टीम 'दुनियादारी'ची अशीही रियुनियन.. 'दुनियादारी'चा सिक्वेल येणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 10:31 IST2017-06-15T05:01:50+5:302017-06-15T10:31:50+5:30
रुपेरी पडद्यावरील मैत्रीची गोष्ट सांगणारी दुनियादारी रसिकांना चांगलीच भावली होती. संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी या सिनेमाच्या कथेने रसिकांना अक्षरक्षा ...

टीम 'दुनियादारी'ची अशीही रियुनियन.. 'दुनियादारी'चा सिक्वेल येणार ?
र पेरी पडद्यावरील मैत्रीची गोष्ट सांगणारी दुनियादारी रसिकांना चांगलीच भावली होती. संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी या सिनेमाच्या कथेने रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं होतं. अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेता अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, उर्मिला कोठारे यांच्या अभिनयानं सिनेमा सिनेमाच्या कथेला वेगळं परिमाण मिळवून दिलं होतं. स्वप्नीलनं साकारलेला श्रेयस आणि अंकुश चौधरीनं साकारलेली डीसीपी या भूमिकेनं रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं होतं. जितेंद्र जोशीची निगेटिव्ह शेडची भूमिका तसंच सई, उर्मिलाच्या अभिनयानं सिनेमाला चारचाँद लावले. प्रत्येक कलाकाराची भूमिका रसिकांना आपलीशी वाटू लागली. सिनेमातील कलाकारांची भूमिका आणि त्याचे डायलॉग्स रसिकांच्या ओठावर आजही सहज रुळतात. त्यामुळेच की काय आता पुन्हा एकदा दुनियादारीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दुनियादारी पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. दुनियादारीच्या यशानंतर रुपेरी पडद्यावर या सिनेमाचा सिक्वेल येणार की काय याबाबत रसिकांची उत्कंठा वाढली आहे. याला निमित्त ठरला आहे एक फोटो. या फोटोमध्ये टीम दुनियादारीचं रियुनियन झाल्याचं पाहायला मिळत आहे. यांत स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, वेगळ्या लूकमधले संजय जाधव आणि अंकुश चौधरी पाहायला मिळतायत. ही टीम दुनियादारी रिअलमध्येही खूप चांगले मित्र मैत्रिण आहेत. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्यात फारसं काही वेगळं वाटणार नाही. मात्र या फोटोतील त्यांनी दिलेली पोझ आणि लूक काही तरी नक्कीच सांगतंय. या चौघांमध्ये किंवा टीम दुनियादारीमध्ये नक्कीच काही तरी शिजतंय असंही म्हटल्यास वावगं ठरु नये. दुनियादारी या सिनेमाच्या यशानंतर संजय जाधव यांचे प्यारवाली लव्हस्टोरी, गुरु, तू ही रे असं सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले होते. या प्रत्येक सिनेमात संजय जाधव यांचे लाडके स्वप्नील, सई आणि अंकुश हे कलाकार होते. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोच्या निमित्ताने दुनियादारीच्या सिक्वेलच्या चर्चांना उधाण आलंय. याबाबत या कलाकारांनी अधिकृत दुजोरा दिला नसला तरी नक्कीच काही तरी वेगळं घडणार हे नक्की !
![]()