आईच्या आठवणीत रमले तारे...
By Admin | Updated: May 8, 2016 02:41 IST2016-05-08T02:41:33+5:302016-05-08T02:41:33+5:30
बोटाला धरून चालवायला शिकविणारी आई... लहानपणी दोन घास हाताने भरविणारी आई... तर मुलाला खरचटले तरी जिच्या डोळ्यांत पाणी येते ती आई. आपल्या मुलांनी यशाला गवसणी

आईच्या आठवणीत रमले तारे...
बोटाला धरून चालवायला शिकविणारी आई... लहानपणी दोन घास हाताने भरविणारी आई... तर मुलाला खरचटले तरी जिच्या डोळ्यांत पाणी येते ती आई. आपल्या मुलांनी यशाला गवसणी घालावी, म्हणून दिवसरात्र घरातच काय, पण आॅफिसमध्येदेखील कष्ट करणाऱ्या आपल्या आईचे उपकार कोणीच विसरू शकत नाही. मातीच्या गोळ्याला खऱ्या अर्थाने आकार देऊन घडविते, ती म्हणजे आपली आई. खरंच, आई आणि मुलाचे नाते हे खूपच भावनिक अन् हळवे असते. अशाच आपल्या आईच्या काही हृदयस्पर्शी आठवणींना कलाकारांनी ‘मदर्स डे’च्या निमित्ताने ‘सीएनएक्स’च्या माध्यमातून उजाळा दिला आहे. मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त असलेल्या या मेमरीज खास तुमच्यासाठी उलगडल्या आहेत, आपल्या या लाडक्या कलाकारांनी...
सिद्धार्थ जाधव
आम्ही पूर्वी स्लम एरियामध्ये राहायचो, परंतु माझ्या आईने कधीच माझ्यावर वाईट संस्कार होऊ दिले नाहीत. मला आठवतेय, मी एकदा पान खाऊन घरी आलो होतो, तेव्हा आईने मला खूप मारले होते. तिने खडसावून सांगितले की, असे काही खायचे नाही. ती स्वत: शिकलेली नसली, तरी तिने आम्हा सर्व भावंडांना शिक्षित केले आहे. माझा एक भाऊ वकील आहे, बहिणीचे एम.ए. झालेय अन् मी कलाकार म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहे. या गोष्टीचे श्रेय माझ्या आईलाच जाते. व्यसनापासून नेहमी लांब राहायचे, अशी शिकवण माझ्या आईने सतत दिली. आज मी महाराष्ट्र सरकारच्या व्यसनमुक्ती मोहिमेचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे, हाच माझ्या आईसाठी मोठा सन्मान आहे.
अनिकेत विश्वासराव
आई सततच आपल्या मुलांसाठी काही ना काही करत असते. माझ्या आईच्यादेखील बऱ्याच अशा आठवणी आहेत, ज्या मी सांगू शकतो. आजारपणात आईने घेतलेली काळजी असो किंवा शाळेत असताना तिने माझ्यासाठी केलेली मदत मी कधीच विसरू शकत नाही. मला आठवतेय, मी कदाचित दुसऱ्या किंवा तिसऱ्या इयत्तेतच शिकत असेन, त्या वेळी माझी परीक्षा होती अन् आमचा चित्रकलेचा पेपर होता. नेमका मी ड्रॉइंग बॉक्स घरी विसरून आलो होतो. परीक्षा तर सुरू होणार होती, पण तेवढ्यात माझी आई माझ्यासमोर कलरिंग बॉक्स घेऊन उभी होती. तो क्षण मी कधीच विसरू शकणार नाही.
पूजा सावंत
मी बारावीला होते, त्या वेळी एका सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्यासाठी आई माझ्या मागेच लागली. मला पार्लरमध्ये नेऊन तिने हेअरकट करवून घेतला, मेकअप केला अन् आम्ही दोघी आॅडिशनसाठी टॅक्सीतून निघालो. मी जातानाही तिला नको म्हणत होते. ‘मला नाहीच द्यायचं आॅडिशन. आधी शिकू दे; मग अॅक्टिंगचं पाहू,’ असा विचार माझ्या डोक्यात होता, परंतु केवळ आईच्या आग्रहाखातर मी तिथे गेले, आॅडिशन दिली अन् सिलेक्टही झाले. त्याच वेळी मला माझा पहिला चित्रपट ‘क्षणभर विश्रांती’ मिळाला. आज मी या क्षेत्रात आहे, तर ती फक्त अन् फक्त माझ्या आईमुळेच.
प्राजक्ता माळी
मी एका फिल्मसाठी काम करीत असताना तिथल्या असिस्टंट डायरेक्टरला माझा आवाज आवडला अन् त्यांनी मला एका आॅडिशनला जायला सांगितले. ज्या दिवशी आम्ही जायला निघणार, तेव्हाच माझे आजोबा गेले. मला वडिलांनी तर नाहीच जायचं सांगितलं. दहा दिवसांनी जा, असे सगळे म्हणायला लागले, परंतु तो दिवस माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा होता. कारण ते आॅडिशन काहीही करून त्याच दिवशी करायचं होतं, त्यांना इमिजिएट रिप्लेसमेंट हवी होती. मग त्या वेळी माझी आई माझ्या पाठीशी खंबीर उभी राहिली. ती मला घेऊन मुंबईला निघाली. आम्ही दोघीही अशा एकट्या मुंबईला कधीच आलो नव्हतो. आम्ही आॅडिशनला पोहोचलो. मी सिलेक्टदेखील झाले अन् आश्चर्य म्हणजे अवघ्या पाचव्या दिवशी मी त्या सीरिअलच्या शूटिंगला सुरुवात केली. माझ्या आईने घरच्यांची मने वळविली अन् ती सीरिअल माझी फॅमिली नंतर कौतुकाने पाहू लागली. केवळ आईच्या धाडसामुळे अन् सपोर्टमुळेच मी इथपर्यंत पोहोचले आहे.
सिद्धार्थ चांदेकर
मला क्रिकेट खेळायचे भयंकर वेड होते. मी पुण्यात राहायचो. त्या वेळी मी पाचवी-सहावीत असेन. मला नेहरू स्टेडिअममध्ये जाऊन क्रिकेट कोचिंग घ्यायचे होते, परंतु तो क्रिकेटचा संपूर्ण स्कीट, युनिफॉर्म, शूज या सर्व गोष्टी घेणे, त्या वेळी परवडण्याजोगे नव्हते. या सर्व खर्चीक गोष्टींवर पैसे घालविण्याची तेव्हाची परिस्थिती नव्हती. मी खूपच नर्व्हस झालो होतो. मला फार वाईट वाटले होते. आता आपल्याला स्टेडिअमवर जाऊन क्रिकेट खेळता येणार नाही, यामुळे मी खूप दु:खी झालो होतो, पण माझ्या आईने साठवलेले पैसे नकळतपणे माझ्या कोचिंग फीसाठी भरले अन् क्रिकेट युनिफॉर्म, शूज ती घेऊन आली. दुसऱ्या दिवशीपासूनच मी स्टेडिअमवर जाऊ लागलो. आईने माझ्यासाठी केलेले हे सॅक्रिफाइस मी कधीच विसरू शकणार नाही.
- priyanka.londhe@lokmat.com