मास्टर 'विजय' लवकरच करणार राजकारणात एन्ट्री; नव्या पक्षाची नोंदणी प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 15:41 IST2024-01-26T15:40:39+5:302024-01-26T15:41:49+5:30
अभिनेता विजय यांच्या फॅन क्लबच्या सदस्यांची गुरुवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती.

मास्टर 'विजय' लवकरच करणार राजकारणात एन्ट्री; नव्या पक्षाची नोंदणी प्रक्रिया सुरू
फिल्म अभिनेता ते राजकारणी बनलेला कॉलिवूड मेगा स्टार विजय लवकरच राजकारणात पर्दापणासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता विजयनं स्वत:च्या राजकीय पक्षाच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू केली असून महिनाभरात पक्षाच्या नोंदणीचे काम पूर्ण होणार आहे. दाक्षिणात्य सिनेमातील अनेक अभिनेते फिल्म करिअरसोबतच राजकारणात एन्ट्री घेतात. मोठ्या प्रमाणात लोकांकडूनही या कलाकारांना प्रतिसाद मिळतो.
मेगा स्टार विजय तामिळनाडू आणि केरळमध्ये अनेक जनचळवळीत प्रामुख्याने सहभाग घ्यायचा. २०१८ मध्ये थुथुकुडी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत झालेल्यांच्या कुटुंबांना अभिनेता विजय यांनी भेट दिली होती. तेव्हापासून विजय मक्कल अय्यकम राजकीय कार्यक्रमात सक्रीय आहे. स्थानिक निवडणुकीत अभिनेता विजय उभेही राहिले होते. इतकेच नाही तर मागील महिन्यात आलेल्या पुरामुळे दक्षिणेकडील अनेक जिल्ह्याचा विजय यांनी पाहणी दौरा केला होता. पूरात अडकलेल्या लोकांना मदतीचे साहित्य त्याने पाठवले होते.
तामिळनाडूतील विरोधी पक्षातील नेत्यांना मेगा स्टार विजय २०२६ मध्ये राजकारणात एन्ट्री घेण्याची शक्यता वाटत होती. परंतु त्यांच्या समर्थकांकडून लवकरात लवकर पक्षाच्या नोंदणीबाबत आग्रह धरला जात आहे. अभिनेता विजय यांच्या फॅन क्लबच्या सदस्यांची गुरुवारी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात विजय यांच्या पक्षाची नोंदणी, पक्षाचे अध्यक्ष म्हणून विजय यांच्या नावाची घोषणा आणि पुढील १ महिन्यात पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी माहिती समोर येत आहे.
कोण आहे थलापती विजय?
२२ जून १९७६ साली तामिळनाडूतील चेन्नई येथे जन्मलेल्या अभिनेता विजय यांच्या परिचयाची गरज भासणार नाही. मागील अनेक वर्षापासून ते अभिनय क्षेत्रात नवनवीन रेकॉर्ड बनवत आहेत. मास्टर विजय नावाच्या त्यांच्या सिनेमानं कोरोना काळात सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणून रेकॉर्ड बनवला. सुरुवातीच्या दिवसातच या सिनेमानं तब्बल २०० कोटी बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवला होता. विजय यांचे खरे नाव जोसफ विजय चंद्रशेखर आहे. परंतु फॅन्स त्यांना थलापती नावाने ओळखतात. विजय यांचे वडील एसए चंद्रशेखर कॉलिवूड सिनेमातील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. विजय यांनी वडिलांच्या १५ सिनेमात काम केले. त्यातील ६ सिनेमात ते चाईल्ड आर्टिस्ट म्हणून भूमिका करत होते.