'डिलिव्हरी बॉय'च्या ट्रेलर लाँचला साजरे झाले 'डोहाळे जेवण'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 01:52 PM2024-01-30T13:52:36+5:302024-01-30T13:52:59+5:30

Delivery Boy Movie : सरोगसी हा शब्द आता आपल्याला बऱ्यापैकी परिचित झाला आहे. याच संकल्पनेवर आधारित 'डिलिव्हरी बॉय' हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

The trailer launch of 'Delivery Boy' was celebrated with 'baby shower Meal'. | 'डिलिव्हरी बॉय'च्या ट्रेलर लाँचला साजरे झाले 'डोहाळे जेवण'

'डिलिव्हरी बॉय'च्या ट्रेलर लाँचला साजरे झाले 'डोहाळे जेवण'

सरोगसी हा शब्द आता आपल्याला बऱ्यापैकी परिचित झाला आहे. याच संकल्पनेवर आधारित 'डिलिव्हरी बॉय' हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी चित्रपटातील आठ गर्भवतींच्या 'डोहाळे जेवणाचा'चा खास कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. अतिशय पारंपरिक आणि राजेशाही थाटात या डोहाळे जेवणाचा सोहळा संपन्न झाला. मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकारांसह बॅालिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनिस बाझमी, मुश्ताक खान आदी मान्यवर उपस्थित होते.

सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्कंठा प्रचंड वाढवून ठेवली होती त्यातच आता 'डिलिव्हरी बॉय'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

ट्रेलरमध्ये अंकिताला गावात एक फर्टिलिटी सेंटर काढायचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला इस्टेट एजंट असलेला प्रथमेश परब आणि पृथ्वीक प्रताप मदत करताना दिसत आहेत. परंतु हे करताना त्यांना अनेक जुगाड करावे लागत आहेत, त्यांच्या या प्रयत्नांना यश येणार की त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहाणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

''सरोगसी हा खूप नाजूक विषय आहे, पण...''

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, '' सरोगसीबद्दल आपल्याकडे अनेक गैरसमजुती आहेत, अनेक ठिकाणी आजही जुनीच विचारसरणी घेऊन लोक जगत आहेत आणि हीच विचारसरणी बदलण्याचा आम्ही या चित्रपटातून प्रयत्न केला आहे. खरंतर सरोगसी हा खूप नाजूक विषय आहे, मात्र त्याचे गांभीर्य जाऊ न देता मनोरंजनात्मकरित्या प्रेक्षकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही 'डिलिव्हरी बॉय'मधून केला आहे. अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने आम्ही हा विषय तुमच्यासमोर मांडला आहे. ही कथा तुम्हाला कधी पोट धरून हसवेल तर कधी तुमचे मन हळवे करेल. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत एकत्र पाहावा.''

Web Title: The trailer launch of 'Delivery Boy' was celebrated with 'baby shower Meal'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.