मराठीतील या अभिनेत्यानं यशस्वीपणे केली कर्करोगावर मात, ओळखणं झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 20:03 IST2019-07-16T20:03:09+5:302019-07-16T20:03:43+5:30
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे गेल्या डिसेंबरपासून कर्करोगाशी सामना करत आहेत.

मराठीतील या अभिनेत्यानं यशस्वीपणे केली कर्करोगावर मात, ओळखणं झालंय कठीण
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे गेल्या डिसेंबरपासून कर्करोगाशी सामना करत आहेत. औषधोपचार व किमो थेरेपी घेऊन त्यांनी कर्करोगावर यशस्वीपणे मात केली आहे आणि पुन्हा एकदा ते रंगभूमीवरून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. हिमालयाची सावली या नाटकात ते काम करताना दिसणार आहे. नुकतेच बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सर्व कलाकार मंडळी तालमीसाठी जमले होते. त्यावेळी शरद पोंक्षे यांना ओळखणं देखील कठीण झालं होतं.
कर्करोगाबद्दल सांगताना शरद पोंक्षे म्हणाले की, डिसेंबरमध्ये मला ताप येऊ लागला. दररोज संध्याकाळी मला ताप यायचा. मग कर्करोगाचं निदान झालं. कंबरेच्या भागाती गाठी तयार होऊन कॅन्सर झाला. यादरम्यान मी सोनाली बेंद्रे व इरफान खान यांच्या बातम्या वाचत होतो आणि सोशल मीडियावरील त्यांच्या पोस्ट पाहत होतो. मला सहानुभूती नको होती. म्हणून मी अलिप्त राहिलो. सहा महिने औषधोपचार व किमो थेरपी घेतल्यानंतर मी या आजारातून पूर्ण बरा झालो आणि आता पुन्हा काम करण्यासाठी सज्ज झालो आहे.
त्यांनी पुढे सांगितलं की, या आजारातून बाहेर पडण्यासाठी मला सावरकरांची मदत झाली. त्यांनी अकरा वर्षे एका छोट्या खोलीत काढली होती आणि मला तर काही महिने काढायचे होते. मी सावरकर भक्त आहे. त्याचा मला मोठा उपयोग झाला. या दरम्यान मी खूप गोष्टी, पुस्तके वाचली.
दिग्दर्शक राजेश देशपांडेने हिमालयाची सावली नाटक दिलं तेही मी वाचून काढलं. माझ्यासाठी राजेश व निर्माते गोविंद चव्हाण थांबले होते. याचा मला विशेष आनंद आहे. म्हणून मी दुप्पट उर्जेने बाहेर आलो.