'शहाणपणा'चं सुस्साट धुमशान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 13:56 IST2016-07-12T08:26:56+5:302016-07-12T13:56:56+5:30

‘सबकुछ’ संतोष पवार अशी ओळख असलेल्या संतोष पवार यांच्या 'आलाय मोठा शहाणा या नाटकाने 25 वा  प्रयोगाचा टप्पा पार ...

Smell of wisdom! | 'शहाणपणा'चं सुस्साट धुमशान !

'शहाणपणा'चं सुस्साट धुमशान !

ong>‘सबकुछ’ संतोष पवार अशी ओळख असलेल्या संतोष पवार यांच्या 'आलाय मोठा शहाणा या नाटकाने 25 वा  प्रयोगाचा टप्पा पार केलाय.  नमुनेदार व्यक्तीरेखा, मॅड करणारी धम्माल कॉमेडी, नाटकात घडणा-या विविध घटना, विडंबनात्मक गीतं आणि धमाकेदार संगीत यामुळं हे नाटक रसिकांना अक्षरक्षा वेड लावतंय. रसिकांचं झिंगाट मनोरंजन करणा-या या नाटकाच्या निमित्ताने सिएनएक्सने संतोष पवार यांच्याशी साधलेला हा संवाद.

1) 'आलाय मोठा शहाणा' असं आपण गंमतीने म्हणतो. मात्र नाटकाचं नाव आलाय मोठा शहाणा.शीर्षकावरुनच मॅडछाप कॉमेडी वाटतेय, तर यांत कोण कोणाला शहाणा करतंय आणि कोण शहाणा ठरतंय ?

वैभव परब लिखित या नाटकाच्या शीर्षकातच त्याचं कथानक दडलंय. वर्षानुवर्षे  नववीमध्येच अडकलेल्या एका चंचल विद्यार्थिनीला दहावीची परीक्षा उत्तीर्ण करुन देण्याचं मोठं आव्हान त्या विद्यार्थिनीचे वडिल एका मास्तरावर सोपवतात.मात्र इथेच हा मास्तर स्वतःसाठी खड्डा खणून घेतो. कारण या काळात कुठल्या मुहूर्तावर आपण मास्तर झालो अशी भावना त्याच्या मनात डोकावू लागते. त्यामुळंच मग नकळतच यातील इतर कलाकारांच्या ओठावर आपसुकच 'आलाय मोठा शहाणा 'असे शब्द उमटतात.आता हा मास्तर त्या विद्यार्थिनीला एका दमात दहावी पास करुन देण्यात यशस्वी होतो का ? त्या दरम्यान कुठल्या गंमती जंमती घडतात याचं चित्रण म्हणजे 'आलाय मोठा शहाणा' हे नाटक..

2) या नाटकात रसिकांचं धम्माल मनोरंजन तर आहेच मात्र यातून एक सामाजिक संदेशही देण्यात आलाय.. त्याविषयी काय सांगाल...?

माझ्या नाटकात कॉमेडी असते.. मात्र त्या विनोदालाही काही मर्यादा असतात. माझ्या नाटकातले संवाद किंवा विनोद हे रसिकांचं मनोरंजन करतात. मग ते 'यदा कदाचित असो', 'राधा ही कावरी बावरी' असो माझ्या नाटकात कुठलाही कमरेखालचा विनोद नसतो. प्रत्येक नाटकातून मनोरंजनासह रसिकांपर्यंत काही ना काही संदेश पोहचवण्याचा प्रयत्न असतो.  'आलाय मोठा शहाणा' या नाटकातूनही ''मुलगी शिकली प्रगती झाली'' हा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय.

3) या नाटकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'जाणून बुजून' या नाटकानंतर संतोष पवार आणि आशीष पवार ही जोडी 13 वर्षांनी एक आलीय. तर याविषयी आणि नाटकाच्या कलाकारांविषयी काय सांगाल ?

'जाणूनबुजून' या नाटकानंतर तेरा वर्षांनी एकत्र काम करतोय. 'आलाय मोठा शहाणा' या नाटकाच्या निमित्ताने हा योग जुळून आलाय.बोरीवलीत एका नाटकाचं वाचन करायचंय, वेळ आहे का असा फोन एके दिवशी आशीषला केला.. तेव्हा आशीष आला आणि वाचताक्षणी त्याला ते नाटक आवडलं.. मागचा पुढचा विचार न करता त्यानं लगेच या नाटकाला होकार दिला.. या नाटकासाठी कधी सिनेमा करत असेन तर तोही बाजूला ठेवीन असंही आशिषनं सांगितलं.. या नाटकात त्यानं साकारलेला मास्तर तुम्हाला अक्षरक्षा वेड लावेल.. वरवर सरळमार्गी वाटणारा, मात्र तितकाच अतरंगी नाना कळा असलेला स्मार्ट मास्तर रसिकांना भावलाय. याशिवाय यातील अपूर्वानं साकारलेली सिंड्रेलाही तितकीच लोभस वाटेल.. एकूणच प्रत्येक कलाकारानं आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिलाय. त्यामुळं एका चांगल्या टीममुळं हे नाटक करणं अधिक सोपं गेलंय..

