ठाण्यातील प्रसिद्ध मराठी गायिका लीलाताई शेलार यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 10:58 IST2025-08-19T10:44:17+5:302025-08-19T10:58:36+5:30
ठाणे गौरव पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध गायिता लीलाताई शेलार यांच्या जाण्याने संगीतक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे

ठाण्यातील प्रसिद्ध मराठी गायिका लीलाताई शेलार यांचं वयाच्या ९४ व्या वर्षी निधन
ज्येष्ठ मराठी गायिका लीलाताई शेलार यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी ठाण्यात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्या वृद्धापकाळाशी संबंधित आजाराने त्रस्त होत्या. सोमवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे मराठी संगीतविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. लीलाताई शेलार या संगीत शिक्षिका आणि गायिका म्हणून ओळखल्या जात होत्या.
लीलाताई यांचे गायनाचे पहिले शिक्षण भास्करराव फाटक यांच्याकडे झाले. त्यानंतर तब्बल २२ वर्षे त्यांनी पंडित अच्युत अंबीकर यांच्याकडे शिक्षण घेतले. पंडित अंबीकर हे स्वतः पंडित फिरोज दास्तूर यांचे शिष्य होते. त्यामुळे लीलाताईंच्या गायनात घराणेशाहीची छाप दिसून येत असे. गायनाबरोबरच त्यांनी विद्यार्थ्यांना संगीत शिकवण्यासाठी आपले आयुष्य अर्पण केले. १९६० मध्ये त्यांनी “कलायतन” नावाची संगीत संस्था स्थापन केली. ही संस्था आजही संगीत शिकणाऱ्यांसाठी प्रेरणादायी मानली जाते.
अनेक विद्यार्थ्यांनी लीलाताईंकडून गायनाची साधना केली आणि त्यांच्याच संगीताची ओढ निर्माण केली. लीलाताई यांनी अनेक संगीत मैफिली, सार्वजनिक कार्यक्रम आणि चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांच्या सुमधुर गायकीमुळे श्रोते मंत्रमुग्ध होत. त्यांच्या योगदानाची दखल घेत ठाणे महानगरपालिकेने त्यांना “ठाणे गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित केले होते. सोमवारी रात्री ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक मान्यवर, त्यांचे शिष्य आणि चाहत्यांनी मोठ्या दु:खाने त्यांना शेवटचा निरोप दिला.