‘मांझी’ला करायचाय मराठी सिनेमा

By Admin | Updated: August 3, 2015 00:07 IST2015-08-03T00:03:34+5:302015-08-03T00:07:43+5:30

नवाजुद्दीन सिद्दीकी. अतियश किरकोळ शरीरयष्टीचा व सावळ्या वर्णाचा हा तरुण सिनेमाचे वेड घेऊन उत्तर प्रदेशातील भुवाना गावातून अक्षरश: पळून मुंबईला आला

Marathi filmmaker to make 'Manjhi' | ‘मांझी’ला करायचाय मराठी सिनेमा

‘मांझी’ला करायचाय मराठी सिनेमा

नवाजुद्दीन सिद्दीकी. अतियश किरकोळ शरीरयष्टीचा व सावळ्या वर्णाचा हा तरुण सिनेमाचे वेड घेऊन उत्तर प्रदेशातील भुवाना गावातून अक्षरश: पळून मुंबईला आला होता. खांद्यावरच्या पिशवीत एनएसडीचे प्रमाणपत्र असले तरी गुड लुकिंग पर्सनॅलिटी नसल्याने अनेकांनी त्याला दारातही उभे केले नाही. एकट्याच्या बळावर पहाड फोडून रस्ता बनविणाऱ्या ज्या ‘मांझी’ची भूमिका नवाज आज वठवत आहे तशाच अनंत अडचणींच्या पहाडाची छाती फोडून त्याने प्रत्यक्ष आयुष्यातही यशाचा मार्ग शोेधून काढला आहे. त्याच्या या संघर्षाच्या काळात मराठीतील प्रायोगिक चित्रपटांनी त्याला लढण्याचे बळ दिले. त्याचीच परतफेड करण्यासाठी त्याला आता मराठी सिनेमात काम करायचे आहे. रविवारी ‘लोकमत’ला दिलेल्या भेटीत त्याने या यशाच्या प्रवासातील अनेक कंगोरे उलगडले.
-------------
हिंदी सिनेमा आज ज्या वळणावर उभा आहे तिथून त्याला तुम्ही कसे पाहता?
नवाजुद्दीन - चित्रपटांच्या निर्मितीचा वेग प्रचंड आहे. परंतु त्यातून आपण समाजाच्या हिताचे काय देतोय, हेसुद्धा बघितले गेले पाहिजे. खरं सांगायचे तर आजच्या चित्रपटात कुठे रोल मॉडल्स दिसत नाहीत. ज्याचे अनुकरण समाज करू शकेल. मला वाटते त्या दिशेने प्रयत्न झाले पाहिजे.
‘मांझी’त तसा प्रयत्न झालाय?
- मला तरी तसे वाटतेय. शेवटी चित्रपट बघून तुम्ही याबाबत जास्त चांगले सांगू शकाल.
प्रायोगिक चित्रपटांमधील नसीरुद्दीन शहा, ओम पुरीसारखा आजच्या पिढीतला कलावंत म्हणून तुमच्याकडे पाहिले जातेय. काय वाटते?
- ही खूूप मोठी नावे आहेत. प्रेक्षक अशी तुलना करीत असतील तर त्याला काहीतरी कारण असेलच. परंतु मी चित्रपट निवडताना हा प्रायोगिक तो व्यावसायिक असा भेद करीत नाही. मला फक्त कथा दमदार हवी.
मराठी चित्रपटात नेमके काय आवडते?
- मी आधीच सांगितले त्याप्रमाणे मराठी चित्रपट व नाटकांनी मला खूप नैतिक बळ पुरवले आहे. एनएसडीमध्ये अनेक मराठी युवक माझे मित्र होते. मला मराठी चांगली समजते. मराठी सिनेमात होणोरे प्रयोग थक्क करणारे आहेत. ‘सई रे सई’सारखी नाटकं कायम स्मरणात राहणारी आहेत. ‘दुनियादारी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘कोर्ट’ हे चित्रपट मी पाहिले आहेत. आता मलाही मराठी चित्रसृष्टी खुणावू लागली आहे. मराठी चित्रपटांचा हा सुवर्णकाळ आहे.
‘मांझी’तील तुमची नायिका राधिका आपटेसोबतच्या चित्रपटातील प्रेमप्रसंगांची खूप चर्चा आहे. तुम्ही स्वत: प्रेम या विषयाकडे कसे बघता?
- राधिकासोबतचा अनुभव खरंच फार वेगळा होता. ती फार प्रतिभावान अभिनेत्री आहे. परंतु आजच्या जगातील प्रेमाचे विचाराल तर चित्र फार निराश करणारे आहे. आज मला कुठे सच्चे प्रेम दिसत नाही. दिसते ते केवळ क्षणिक आकर्षण आहे. लोक फेसबुकवर भेटतात, व्हॉट्स अ‍ॅपवर भरभरून बोलतात अन् या आॅनलाइन माध्यमांवरच त्यांचा ब्रेक-अपही होतो. आता बोला... याला प्रेम कसे म्हणता येईल?
आज हिंदी चित्रपटसृष्टीतील तिन्ही मोठ्या खानांबरोबर तुम्ही झळकत आहात. हे तुमचे नशीबच नाही का?
- एक सांगू का... मी नशिबाला अजिबात मानत नाही. नशीब नावाची वस्तू असती तर मला इथपर्यंत पोहोचायला १५ वर्षांचा काळ लागला नसता. शेवटी तुमचे काम बोलले पाहिजे. तुमचे कामच तुमचे नशीब ठरवत असते. तिन्ही मोठ्या खानांबरोबर काम करणे खरंच मोठी गोष्ट आहे. पण, तशी संधी मला मिळाली याचा अर्थ माझ्या अभिनयात ती क्षमता असेल.. नाही का?
आमच्यासारख्या कलावंतांची मेहनत ‘सीएनएक्स’सारख्या माध्यमातूनच लाखो वाचकांपर्यंत पोहोचत असते. चित्रपटात फक्त कथा दाखवली जाते. परंतु ती कथा प्रत्यक्ष पडद्यावर साकारण्यासाठी जे काम या निर्मिती प्रक्रियेत गुंतलेले सर्व लोक करीत असतात त्यांना खरा न्याय वृत्तपत्रातून मिळत असतो. सीएनएक्समुळे वाचकांपर्यंत चित्रपटांबाबतच्या अनेक दर्जेदार बातम्या पोहोचतात. त्यासाठी सीएनएक्सचे आभार...!
---------
‘मांझी’ देशभरात टॅक्स फ्री व्हावा
‘मांझी’ चित्रपटाचे निर्माता व दिग्दर्शक केतन मेहता म्हणाले, बिहार शासनाने ‘मांझी’ चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच टॅक्स फ्री केले आहे. या चित्रपटातून एक मानवतावादी संदेश आम्ही दिला आहे. चित्रपटाची कथा फारच प्रेरणादायी आहे. आम्ही हा चित्रपट बनवताना समाजात एक विधायक संदेश जावा, याचाही विचार केला आहे. त्यामुळे हा चित्रपट सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी देशभरात तो टॅक्स फ्री व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे.

Web Title: Marathi filmmaker to make 'Manjhi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.