कैरो चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणार ‘हाफ तिकीट’सह तीन भारतीय चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 09:57 IST2016-11-09T20:53:29+5:302016-11-10T09:57:19+5:30
इजिप्तमध्ये 15 ते 24 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या कैरो आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तीन भारतीय चित्रपट प्रदर्शित केले जाणार ...

कैरो चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणार ‘हाफ तिकीट’सह तीन भारतीय चित्रपट
मराठी चित्रपट हाफ तिकीट यापूर्वी कान्स चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला होता. कान्समध्ये या चित्रपटाची चांगलीच प्रसंशा करण्यात आली होती. दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असल्याचे मानले जात असले तरी देखील आपल्या मूळ कलाकृतीहून तो उजवा ठरला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘10 व्या आयएफएफटी चित्रपट महोत्सवात’ प्रदर्शित करण्यासाठी ‘हाफ तिकीट’ची निवड करण्यात आली आहे.
हा चित्रपट दोन भावंडाच्या भावविश्वावर आधारित असून, यात शुभम मोरे व विनायक पोतदार यांच्यासह भाऊ कदम, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, प्रियांका बोस, कैलाश वाघमारे या कलाकारांच्या भूमिका आहेत.
यासोबतच ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची देखील निवड करण्यात आली आहे. अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित या चित्रपटात वेगवेगळ्या वयाच्या चार महिलांची कथा दाखविण्यात आली आहे. यात रत्ना पाठक शाह, कोंकणा सेन शर्मा, आहना कुमरा आणि प्लाबिता बोरठाकूर यांच्या भूमिका असून, त्या आपल्या पद्धतीने जीवन जगण्याची इच्छा बाळगून आहेत. या चित्रपटाच्या शीर्षकात वापरण्यात आलेल्या ‘लिपस्टिक’ हा शब्द स्वछंद जीवन या अर्थाने घेतला आहे. नुकतेच या चित्रपटाला जपान येथील टोकियो फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या यादीतील मल्याळम भाषेतील संतोष व सतीश बाबुसेनन यांचा ‘द नॅरो पाथ’ या चित्रपटाची निवड ‘इफ्टी’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोवा फिल्म फेस्टिव्हल साठी करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. या चित्रपटात मोठा होणारा मुलगा व घरचे वातावरण, आई-वडिलांचे संबध यातून त्याने केलेली तडजोड दाखविण्यात आली आहे.