गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 21:14 IST2025-08-05T21:12:04+5:302025-08-05T21:14:43+5:30
आयुष्य तेच आहे अन् हाच पेच आहे असं म्हणत पंडित भीमराव पांचाळे यांनी मराठी मनाची तार छेडली. गझल सम्राट भीमराव पांचाळे यांना गानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता. ६० आणि ६१ वे महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर नामांकित राज कपूर, व्ही शांताराम, जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान केले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी उपस्थित होते. प्रख्यात गझल सम्राट भीमराव पांचाळे (Bhimrao Panchale) यांना गानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गझल हा लोकप्रिय गानप्रकार आहे. सुफी संतांमुळे हा प्रकार भारतात रुजला. गझल हेच व्रत म्हणून घेणारे भीमराव पांचाळे. आयुष्य तेच आहे अन् हाच पेच आहे असं म्हणत त्यांनी मराठी मनाची तार छेडली. भीमराव पांचाळे यांना आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना या पुरस्कार मिळाला. यासोबत सन्मानचिन्ह आणि १० लाख रुपये बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर भीमराव पांचाळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, "मी आज भरुन पावलो आहे. मराठी गजल वैभव मला पुढे न्यायचं आहे हा माझा ध्यास आहे. आज या पुरस्काराने मी धन्य आहे. सुरेश भटांची आज आठवण येते आहे. ते नक्कीच खूश झाले असते. मी माझ्या स्वरांमधून गझल गाऊन व्यक्त झालो. माझ्यावर अशीच कृपा असू द्या."
सृजनशील संगितकार म्हणून नाटक, मालिका, सिनेमांनाही त्यांनी संगीत दिलं. अनेक देशांमध्ये कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांच्या स्वरातून जेव्हा गझल प्रकट होतात तेव्हा तो एक अनुभवच बनतो. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ त्यांनी गजल गायकीचा अनमोल छेवा उभा केला. अडीच हजार मैफील, गजल कार्यशाळा, चळवळींमधून त्यांनी गजलेला व्यासपीठ मिळवून दिलं. नवोदित गझलकारांना सूर दिले.