ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:55 IST2025-10-13T12:55:02+5:302025-10-13T12:55:44+5:30
Vidhyadhar Joshi And Riteish Deshmukh: मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेते विद्याधर जोशी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता रितेश देशमुखच्या दिलदार स्वभावाचा एक अत्यंत भावनिक किस्सा सांगितला आहे.

ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेते विद्याधर जोशी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता रितेश देशमुखच्या दिलदार स्वभावाचा एक अत्यंत भावनिक किस्सा सांगितला आहे. 'वेड' चित्रपटात रितेशच्या सासऱ्याची भूमिका साकारलेले विद्याधर जोशी हे फुफ्फुसाच्या गंभीर आजारामुळे रिलायन्स रुग्णालयाच्या इंटेंसिव्ह केअर युनिटमध्ये दाखल होते. त्यावेळी रितेशने त्यांची केलेली काळजी आणि मदतीमुळे ते खूप भारावून गेले आहेत.
विद्याधर जोशी यांनी अमोल परचुरेंच्या कॅचअप या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "मी रुग्णालयात अॅडमिट असल्याची बातमी रितेशला कशी मिळाली हे मला माहीत नाही. पण, त्याने स्वतः डॉक्टरांना फोन केला. इतकंच नव्हे तर तो स्वतः डॉक्टरांना भेटायला आला आणि त्यांना स्पष्टपणे सांगितले की, 'हा माझ्याकरता अत्यंत महत्त्वाचा माणूस आहे. त्याच्याकरता जे काही हवं ते करा तुम्ही, सगळी काळजी घ्या त्याची'." रितेशने दाखवलेल्या या आपुलकीमुळे विद्याधर जोशी यांचे मन भरून आले.
"हॅट्स ऑफ टू हिम.. हॅट्स ऑफ!"
याहून पुढे जाऊन रितेशने जे काही केले ते अधिक खास होते. आयसीयूमध्ये रुग्णांना मोबाईल किंवा इतर कोणतीही वस्तू घेऊन जाण्याची परवानगी नसते. मात्र, रितेशने खास परवानगी काढून, हॉस्पिटल प्रशासनाला विनंती करून विद्याधर जोशी यांना आतमध्ये 'वेड' सिनेमा दाखवला. या कृतीमुळे रितेशच्या चांगुलपणावर अक्षरशः हात जोडत विद्याधर जोशी म्हणाले, "ना मला इतकं आश्चर्य वाटतं की, इतका चांगुलपणा तो स्वतः येतो, मला सिनेमा दाखवण्याची तसदी घेतो, एवढे कष्ट घेतो तो. हॅट्स ऑफ टू हिम.. हॅट्स ऑफ!"
रितेशने दाखवलेल्या या माणुसकीमुळे विद्याधर जोशी यांनी त्याचे कौतुक केले आहे. अभिनयासोबतच रितेश देशमुख खऱ्या आयुष्यातही किती संवेदनशील आहे, याचा अनुभव यानिमित्ताने मिळाला आहे.