"म्हणूनच आपली लायकी असेल तेवढंच..." माफीनाम्यानंतर केडिया यांना मराठी अभिनेत्याने मारला टोमणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:25 IST2025-07-07T18:24:17+5:302025-07-07T18:25:57+5:30
सुशील केडियांच्या माफीनाम्यानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत!

"म्हणूनच आपली लायकी असेल तेवढंच..." माफीनाम्यानंतर केडिया यांना मराठी अभिनेत्याने मारला टोमणा!
Marathi Actor On Sushil Kedia: राज्यात हिंदी भाषा मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी विरोधात वक्तव्य करणाऱ्या उच्चभ्रू गुंतवणूकदार सुशील केडिया यांचे कार्यालय फोडलं. यानंतर केडीया यांनी राज ठाकरे यांची जाहीर माफी मागितली. "मी माझ्या चुकीबद्दल माफी मागतो", असं म्हणत केडिया यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट केला. यातच आता मराठी अभिनेता अभिजित केळकरनं पोस्ट शेअर करत केडीया यांना टोमणा मारला आहे.
सुशील केडिया यांनी राज ठाकरेंची माफी मागत व्हिडीओमध्ये म्हटलं की, " राज ठाकरे यांच्याबद्दल मला नेहमीच आदर, कृतज्ञता वाटत आली आहे. मी माझी चूक मी स्विकारतो. तसेच मी आता अपेक्षा करतो की वातावरण शांत करावं, मी त्यांचा आभारी आहे", असं केडिया यांनी म्हटलं. यावर अभिजितनं इन्स्टाग्रामवर केडिया यांच्या माफीनाम्याची एक स्टोरी शेअर करत लिहलं, "'म्हणूनच आपली लायकी असेल तेवढंच बोलावं. नाहीतर मग अशी माफी मागायला लागते". यासोबतच अभिनेत्यानं हसण्याचे इमोजी पोस्ट केला. अभिजित हा कायम समाजातील गंभीर मुद्द्यांवर अगदी निर्भिडपणे त्याचं मत मांडत असतो.
नेमकं काय म्हणाले होते सुशील केडिया?
मराठी आणि हिंदी असा वाद पेटल्यानंतर मीरारोड येथे एका परप्रांतीय दुकानदाराला मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर सुशील केडिया यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहून राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं. त्यात ते म्हणाले की, "मी गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता, तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की, मी मराठी शिकणार नाही. मी अशी प्रतिज्ञा करतो. क्या करना है बोल?" असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं होतं.