उमेश कामत आणि प्रिया बापटच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण, अभिनेत्रीनं शेअर केला रोमँटिक व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 18:23 IST2025-10-03T18:23:25+5:302025-10-03T18:23:51+5:30
अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाले आहेत.

उमेश कामत आणि प्रिया बापटच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण, अभिनेत्रीनं शेअर केला रोमँटिक व्हिडीओ
प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) हे मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपे आहे. प्रिया आणि उमेश यांची पहिली भेट २००२ मध्ये 'भेट' चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये झाली होती. त्यानंतर 'आभाळमाया' या मालिकेच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि जवळपास ८ वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी २०११ मध्ये दसऱ्याच्या दिवशी लग्न केले. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते आणि ते मराठी कलाविश्वातील एक आदर्श जोडपे मानले जाते. या जोडीच्या लग्नाला नुकतीच १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास निमित्ताने उमेशने प्रियाला खास अंदाजात शुभेच्छा दिल्यात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उमेश कामतनेप्रिया बापटला एक सुंदर फुलांचा गुलदस्ता (Bouquet) देऊन शुभेच्छा दिल्या. हा खास क्षण प्रियाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एका व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये प्रियानं लिहलं, "जेव्हा मला वाटतं की तो फारसं व्यक्त होत नाही... तेव्हाच तो असं गोड सरप्राईज देतो. माझा जगातील आवडता माणूस. दसऱ्याच्या दिवशी आजपासून १४ वर्षांपूर्वी आम्ही सात फेरे घेतले". या व्हिडीओमध्ये उमेश आणि प्रियामधील प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे.
प्रिया बापट आणि उमेश कामतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर हे क्युट कपल तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकलं आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे चाहते त्यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहाण्यासाठी उत्सुक होते आणि अखेर १२ सप्टेंबर रोजी त्यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट प्रदर्शित झाला. उमेश आणि प्रियाने आजवर अनेक चित्रपट, नाटक आणि वेब सिरीजमध्ये एकत्र काम केले आहे आणि त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री जितकी हिट आहे, तितकीच त्यांची ऑफ-स्क्रीन केमिस्ट्रीही चाहत्यांना खूप आवडते. त्यांच्या या गोड व्हिडीओमुळे चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंद पुन्हा एकदा अनुभवता आला.