रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:00 IST2025-11-04T13:59:51+5:302025-11-04T14:00:44+5:30
Paresh Rawal : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते परेश रावल हे जरी दशकांपासून उत्कृष्ट कलाकारांपैकी एक असले, तरी वास्तविक जीवनातही ते काही अशा घटनांसाठी चर्चेत राहिले आहेत, जेव्हा त्यांनी आपला संयम गमावला होता.

रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते परेश रावल हे जरी दशकांपासून उत्कृष्ट कलाकारांपैकी एक असले, तरी वास्तविक जीवनातही ते काही अशा घटनांसाठी चर्चेत राहिले आहेत, जेव्हा त्यांनी आपला संयम गमावला होता. असाच एक किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा ते 'प्रतिशोध' नावाचे नाटक करत होते. सतत अश्लील कमेंट्स करणाऱ्या एका प्रेक्षकाला त्यांनी धडा शिकवला होता. ते थेट रंगमंचावरून खाली उतरले आणि प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांनी त्या व्यक्तीला थप्पड मारली होती.
परेश रावल यांनी राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये आपल्या रागावर नियंत्रण नसलेल्या काही जुन्या घटनांबद्दल धक्कादायक खुलासे केले. त्यांनी म्हटले की, "मी स्वतःला थांबवू शकलो नाही. ज्या दिशेने आवाज येत होता, मी त्याच दिशेने गेलो. कोणीतरी सतत अश्लील टिप्पणी करत होते. या घटनेनंतर खूप गोंधळ झाला. साहजिकच, त्या दिवशी नाटक बंद करावे लागले. थिएटर मालकांनीही सांगितले की, ते परेश रावल यांना पुन्हा तिथे परफॉर्म करू देणार नाहीत."
परेश रावल यांनी एका प्रेक्षकाला मारली थप्पड
नाटकादरम्यान एका प्रेक्षकाला थप्पड मारल्याबद्दल बोलताना परेश रावल म्हणाले, "मी तीन-चारपेक्षा जास्त थापड मारल्या नाहीत, कारण मी गर्दीत गेलो होतो आणि त्याचा उलट परिणाम होऊ शकला असता." ते पुढे म्हणाले, "मी तीन-चार थप्पड मारून परत स्टेजवर आलो, त्यामुळे ते लोक अधिक भडकले." तरीही परेश रावल यांनी आपली कृती योग्य ठरवली, कारण मार खाल्ल्यानंतरही त्या प्रेक्षकाला आपल्या कृतीचा कोणताही पश्चात्ताप नव्हता.
''दगड फेकल्याचा झाला पश्चात्ताप''
परेश रावल यांना ज्या गोष्टीचा खरा पश्चात्ताप आहे, ती घटना तेव्हा घडली जेव्हा त्यांनी एका व्यक्तीच्या डोक्यात दगड फेकला होता. याबद्दल बोलताना ते म्हणाले, "मला त्याचा खूप पश्चात्ताप झाला.या घटनेनंतर मी त्या व्यक्तीच्या घरी गेले आणि नंतर आम्ही मित्र झालो. चांगले मित्र नाही, पण आम्ही मित्र झालो." ते म्हणाले की, "क्रोध आणि दुःखाची भावना नेहमीच इजा करते." त्यांच्या मते, दुखावले जाण्याची प्रतिक्रिया वेगवेगळी असते. ते म्हणाले, "कधी मी नम्र होतो, कधी उदास होतो, तर कधी आक्रमक होतो."
धर्माचा घेतला जातो आधार
परेश रावल यांचे वडीलही चिडचिडे स्वभावाचे होते, पण त्यांचा राग अधिक हिंसक होता, असे त्यांनी सांगितले. त्यांना असे वाटते की, आज समाजात केवळ रागाची पातळीच वाढलेली नाही, तर धर्माचा आधार घेऊन लोकांना भडकावले जात आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, "आजकाल संतापाबरोबरच धर्माचाही आधार घेतला जातो." त्यांनी त्यांच्या ‘रोड टू संगम’ (२००९) या चित्रपटातील एका संवादाचा उल्लेख केला. ते म्हणाले "कोणतीही गोष्ट थेट धर्माशी जोडली जाते." ('कौन बात को सीधे मजहब से जोड़ देते हैं।' ) ते पुढे म्हणाले, "ते फक्त धर्माचा वापर करतात, कारण हे एक मोठे हत्यार आहे. जर तुम्ही धर्माचा आधार घेतला, तर आणखी १०-१५ लोक भडकतील. जर मी ब्राह्मण, दलित, मुसलमान किंवा ख्रिश्चन म्हणून बोललो, तर मला झेंडा फडकवणारे अधिक साथीदार मिळतील. हे खूप सोपे आहे. हे बुलेटप्रूफ जॅकेटसारखे आहे. आता, तुम्ही मला स्पर्श करू शकत नाही."