मला दिग्दर्शकानं लपवून ठेवलं होतं...; वाचा, ‘चंद्रमुखी’ अमृता खानविलकर काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 16:03 IST2022-03-24T16:00:43+5:302022-03-24T16:03:02+5:30

Chandramukhi, Amruta Khanvilkar Special Interview : चंद्रमुखीसाठी अमृताने घेतली खास मेहनत, वाचा खास मुलाखत

upcoming marathi movie Chandramukhi Look Amruta Khanvilkar Special Interview | मला दिग्दर्शकानं लपवून ठेवलं होतं...; वाचा, ‘चंद्रमुखी’ अमृता खानविलकर काय म्हणाली?

मला दिग्दर्शकानं लपवून ठेवलं होतं...; वाचा, ‘चंद्रमुखी’ अमृता खानविलकर काय म्हणाली?

अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’  (Chandramukhi) या आगामी चित्रपटातील ‘चंद्रमुखी’ कोण आहे, याची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला लागली होती. सिनेमाचं पोस्टर कधीच रिलीज झालं होतं. चित्रपटातील लावणीचा व्हिडीओ देखील रिलीज झाला होता. पण ‘चंद्रा’ कोण याचा उलगडा झाला नव्हता. अखेर तो झाला. भल्याभल्यांना वेड लावणारी ही चंद्रा दुसरी कुणी नसून अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आहे. ‘चंद्रमुखी’ या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अमृताने ‘लोकमत’शी खास गप्पा मारल्या.

मला दिग्दर्शकानं लपवून ठेवलं होतं...
चंद्रा कोण हे जाणून घेण्यासाठी लोक प्रचंड उत्सुक होते. पण चंद्रा कोण, हे उघड व्हायला त्यांना बरीच प्रतीक्षा करावी लागली. याबद्दल छेडलं असता ती म्हणाली, मी ‘चंद्रा’ला लपवून ठेवलं नव्हतं. तर माझ्या दिग्दर्शकानं लपवून ठेवलं होतं. खरं सांगायचं तर बरोबर आहे त्याचं. गेली दोन वर्ष जगाची जी काही अवस्था (कोरोना महामारीमुळे) होती, ती योग्य वेळ नव्हती हा चित्रपट यायची, असं टीम म्हणून आम्हाला वाटत होतं. ज्या दिवशी रिलीजची डेट ठरेल, त्यादिवशीचं चंद्रमुखीचा चेहरा उघड करायचा, असं प्रसाद ओकचं ठरलं होतं आणि तसंच झालं. 29 एप्रिलला चंद्रमुखी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

चंद्राची खासियत...

चंद्राची काय खासियत आहे, तुझ्या लुकबद्दल काय सांगशील असं विचारलं असता अमृता म्हणाली, चंद्राच्या लुकपेक्षाही या पात्राची जास्त खासियत आहे, असं मला वाटतं. चंद्रा म्हणजे संघर्ष, चंद्रा म्हणजे प्रेम, चंद्रा म्हणजे  बलिदान, चंद्रा म्हणजे त्याग, चंद्रा म्हणजे कृष्णभक्त, चंद्रा म्हणजे नृत्यांगना... लोक कलेला एका वेगळ्या पातळीवर पोहोचवण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. गेल्या दोन वर्षांत चंद्रमुखी या चित्रपटानंही बराच संघर्ष केला आहे. माझ्या आयुष्यातला हा अंत्यंत महत्त्वाचा सिनेमा आहे.

अजय-अतुल आणि माझं नातं दैवी नातं आहे...
चंद्रमुखी या चित्रपटातील लावणी आणि गाण्यांबद्दल बोलताना अमृता अजय-अतुल या दिग्गज संगीतकार जोडीबद्दलही बोलली. अजय-अतुल  आणि माझं नातं अत्यंत दैवी नातं आहे. कारण जेव्हा मी माझ्या  आयुष्यात काही उत्कृष्ट करू पाहते, तेव्हा त्यांची साथ, त्यांचे आशीर्वाद लाभते, असं ती म्हणाली.

चंद्राचं जे  हृदय आहे ते कृष्णाचं आहे...
चंद्रमुखीतील कोणती गोष्ट आवडली असं विचारलं असता ती  म्हणाली, ‘चंद्रमुखीबद्दल बोलायचं म्हणजे आपल्याला इथं बसून अनेक तास बोलावं लागेल. चंद्रमुखीचा जो संघर्ष आहे. तिच्यामधला जो निरागसता आहे, ती मला खूप भावते. ती कुठेतरी माझ्यात आहे, असं मला वाटते. तिची कृष्णभक्ती मला भावली. चंद्राचं जे  हृदय आहे ते कृष्णाचं आहे.

Web Title: upcoming marathi movie Chandramukhi Look Amruta Khanvilkar Special Interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.