक दाखवली आहे. यासोबतच त्यांनी लाडक्या लेकाचं नाव काय ठेवलं, हेदेखील जाहीर केलं आहे.
परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन आपल्या चिमुकल्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंकडे पाहून परिपूर्ण कुटुंब असल्याची भावना चाहत्यांनी व्यक्त केली आहे. "जलस्य रूपम्, प्रेमस्य स्वरूपम् — तत्र एव नीर", असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या लेकाचं नाव नीर असं ठेवलं आहे. या नावाचा अर्थही अभिनेत्रीने पोस्टमधून सांगितला आहे. "आमच्या हृदयाला जीवनाच्या या शाश्वत थेंबात शांतता मिळाली. आम्ही त्याचं नाव ठेवलं ‘नीर’ — शुद्ध, दिव्य, आणि असीम", असं परिणीतीने म्हटलं आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी २०२३मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर दोन वर्षांनी ते आईबाबा झाले आहेत. ऑगस्ट महिन्यात परिणीतीने गरोदर असल्याचं सांगितलं होतं. ऑक्टोबर महिन्यात तिने चिमुकल्याला जन्म दिला. चिमुकल्याच्या आगमनाने दोघांच्याही कुटुंबात आनंद साजरा होत आहे.