ओम पुरी आणि वाद...
By Admin | Updated: January 6, 2017 11:12 IST2017-01-06T11:09:19+5:302017-01-06T11:12:36+5:30
दिवंगत अभिनेते ओम पुरी त्यांच्या रोखठोक बोलण्यामुळे अनेकवेळा वादात सापडले होते व मोठ्या प्रमाणात टीकेचा सामनाही करावा लागला होता.

ओम पुरी आणि वाद...
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - सामान्य चेहरा असूनही आपल्या खणखणीत अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीच्या इतर मान्यवरांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणारे आणि तितकच यश मिळवणारे अभिनेते अशी ओम पुरी यांची ओळख.. यासोबतच ते त्यांच्या सडेतोड वक्तव्यासाठीही प्रसिद्ध होते. मात्र कधी कधी याच स्वभावामुळे ते अडचणीतही सापडले. त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे अनेकवेळा वादही निर्माण झाले. त्यातलाच एक ताजा वाद म्हणजे उरी हल्ल्यानंतर शहिदांसंबंधी त्यांनी केलेले वक्तव्य...
१८ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर येथे लष्कराच्या तळावर हल्ला चढवला, ज्यामध्ये अनेक जवान शहीद झाले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले व पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया सर्व देशभरातून उमटली. मात्र शहीद झालेल्या जवानांबद्दल शोक व्यक्त करण्याऐवजी व हल्लेखोरांविरोधात संताप व्यक्त करण्याऐवजी ओम पुरी यांनी शहीदांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याने वादाची मोठी ठिणगी पडली. ' वानांना सैन्यात जायला आम्ही सांगितलं होतं का ? त्यांना शस्त्र उचलण्यास कोणी सांगितलं?' असा सवाल पुरी यांनी विचारला आणि संपूर्ण देशभरातले वातावरण पेटले. तसेच पाकिस्तानी कलाकार व्हिसा घेऊन भारतात काम करण्यासाठी येतात असे सांगत त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे चहूबाजूंनी त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. अखेर ओम पुरी यांना आपल्या चुकीची जाणीव झाली अन त्यांनी माफी मागितली. 'शहिदांसंदर्भात मी जे काही वक्तव्य केले आहे, त्याबद्दल मला लाज वाटते. केलेल्या चुकीसाठी मी शिक्षेस पात्र आहे', अशा शब्दांत त्यांनी आपली चूक मान्य केली.
उरी हल्ल्यातील शहीद जवानांचा अपमान केल्यामुळे ओम पुरी यांच्याविरोधातील वाद ताजा होता, तोच त्यांनी शिवसेनेविरोधात वादग्रस्त वक्तव्य करत त्यांना डिवचले. भारतात पाकिस्तानी कलाकारांना घातलेल्या बंदीसंदर्भात प्रतिक्रिया देताना त्यांनी पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन तर केलेच पण शिवेसेनेविरोधातही प्रतिक्रिया दिली. 'शिवसेनेकडे आरडीएक्स नाही आणि एके 47 सुद्धा नाही, त्यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नाही. ते काहीही वाकडे करू शकत नाही' असे ते म्हणाले होते.
बीफ खाल्ल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील दादरी येथे एका इसमाला जमावाने अमानुष मारहाण केल्यामुळे जाव गमवावा लागला. या मुद्यावरून केलेल्या भाष्यावरूनही ओम पुरी वादात सापडले होते. बीफ खाल्ल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत दादरी येथे एका इसमाला जीव गमवावा लागला ही घटना भारतासाठी अतिशय लज्जास्पद असल्याचे सांगत त्यांनी दादरी प्रकरणावर कडाडून टीका केली होती. तसेच ' माझ्या या वक्तव्यावरून भारतातील कट्टरपंथीयांनी मला त्रास दिला तर मी भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होईन' असा इशाराही त्यांनी दिल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले होते.
तीन दिवसीय पाकिस्तान दौ-यादरम्यान लाहौर येथे त्यांनी भारतातील वाढत्या कट्टरतवादावर टीका करतानाच असहिष्णूतेबाबतही मत व्यक्त केले. भारतात बीफ खाण्याच्या मुद्यावरून गदारोळ माजवणा-या लोकांची संख्या मोजकी आहे. आमचा देश मांस निर्यात करून हजारो डॉलर्स कमावतो, मात्र असं असतानाही काही लोकांना गो हत्या बंदी हवी आहे. अशी मागणी करणारे लोक ढोंगी आहेत, अशी कडाडून टीका त्यांनी केली होती.
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी सापडले वादात
पत्नी नंदिता पुरी यांना मारहाण केल्याप्रकरणी ओम पुरी ववादात सापडले होते. अंधेरीतील घरात पुरी यांनी आपल्याला काठीने मारझोड केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार ओम यांची दुसरी पत्नी असलेल्या नंदिता यांनी दाखल केली होती. त्यानंतर वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.