'मुंबई पुणे मुंबई २'ची रसिकांना पाडव्याच्या मुहूर्तावर भेट!

By Admin | Updated: November 12, 2015 00:24 IST2015-11-12T00:24:01+5:302015-11-12T00:24:01+5:30

'मुंबई पुणे मुंबई' हा चित्रपट पाच वर्षांपूर्वी पडद्यावर आला आणि त्यात भूमिका रंगवणाऱ्या स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या जोडीवर तमाम रसिक फिदा झाले

'Mumbai Pune Mumbai 2' meet on the occasion of Padwa! | 'मुंबई पुणे मुंबई २'ची रसिकांना पाडव्याच्या मुहूर्तावर भेट!

'मुंबई पुणे मुंबई २'ची रसिकांना पाडव्याच्या मुहूर्तावर भेट!

'मुंबई पुणे मुंबई' हा चित्रपट पाच वर्षांपूर्वी पडद्यावर आला आणि त्यात भूमिका रंगवणाऱ्या स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे या जोडीवर तमाम रसिक फिदा झाले. साहजिकच, या दिवाळीत या चित्रपटाचा सीक्वल म्हणजे दुसरा भाग येत आहे म्हटल्यावर, उत्सुकता ताणली जाणे अपेक्षितच आहे. याच पार्श्वभूमीवर, सतीश राजवाडे दिग्दर्शित 'मुंबई पुणे मुंबई २' हा चित्रपट प्रदर्शित होत असताना, अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि या चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया यांनी 'लोकमत', मुंबई कार्यालयाला भेट दिली आणि चित्रपटाविषयी गप्पा रंगवल्या. ‘लोकमत कालदर्शिका २०१६' चे प्रकाशनही यावेळी या चित्रपटाच्या टीमने केले आणि दिवाळीच्या मुहूर्तावर एक आगळा योगही साधला.
'मुंबई पुणे मुंबई' हा सिनेमा झाल्यावर आम्ही वेगवेगळी कामे करत होतो, पण या इतर ठिकाणी जेव्हा आम्ही जायचो, तेव्हा एक प्रश्न आम्हाला हटकून विचारला जायचा की, 'मुंबई पुणे मुंबई'तल्या 'त्या दोघांचे' पुढे काय झाले? म्हणजे सिनेमा संपला, पण गोष्ट संपली नाही, असे लोकांना वाटत होते. याबाबत माझा, मुक्ताचा आणि सतीशचा अनुभव सारखाच होता. यातून कुठेतरी याचा सीक्वल यायला पाहिजे, असे डोक्यात येत गेले, पण आमचे निरीक्षण असे होते की, जेवढा पहिला भाग वर्क होतो, तेवढे सीक्वल वर्क होत नाहीत. मग पुढे विचार आला की, आपण खरोखरच सीक्वलला न्याय देणार असू, तर तो करायला हरकत नाही. त्यानंतर सतीशने अश्विनी शेंडेबरोबर सिनेमा लिहायला सुरुवात केली. त्यांनी या सिनेमाचे तब्बल ३२ ड्राफ्ट लिहिले. आम्ही आता जो शूट केला, तो ३२ वा ड्राफ्ट आहे. या प्रोसेसला जवळजवळ दोन वर्षे लागली. मग आमची सतीशसोबत चर्चा झाली आणि हा सीक्वल करायचे नक्की झाले. या सीक्वलमध्ये पात्रे तीच असली, तरी गोष्ट मात्र वेगळी आहे. त्यामुळे हा खऱ्या अर्थाने सीक्वल आहे. या चित्रपटाच्या कथेला पूरक अशी गाणी यात आहेत. या चित्रपटात आम्हाला भरपूर नातेवाईक आहेत. आमच्या या नातेवाईकांनी मला व मुक्ताला सांभाळून घेतले आहे असे मला वाटते. प्रशांत दामले, सुहास जोशी, सविता प्रभुणे, आसावरी जोशी, विजय केंकरे, मंगल केंकरे असे सिनिअर कलावंत यात आहेत आणि त्यांच्याकडून त्यांच्या अनुभवाचे बोल ऐकण्याचे आणि त्यांच्याकडून बरेच काही शिकण्याचे काम आम्ही या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान केले आहे. या सगळ्यांनी सिनेमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
'मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं' हे प्रशांत दामले यांचे या सिनेमात असलेले गाणे सतीशच्या आधीपासूनच डोक्यात होते. प्रशांत दामले यांचा मी चाहता आहे आणि यात त्यांनी अक्षरश: दंगा केला आहे. विजय केंकरे हे तर नाट्यसृष्टीतले ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत आणि त्यांच्यासोबत काम करायला मिळाले याचा मला आनंद वाटतो. सतीशने यातल्या व्यक्तिरेखांचे नाते उत्कृष्ट पद्धतीने बांधले आहे आणि त्यांच्या भावभावना उत्तमरित्या मांडल्या आहेत. माझे इतर जे चित्रपट आहेत त्यात मी हिरो साकारत गेलो आहे; पण 'मुंबई पुणे मुंबई २' यात मी एक 'व्यक्तिरेखा' रंगवली आहे. हा हिरो नाहीय, तर तो तुमच्या-आमच्यातलाच एक तरुण आहे. 'लार्जर दॅन लाईफ' अशी ही भूमिका नाही; तर कुठल्याही घरात सापडेल असे ही व्यक्तिरेखा आहे. हा सिनेमा करताना आम्ही सगळ्यांनीच खूप एन्जॉय केले आहे.
- स्वप्नील जोशी, अभिनेता
'मुंबई पुणे मुंबई'चा पार्ट एक जेव्हा पाच वर्षांपूर्वी आला, तेव्हा मराठीत अशा प्रकारचे खास तरुणाईसाठीचे कथानक असलेले असे सिनेमे फार नव्हते. शिवाय त्यात दोनच पात्रे होती, एकाच दिवसाची गोष्ट होती, असे बरेच प्रयोग त्यावेळी केले होते. माझी व स्वप्नीलची जोडी हासुद्धा एक प्रयोगच होता. त्यामुळे तो सिनेमा लोकांना किती आवडेल, या विषयीचा काहीच अंदाज नव्हता. पहिला भाग केल्यानंतर त्याचा सीक्वल करायचा वगैरे काही डोक्यातच नव्हते, पण आम्ही आता तो केला आहे, पण हे करताना एक गोष्ट यात महत्त्वाची होती आणि ती म्हणजे, ज्याने पहिला भाग पाहिलेला नाही, त्याला दुसरा भाग हा स्वतंत्र आणि पूर्ण सिनेमा वाटला पाहिजे. आधीच्या भागातले काही संदर्भ यात सूचकतेने येत जातात. पहिल्या भागातले लोकांना जे आवडले आहे, तेच पुन्हा देण्यासाठी दुसरा भाग कशासाठी करायचा, हाही मुद्दा होता. त्यामुळे नव्याने जे द्यायचेय ते नवीनच असावे, हे आमचे पक्के झाले होते.
माझे पहिल्या भागातले पात्र आणि यातले पात्र, आमची लेखिका अश्विनीने माझ्यासाठी सोपे करून ठेवले. मुळात ‘लग्न’ या विषयावर जेव्हा बोलले जाते, तेव्हा एका मुलीचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यामुळे मला एक मुलगी लेखिका मिळाली, याचे समाधान जास्त आहे. त्यामुळे खूप फरक पडला. एखाद्या पुरुषाने हे पात्र लिहिले असते, तर एका मुलीच्या मनातल्या भावना तितक्याच उत्कटतेने यात उतरणे कठीण गेले असते. माझे जे पात्र आहे, ती मुलगी पहिल्या भागातही तेवढीच प्रगल्भ होती आणि यातही आहे. हासुद्धा त्याच मुलीचा प्रवास आहे आणि तो तितक्याच सहजतेने लिहिला गेला आहे. दुसऱ्या भागात सहजपणे शिरण्यासाठी लेखिकेचा हा दृष्टिकोन माझ्यासाठी अधिक महत्त्वाचा होता.
- मुक्ता बर्वे, अभिनेत्री

Web Title: 'Mumbai Pune Mumbai 2' meet on the occasion of Padwa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.