तोचतोचपणाचा अनुभव देणारा मसालापट
By Admin | Updated: December 6, 2014 00:39 IST2014-12-06T00:39:58+5:302014-12-06T00:39:58+5:30
अशा चित्रपटांच्या यादीत ‘अॅक्शन जॅक्सन’ याही चित्रपटाचा सामावेश झाला आहे. दक्षिणेतल्या चित्रपटांच्या रिमेकमध्ये जे मसाले असतात ते याही चित्रपटात ठासून भरले आहेत.

तोचतोचपणाचा अनुभव देणारा मसालापट
दक्षिणेतील चित्रपटांचे हिंदीत रिमेक करण्याची परंपरा ‘वाँटेड’ चित्रपटापासून सुरू झाली. साधारणपणे अशा रिमेक्समध्ये हिंदीतल्या तगड्या कलाकाराला घेऊन मनोरंजनासाठी आवश्यक असणारे सर्व मसाले भरपूर प्रमाणात वापरले जातात. कथेला गौण समजले जाते. अशा चित्रपटांच्या यादीत ‘अॅक्शन जॅक्सन’ याही चित्रपटाचा सामावेश झाला आहे. दक्षिणेतल्या चित्रपटांच्या रिमेकमध्ये जे मसाले असतात ते याही चित्रपटात ठासून भरले आहेत. मात्र असे असूनही हा चित्रपट निराश करतो. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अजय देवगण. त्याच्याकडून खूप अपेक्षा असलेल्यांचा हा चित्रपट पाहून नक्कीच अपेक्षाभंग होतो.
विशी (अजय देवगण) हा पैसे घेऊन लोकांमधले तंटे मिटवतो आणि प्रसंगी लोकांशी दोनहातही करतो. त्यामुळे स्थानिक गुंडांना तो शत्रू वाटू लागतो. पण अचानक विशीपाठी काही गुंड आणि पोलीसवाले लागून त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. त्याचे कारण आंतरराष्ट्रीय गँगस्टर ए.जे. (अजय देवगणचा डबल रोल) असते. ए.जे. आणि विशीसारखे दिसत असल्यामुळे विशीपाठी गुंड आणि पोलिसांचा ससेमिरा लागतो. परदेशातल्या गँगस्टरसाठी काम करीत असलेला ए.जे़ खतरनाक गुंड आहे. बॉससाठी काहीही करण्याची तयारी असलेला ए.जे़ कुठल्याही पातळीवर जाऊन काम करीत असल्याने त्याचा लाडका आहे. या बॉसला एक बहीणही आहे. शत्रूंच्या ताब्यात असलेल्या बहिणीला मरिनाला (मनस्वी) ए.जे. सोडवतो. त्यामुळे त्याच्यावर मरिना फिदा होते. त्याला मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची तिची तयारी असते. बरं या ए.जे़ला प्रेयसी (यामी गौतम) आहे. तिच्याशी लग्न केल्यामुळे मरिना जाम चिडते. गर्भवती असलेल्या ए.जे़च्या बायकोला संपवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे ए.जे़ भारतात येऊन बायकोवर इलाज करतो. त्याचदरम्यान ए.जे़ आणि विशीची भेट झाल्यावर विशीला आपल्या गँगमध्ये जाऊन बदला घेण्यासाठी ए.जे. तयार करतो. पण विशीचे खरे रूप समोर येते. मग एक मोठे युद्ध होते. त्यात ए.जे़ आपल्या अंदाजात परदेशात काम करीत असलेल्या आपल्या गँगचा खात्मा करतो. त्याच्या बायकोची तब्येतही चांगली होते आणि आनंदी आनंद होतो.
उणिवा - प्रभुदेवा दक्षिणेतल्या ज्या चित्रपटांचा हिंदीत रिमेक करतो त्या चित्रपटांच्या कथेवर काहीतरी काम करावे, असे त्याला वाटत नाही. फक्त नाच-गाणी, रोमान्स, मारामारी अशा अनेक मसाल्यांचा पुरेपूर वापर कसा करता येईल, यावरच भर दिला जातो. ‘अॅक्शन जॅक्सन’ चित्रपटात फक्त हेच मसाले वापरले आहेत. त्यात नावीन्य काहीच नाही. ते पाहताना ‘वाँटेड’पासून ‘रावडी राठोड’, ‘आर राजकुमार’ या चित्रपटांची आठवण येते. प्रभुदेवाने आपल्याच जुन्या चित्रपटांतले मसाले एकत्र करून या चित्रपटात वापरले असल्याचे जाणवते. तसेच चित्रपट अश्लील करण्यातही कोणतीच कसर ठेवलेली नाही. विशीची प्रेयसी खुशी (सोनाक्षी सिन्हा) ज्या पद्धतीने आपला लूक बदलते, ती सर्व दृश्ये अश्लीलतेचा कळस आहेत. कलाकारांबाबतीत बोलायचे झाल्यास आधीच्या रिमेक चित्रपटात जशा भूमिका सोनाक्षीने केल्या तशीच भूमिका याही चित्रपटात केली आहे. तर विशीच्या मित्राच्या भूमिकेतल्या कुणाल रॉय कपूरला दुय्यम दर्जाची भूमिका दिली आहे. मारियाच्या भूूमिकेतील मनस्वीने पुरेपूर अंगप्रदर्शन केले आहे. यामी गौतमची भूमिका अत्यंत वाईट आहे. मोठ्या कालावधीनंतर पडद्यावर आलेल्या राजकुमार यांच्या मुलाने - पुरू राजकुमारने प्रभाव पाडलेला नाही. अजय देवगणने या चित्रपटापेक्षा इतर चित्रपटात जास्त चांगल्या अॅक्शन्स भूमिका केलेल्या आहेत. त्यामुळे तो जोश या चित्रपटात नसल्याने निराशा होते. रोमँटिक आणि भावनिक दृश्यांतही अजयचा तोचतोचपणा वाटतो. दिग्दर्शक म्हणून प्रभुदेवाने आपल्या सर्व जुन्या रिमेक चित्रपटांचे दर्शन दिले आहे.
वैशिष्ट्ये - अजय देवगणची अॅक्शन आवडणाऱ्यांना हा चित्रपट आवडू शकतो. या वेळी त्याने नाचण्याचाही चांगला प्रयत्न
केला आहे. ते पाहताना मजा येते. मसाला चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटातील अजयची अॅक्शन-नाच, मनस्वीचे एक्सपोजर आणि परदेशातली लोकेशन्स आवडतील.