आता कला अन् क्रीडा संबंधही नको

By Admin | Updated: October 2, 2016 02:15 IST2016-10-02T02:15:54+5:302016-10-02T02:15:54+5:30

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून निघून जावे, अशी मागणी सर्व स्तरांतून होऊ लागली. या मागणीला घेऊन जो वाद निर्माण झाला, त्याला इंडियन मोशन पिक्चर्स

Now there is no art and sports relationship | आता कला अन् क्रीडा संबंधही नको

आता कला अन् क्रीडा संबंधही नको

उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारतातून निघून जावे, अशी मागणी सर्व स्तरांतून होऊ लागली. या मागणीला घेऊन जो वाद निर्माण झाला, त्याला इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर असोसिएशन अर्थात, ‘इम्पा’ या संस्थेने पूर्णविराम लावला आहे. ‘इम्पा’च्या सर्वसाधारण सभेत कुठल्याही पाकिस्तानी कलाकाराला यापुढे काम न देण्याचा निर्णय झाला. ‘इम्पा’ने घेतलेल्या या निर्णयाविषयी मराठी कलाकारांना काय वाटते, याची ‘सीएनएक्स’ने घेतलेली ही माहिती...

शरद पोंक्षे
खरेच ‘इम्पा’ने घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आता पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत. मग ते सांस्कृतिक असो वा क्रीडासंबंधी. ज्या पद्धतीने पाकिस्तानी कलाकारांचे लोंढे आपल्या देशात येत आहेत, त्या गोष्टीला या निर्णयामुळे पूर्णविराम लागेल. त्यामुळे ‘इम्पा’च्या या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.

विजय पाटकर
‘इम्पा’च्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. आतापर्यंत आपण जो मनाचा मोठेपणा दाखवत होतो, तो आता पुरे झाला. तिथे सीमेवर आपले जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद होत असतात. त्यामुळे सांस्कृतिक, कला, क्रीडा प्रेम खूप झाले. आता प्रथम देशाचा विचार केला गेला पाहिजे. ‘इम्पा’ने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे.

अलका कुबल
कलाकार जात, धर्म, पंथ या गोष्टी मी मानत नाही, पण आता भारत-पाकिस्तानमध्ये जे काही चालले आहे, त्या पार्श्वभूमीवर ‘इम्पा’ या संस्थेचा निर्णय बरोबर आहे. जो राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेण्यात आला आहे, त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे.

प्रसाद ओक
‘इम्पा’ने घेतलेल्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करत आहे. आपल्याकडे कलाकौशल्य असणारे विविध कलाकार आहेत. आपल्या कलाकारांना डावलून जो देश आपल्यावर दहशतवादी हल्ले करत होता, त्या देशातल्या कलाकारांना आपण का व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे ‘इम्पा’ने घेतलेला निर्णय उत्तम आहे.

रेणुका शहाणे
‘इम्पा’ या संस्थेने घेतलेला निर्णय योग्यच आहे. आपण इकडे पाकिस्तानातून आलेल्या कलाकारांवर भरभरून प्रेम करत असतानाच, काश्मीरमध्ये मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरूच होत्या. याला सडेतोड उत्तर देण्याची गरज होती. अशा वेळी एक भारतीय नागरिक म्हणून ‘इम्पा’ने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करते.

तेजस्विनी पंडित
देशाच्या संरक्षणासाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला माझा पाठिंबा असणार आहे. तिथे सीमेवर आपले जवान प्राणांची आहुती देत आहेत. निदान आपण छोट्या पातळीवर तरी देशाचे नागरिक म्हणून या निर्णयामध्ये सहभागी व्हावे, असे मला वाटते. त्यामुळे ‘इम्पा’च्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे.

- benzeer.jamadar@lokmat.com

Web Title: Now there is no art and sports relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.