"आपण गेल्याच रविवारी तर भेटलो होतो, वाटलं नव्हतं...", सतिश शाह यांच्या आठवणीत सुप्रिया पिळगावकर भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:47 IST2025-10-28T11:47:01+5:302025-10-28T11:47:27+5:30
सतीश शाह यांनी निधनाच्या दोन तास आधीच सचिन पिळगावकरांना मेसेज केला होता. तर निधनाच्या काही दिवस आधीच त्यांनी पत्नीसह सुप्रिया पिळगावकर यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांना मोठा धक्का बसला आहे.

"आपण गेल्याच रविवारी तर भेटलो होतो, वाटलं नव्हतं...", सतिश शाह यांच्या आठवणीत सुप्रिया पिळगावकर भावुक
अभिनेते सतीश शाह यांचे २५ ऑक्टोबर रोजी निधन झालं. वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली एक्झिटने चाहते आणि कलाविश्वातील सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला होता. सतीश शाह यांनी निधनाच्या दोन तास आधीच सचिन पिळगावकरांना मेसेज केला होता. तर निधनाच्या काही दिवस आधीच त्यांनी पत्नीसह सुप्रिया पिळगावकर यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांना मोठा धक्का बसला आहे.
सतीश शाह यांच्या आठवणीत सुप्रिया पिळगावकर भावुक झाल्या आहेत. त्यांनी सतीश शाह आणि त्यांच्या पत्नीसोबतचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. "खूप लवकर गेलात सतीश... आपण मागच्याच रविवारी भेटलो होतो यावर विश्वास बसत नाहीये. ती आठवण माझ्याकडे कायमची राहिल यासाठी आनंदी आहे. तुमच्या प्रिय मधूवर तुम्ही कायम लक्ष ठेवाल हे मला माहीत आहे. तिच्या हसण्यात, तुमची आवडती गाणी गाण्यात आणि डान्समधून आम्हाला तुमचा सहवास कायम जाणवत राहील", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचा मृत्यू झाला. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी जेवण करत असताना ते अचानक कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यापूर्वी जूनमध्ये त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपण (Kidney Transplant) झाल्याचे वृत्त होते आणि त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत होती.