'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 11:37 IST2025-11-03T11:36:37+5:302025-11-03T11:37:30+5:30
Paresh Rawal : ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी खुलासा केला की, 'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेच्या यशामुळे त्यांच्या इतर भूमिका मागे पडल्या आहेत. पुन्हा पुन्हा तीच भूमिका साकारून कंटाळल्याचे त्यांनी सांगितले, परंतु लवकरच ते 'हेरा फेरी ३'मध्ये अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसोबत परतणार आहेत.

'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
'हेरा फेरी' २००० मध्ये रिलीज झाला होता आणि तो आजही सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपटांमध्ये गणला जातो. या चित्रपटात परेश रावल यांनी बाबूराव नावाच्या बेरोजगार व्यक्तीची भूमिका साकारली होती, जो कर्जाच्या बोजाखाली दबलेला एक सामान्य माणूस होता. अक्षय कुमार (राजू) आणि सुनील शेट्टी (श्याम) यांच्यासोबतची त्यांची केमिस्ट्री अफलातून होती. 'ये बाबू भय्या का घर है, घर तो होगा ही!' आणि 'तुम्हारी तो...' सारखे चित्रपटातील संवाद आजही मीम्स आणि रिल्समध्ये व्हायरल होत आहेत. २००६ मध्ये याचा सीक्वल 'फिर हेरा फेरी' आला, पण तिसरा भाग खूप दिवसांपासून रखडलेला आहे.
अलिकडेच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना परेश रावल म्हणाले, "मी एकच गोष्ट वारंवार पाहून कंटाळलो आहे. मला अडकल्यासारखे वाटते आहे. लोकांना खूश करण्यासाठी तुम्ही तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करत राहता. जेव्हा राजू हिराणी यांनी 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस.' बनवला, तेव्हा तीच पात्रे एका नवीन वातावरणात दाखवण्यात आली आणि लोकांनी त्याचा आनंद घेतला. पण जेव्हा तुमच्याकडे इतकी मोठी पात्रे आहेत, ज्यांची लोकांमध्ये ५०० कोटींची गुडविल आहे, तर मग थोडा धोका पत्करून पुढे का जाऊ नये? एकाच ठिकाणी का अडकून राहावे?"
इतर भूमिकांवर भारी पडला बाबूराव
परेश रावल यांनी पुढे सांगितले की, ''बाबूरावच्या भूमिकेवर त्यांचे खूप प्रेम आहे, पण दुःखद गोष्ट ही आहे की ही भूमिका त्यांच्या इतर अनेक उत्कृष्ट भूमिकांवर भारी पडते.'' ते म्हणाले की, "बाबूरावचे पात्र माझ्या इतर चांगल्या भूमिकांवर वरचढ ठरते. मला तर असे सांगितले जाते की, बाबूराव आर. के. लक्ष्मणपेक्षाही जास्त प्रसिद्ध आहे. बुद्धिमान लोक देखील जेव्हा वारंवार तीच गोष्ट घडते, तेव्हा मला वाईट वाटते. यामुळे मी कंटाळलो आहे. बाबूरावमध्ये खूप क्षमता आहे. प्रेक्षक त्याच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतात.''
या भूमिका नाकारल्या
परेश रावल यांनी सांगितले की, ''त्यांना अनेकदा बाबूरावसारख्या मिळत्याजुळत्या भूमिकांची ऑफर आली, पण त्यांनी प्रत्येक वेळी नकार दिला.'' ते म्हणाले, ''मी कधीही बाबूरावची नक्कल करणाऱ्या भूमिका केल्या नाहीत. अशी मागणी नेहमीच असते. प्रत्येकाला त्यावरच पैसे कमवायचे आहेत. पण कायदेशीररित्या बाबूरावचे पात्र फिरोज नाडियाडवाला यांची मालमत्ता आहे, त्यामुळे मी दुसऱ्या कोणत्याही चित्रपटात ती भूमिका करू शकत नाही. ही माझ्या नाईलाजाने निर्माण झालेली एक चांगली गोष्ट आहे. त्यांनी हे देखील सांगितले की, आठवणी महत्त्वाच्या आहेत, पण सिनेमाने पुढे जायला हवे आणि त्यातील पात्रांनी देखील. आपण फक्त तीच गोष्ट वारंवार करू नये.''
अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसोबत पुन्हा एकदा पुनरागमन
बरीच समजूत आणि कायदेशीर अडचणींनंतर परेश रावल पुन्हा एकदा 'हेरा फेरी ३' मध्ये बाबूरावच्या रूपात परतणार आहेत. ते पुन्हा एकदा अक्षय कुमार (राजू) आणि सुनील शेट्टी (श्याम) यांच्या त्रिकुटासोबत लोकांना मनोरंजन करताना दिसतील. काही काळापूर्वी क्रिएटिव्ह मतभेदांमुळे त्यांनी या प्रोजेक्टपासून अंतर ठेवले होते, पण आता त्यांनी पुष्टी केली आहे की, ते टीममध्ये परत सामील झाले आहेत. अनेक रिपोर्ट्सनुसार, 'हेरा फेरी ३' वर काम सुरू आहे, पण स्क्रिप्ट फायनल होण्यास वेळ लागत आहे. परेश रावल यांनी सांगितले की, ''ते स्वतः या प्रोजेक्टसाठी उत्सुक आहेत, पण पात्राला आदर देणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या या बोलण्याने केवळ चाहतेच नाही तर चित्रपटसृष्टीलाही क्लासिक पात्रांना नवे जीवन कसे देता येईल यावर विचार करण्यास भाग पाडले आहे.''