Video: गायिका सावनी रवींद्रनं शेअर केला पहिल्याच वारीचा अविस्मरणीय अनुभव, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 13:24 IST2025-07-06T13:24:12+5:302025-07-06T13:24:41+5:30
सावनीने वारीचा हा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Video: गायिका सावनी रवींद्रनं शेअर केला पहिल्याच वारीचा अविस्मरणीय अनुभव, म्हणाली...
विठ्ठल, विठ्ठल, कानडा राजा पंढरीचा, हे आणि असे अनेक अभंग गात, माऊली-माऊलीचा गजर करत हजारो वारकरी पंढरीची वारी करतात. सध्या संपूर्ण महाराष्ट्र वारीच्या गजरात दुमदुमला आहे. दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे. आज रविवारी आषाढी एकादशी असून लाखो वारकरी पायी पंढरपूरात पोहचले आहेत. गायिका सावनी रवींद्र ही यंदा वारीत सहभागी झाली. पहिल्याच वारीचा अविस्मरणीय अनुभव तिने शेअर केलाय.
सावनी रवींद्रनं वारीचा हा अनुभव तिच्या व्लॉगद्वारेही शेअर केला आहे. स्वतः गाडी चालवत ती फलटण येथे गेली होती. तिने हा अनुभव सावनी रविंद्र या तिच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. नाकात नथ, केसात गजरा, डोक्यावर तुळस अशा पारंपरिक पेहरावात वारीत चालताना दिसली. तिनं वारकऱ्यांशी संवादही साधला. सावनी रवींद्रचे हे सर्व क्षण अतिशय सुंदररित्या कॅमेऱ्यात टिपले गेले आहेत.
व्हिडीओमध्ये ती म्हणते,"हा अनुभव मी शब्दांत वर्णन करु शकत नाही. हा अनुभव घेण्यासाठी एवढी वर्ष पांडुरंगानं मला वाट पाहावी लागली. जात, धर्म, ऊन, वारा, पाऊस याच्या पलीकडे जाऊन सर्व जणांचा एक ध्यास आहे. तो म्हणजे विठ्ठलाचा ध्यास. त्याच्या ध्यासापायी आपण चाललो आहोत. जय हरी कृष्ण आणि राम कृष्ण हरीचा गरज चालू आहे. मी तल्लीन झाली आहे. अलौकिक अद्भुत अशी उर्जा आहे. हा अनुभव संपूच नये अशी भावना आहे", असं सावनीनं म्हटलं. पुढे तिनं, 'हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा' हा अभंग म्हटला.