"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:05 IST2025-09-30T18:04:44+5:302025-09-30T18:05:27+5:30
"ही तर तारेवरची कसरत...", असं का म्हणाली मृण्मयी?

"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे मराठीतील लोकप्रिय चेहरा आहे. तिचा 'मनाचे श्लोक' सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. या सिनेमाची ती लेखिका आणि दिग्दर्शिकाही आहे. मृण्मयी खऱ्या आयुष्यातही मनमौजी जगणारी व्यक्ती आहे. ती नवऱ्यासोबत काही वर्षांपूर्वी महाबळेश्वरला शिफ्ट झाली. तिथे दोघं मिळून शेतीही करतात. शूटसाठी आणि कामासाठी ते शहरात येतात. सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने मृण्मयीने नुकतीच
एक मुलाखत दिली. यावेळी तिने आजकाल मुलांना वाढवणं किती कठीण आहे यावर भाष्य केलं.
'व्हायफळ'पॉडकास्टमध्ये मृण्मयी देशपांडे म्हणाली, "मी माझ्या मित्रमंडळींना पाहिलंय. मुलांना वाढवणं, त्यांच्या एनर्जीला मॅच करणं हे अशक्य आहे. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धती होती. मुलं कुठे आणि कशी वाढायची कळायचंही नाही. कारण आजूबाजूला काकाचं पोर, आत्याचं पोर शेजारी पाजारीच असायचे. ते सगळे एकत्र राहायचे. चाळ संस्कृती होती. पण आता विचार केला तर आज आपल्याला कामही करायचंय, पैसे कमवायचेत, शिक्षणासाठी पैसा हवाय हे सगळं कसं मॅनेज करायचं."
ती पुढे म्हणाली, "एका फ्लॅटमध्ये राहणारं कुटुंब आहे. नवरा बायको आणि त्यांची दोन मुलं. त्यांनाच सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आहेत. त्यामुळे ही तारेवरची कसरतच आहे. आजकाल मुलांना मोबाईल देण्यावरुन सगळे शिव्या देतात. अरे पण काय करायचं? आईबापाने हे गणित कसं सोडवायचं. त्यांना दोन मिनिटं कधी मिळणार? मी पूर्णपणे आईबापाला दोष देणार नाही. हे बरोबर आहे का? तर हे बरोबर नाही हे कदाचित त्यांनाही माहितीये पण करणार काय? त्यामुळे ही सगळी गणितं आहेत. यात चूक किंवा बरोबरचं उत्तरच देता येणार नाही."