कलाविश्वाची 'भव्यता' हरपली, नितीन चंद्रकांत देसाई अनंतात विलीन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 17:55 IST2023-08-04T17:47:15+5:302023-08-04T17:55:35+5:30
कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवले. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कलाविश्वाची 'भव्यता' हरपली, नितीन चंद्रकांत देसाई अनंतात विलीन!
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी कष्टाने उभारलेल्या कर्जतच्या ND स्टुडिओतच गळफास घेतला. चित्रपटांमध्ये डोळे दिपवणारे भव्य सेट त्यांनी उभारले पण आयुष्याचा सेट मात्र मोडला. तीन देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ आणि बहीण आहे. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. आज त्यांच्या पार्थिवावर एन.डी. स्टुडिओमध्येच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मानवंदना दिली. यावेळी कला विश्वातील अनेक कलाकारांबरोबरच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.
नितीन देसाई यांनी 'मराठी पाऊल पडते पुढे' या कार्यक्रमाच्या सेटवर आत्महत्या केली होती. त्यांनी एका चिठ्ठीत त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केली होती. या चिठ्ठीत त्यांनी लिहिले होते की, माझा अंत्यविधी सहा नंबरचा ग्राऊंड आहे, तिथे हॅलिपॅड आहे, त्या ठिकाणी व्हावा. 'जोधा अकबर' चित्रपटाच्या सेटवर नितीन देसाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंच्या पार्थिवावर एन.डी. स्टुडिओत शासकीय इतमामात अंत्यसंकार पार पडले. मधुर भांडारकर, रवी जाधव, शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी अंत्यदर्शन घेतले. तसेच राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्यासह मराठी सिनेइंडस्ट्रीतील सुबोध भावे, मानसी नाईक, निखिल साने यांनी अंत्यदर्शन घेतले.
दरम्यान नितीन देसाई यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यांच्यावर बऱ्याच कोटींचे कर्ज होते. एनडी स्टुडिओवर कोणत्याही क्षणी जप्ती येणार होती. हे सर्व त्यांना सहन झाले नाही आणि त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला अशी माहिती समोर येत आहे.