मानवी नाते व संवेदनांचा संदेश

By Admin | Updated: July 18, 2015 02:40 IST2015-07-18T02:40:59+5:302015-07-18T02:40:59+5:30

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांच्या आधारावर बॉलिवूडमध्ये चित्रपट तयार होण्याचा एक इतिहास आहे. दिग्दर्शक कबीर खान व सलमान खान निर्माता असलेला ‘बजरंगी भाईजान’

The message of human relationships and sentiments | मानवी नाते व संवेदनांचा संदेश

मानवी नाते व संवेदनांचा संदेश

- अनुज अलंकार (हिंदी चित्रपट)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांच्या आधारावर बॉलिवूडमध्ये चित्रपट तयार होण्याचा एक इतिहास आहे. दिग्दर्शक कबीर खान व सलमान खान निर्माता असलेला ‘बजरंगी भाईजान’ या दोन देशांतील लोकांमध्ये केवळ प्रेमाचेच महत्त्व पटवून देतो, असे नाहीतर एका मुलीला तिच्या घरी सुखरूप पोहोचविण्याची हृदयाला भिडणारी कथाही सादर करतो. अर्थातच ही कथा दोन्ही देशांच्या सीमा ओलांडून मानवतेचा संदेश देते.
हनुमानाचा भक्त असलेला पवन (सलमान खान) कधीही खोटे बोलत नाही. त्याच्या आयुष्यात पाकिस्तानची मुकी छोटी मुलगी (हर्षाली मल्होत्रा) येते. ही मुलगी तिच्या आईपासून हरवलेली
असते. तिला तिच्या पाकिस्तानात असलेल्या घरी पोहोचविण्याचे काम पवन अंगावर घेतो आणि ते अनेक अडथळे, संकटांना तोंड देत पूर्णही करतो. या कामगिरीमध्ये त्याला पाकिस्तानचा एक बातमीदार खूप मदत करतो. बजरंगी जेव्हा ही कामगिरी पूर्ण करून भारतात परत येतो तेव्हा तो दोन्ही देशांतील नागरिकांना शांतता आणि माणुसकीचे महत्त्व पटविण्यात यशस्वी होतो.
चित्रपटाची वैशिष्ट्ये
कबीर खान आणि सलमान
खान यांनी चित्रपटासाठी कथाच अशी निवडली आहे की त्यात माणुसकीचा मुद्दा व संवेदना काठोकाठ भरलेली आहे. हाच चित्रपटाचा सगळ्यात
मोठा पाया आहे. भारतीय तरुण पाकिस्तानी मुलीला तिच्या घरी सुखरूप पोहोचविण्यासाठी येणाऱ्या सगळ्या संकटांना न डगमगता तोंड देतो. त्यामुळे कोणताही प्रेक्षक त्याच्याकडे माणुसकीच्या दृष्टीनेच बघणार. कबीर खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चित्रपटाच्या कथेतील मानवी संवेदनेवरच भर दिला आहे. त्यासाठी सलमान खानच्या प्रेक्षकांना परिचित असलेल्या प्रतिमेलाही दूर सारण्यास त्यांनी मागेपुढे बघितले नाही.
‘बजरंगी भाईजान’मध्ये सलमान जास्त स्टंट करताना दिसतो ना कॉमेडी. तरीही त्याच्या बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांसमोर न आलेल्या अभिनय वैशिष्ट्याला समोर आणले आहे. हा चित्रपट अनेक अंगांनी सलमानचा चित्रपट आहे यात कोणतीही शंका नसली तरीही हा चित्रपट निव्वळ सलमानचा नाही हेही महत्त्वाचे आहे.
सलमानशिवाय हा चित्रपट हर्षाली मल्होत्राचाही आहे. तिने पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारताना निरासग अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. सलमानशिवाय ही कथा त्याला त्याच्या मोहिमेत मदत करणाऱ्या पाकिस्तानी बातमीदाराचीही आहे.
सलमानने आपली परंपरागत प्रतिमा पूर्णपणे बाजूला ठेवून ज्या कौशल्याने ‘बजरंगी भाईजान’ साकारला आहे तो बघितल्यावर ही भूमिका केवळ तोच साकारू शकला असता, असे म्हणता येते. सलमानचे चाहते बजरंगीच्या प्रत्येक अदाकारीवर खूप खूश होतील.
हर्षालीने सगळ्यांची मने जिंकल्यामुळे ती सगळ्यांची लाडकी बनेल. पाकिस्तानी बातमीदार साकारणारा नवाजुद्दीन सिद्दिकीने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने
जिंकली आहेत. त्यांचा सहजाभिनय एखाद्या सामान्य भूमिकेला असामान्य करून टाकतो. शरद सक्सेना,
पाहुणे कलाकार ओम पुरी यांची कामे उत्तम.

चित्रपटातील उणिवा
चित्रपटात दोषही आहेत. करिना कपूरची भूमिका इतकी किरकोळ आहे की चित्रपटात नायिका असावी एवढेच त्यातून दिसते. तिच्या भूमिकेत काहीही वेगळेपण नाही. चित्रपटात रोमान्स नसल्यासारखाच आहे. आपल्या सगळ्याच चित्रपटांत सलमानने शर्ट काढण्याचा उद्योग ‘बजरंगी भाईजान’मध्ये त्याच्या ख्यातीसारखा केलेला नाही. त्यावर भर दिलेला नाही. संगीतात ‘भर दे झोली आणि सेल्फी ले ले ले’शिवाय बाकीची गाणी कमकुवत आहेत. मध्यांतरापर्यंत चित्रपटाचा वेग अनेक प्रसंगांत हळू असला तरी नंतर त्यांनी गती घेतली आहे.

चित्रपट का बघावा?
सलमान खानसाठी. भावुक व संवेदनशील कथा अन् एका मुलीच्या निरागसपणासाठी.
चित्रपट का बघू नये? दोष असल्यानंतरही चित्रपट बघू नये असे सांगण्यासाठी एकही कारण नाही.

एकूण ‘बजरंगी भाईजान’ हा मानवी संवेदना, धर्म व देशांच्या सीमा ओलांडून मानवतेचा संदेश देतो हीच बजरंगीची जादू आहे. हा बजरंगी भाईजान होऊन सगळ्यांच्या हृदयात स्थान पटकावतो. मानवी नाते व संवेदनांचे महत्त्व जाणणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट बघितला पाहिजे.

Web Title: The message of human relationships and sentiments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.