4)  कॉमेडी नाटक, कॉमेडी सिनेमा आणि छोट्या पडद्यावरील एखादं कॉमेडी स्कीट यांत काय फरक जाणवतो ? या तिन्ही माध्यमात आपण काम केलंय.. कोणतं माध्यम अधिक जवळचं आणि प्रभावी वाटतं..?

कलाकार हा रंगमंचावर चांगला अभिनय करु शकतो. कारण लाइव्ह प्रेक्षक त्याला बघत असतो. तिथे रिटेकची संधी नसते. जे काही केलं तेच अंतिम असतं. दररोज नवनवीन प्रयोग असतात. त्यामुळं त्याला दररोज काही तरी वेगळं करण्याची संधी मिळते.रसिकांशी कलाकाराला थेट कनेक्ट होता येतं ते फक्त नाटकांमुळंच. त्यामुळं नाटक हे अतिशय प्रभावी माध्यम असं मला वाटतं.

5)  थिएटरवर काम केलेला कलाकार कोणत्याही माध्यमात काम करु शकतो.मात्र तेच सिनेमा आणि टीव्ही कलाकार रंगभूमीवर तितक्याच ताकदीने काम करु शकतात का ?

गेल्या काही दिवसांपासून एक नवा ट्रेंड सुरु झालाय तो म्हणजे प्रसिद्ध चेह-यांना घेऊन नवनवीन नाटकं येतायत.. नाट्यरसिकही आवडत्या कलाकाराला पाहण्यासाठी नाट्यगृहात येतो.. मात्र नाटकाची मूळ कथा रसिकाला भावते का हा प्रश्नही उरतो.. नाटकांत प्रसिद्ध चेहरा असल्यामुळं ते नाटक हिट ठरतं असं मला वाटत नाही. जर असं असतं तर 'सैराट'सारखा सिनेमा इतका तुफान हिट ठरला नसता.. सैराटच्या कलाकारांनी सिद्ध केलंय की कथा हाच हिरो असतो.. मग तो सिनेमा असो किंवा मग नाटक. दोन्ही माध्यमं वेगळी असली तरी कथा चांगली असेल तर रसिकांचा प्रतिसादही मिळतोच.. माझ्या नाटकात मी नवनवीन चेहरे घेतो.. प्रसिद्ध चेह-यांना घेऊन नाटकं हिट करण्यात माझा तरी विश्वास नाही..  

6)  सध्या नाटकं खूप येतात.. रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो.. मात्र जेवढी सिनेमांची चर्चा होते. तेवढी नाटकांची होते असं वाटतं का.. जर नसेल तर कुठे खंत वाटते का ?

खरंय... नाटकं पाहिजे तशी रसिकांपर्यंत पोहचत नाहीत हा तुमचा मुद्दा पटतोय.. कारण नाटकाला लागणारं कमी बजेट, नाट्यगृहामुळे थोडा तोटा सहन करावा लागतो.. रसिकांचा प्रतिसाद नाटकांसाठी खूप खूप महत्त्वाचा आणि मोलाचा आहे.

7)  'आलाय मोठा शहाणा'नंतर संतोष पवार पुढे काय करणार ?

सध्या कॉमेडी रसिकांना पाहायला आवडतं.. धकाधकीच्या जीवनात चार क्षण आनंदाचे आणि मनोरंजानाचे रसिकांना हवे असतात.. मात्र रसिकांना हसवण्यासाठी कमरेखालचे विनोद केले जातात.. हे मुळात चुकीचं आहे.. कलाकारांची किंमत ही अभिनयावरुन कळते.. उगाच काही तरी केलं आणि हसवलं, कॉमेडी केली, अभिनय केला असं होत नाही.. त्यामुळं विनोदाच्या मर्यादा जपत नवनवीन चांगली चांगली दर्जेदार नाटकं देत राहण्याचा मानस आहे..

Web Title: Smell of wisdom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.