​रामदास पाध्ये यांचे अर्धवटराव पोहोचले चीनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 16:25 IST2017-12-23T10:53:02+5:302017-12-23T16:25:01+5:30

रामदास पाध्ये यांच्या अर्धवटरावांनी नुकतीच शंभरी गाठली आहे. पण इतक्या वर्षांनंतर देखील त्यांचे मनोरंजन काही कमी झालेलं नाहीये. ही ...

Ramdas Padhye's Ardhavatrao reached China | ​रामदास पाध्ये यांचे अर्धवटराव पोहोचले चीनमध्ये

​रामदास पाध्ये यांचे अर्धवटराव पोहोचले चीनमध्ये

मदास पाध्ये यांच्या अर्धवटरावांनी नुकतीच शंभरी गाठली आहे. पण इतक्या वर्षांनंतर देखील त्यांचे मनोरंजन काही कमी झालेलं नाहीये. ही कमाल पाध्ये कुटुंबाचीच म्हणावी लागेल. रामदास पाध्येंप्रमाणे आता त्यांची मुले देखील बोलक्या बाहुल्यांच्या खेळांमध्ये पारंगत झाले आहेत. आता रामदास पाध्ये, त्यांची पत्नी आणि मुले मिळून बोलक्या बाहुल्याचे खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. झपाटलेला हा मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक. या चित्रपटाचे हिंदीत डबिंग देखील करण्यात आले होते. या चित्रपटातील अर्धवटराव, तात्या विंचू आज देखील प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या अर्धवटारावाच्या मागे रामदास पाध्येच होते.
रामदास पाध्ये आणि त्यांचे कुटुंबीय भारतातील आणि भारताबाहेरील विविध भागांमध्ये बोलक्या बाहुल्यांचा खेळ करत असतात. त्यांचा अर्धवटराव जगभरात प्रसिद्ध आहे. त्यांचा अर्धवटराव नुकताच थेट चीनला पोहोचला होता. चीनच्या पाचव्या क्वांझुआ इंटरनॅशनल पपेटरी फेस्टिव्हलला अर्धवटरावने भारताचे प्रतिनिधित्व केले. रामदास पाध्ये, त्यांची पत्नी आणि मुलगा हे नुकतेच चीनच्या या फेस्टिव्हवरून परतले आहेत. चीनमध्ये देखील अर्धवटरावला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. तिथे त्यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे पाध्ये कुटुंब प्रचंड खूश आहे. तिथल्या लोकांनी पाध्ये कुटुंबाचे भरभरून कौतुक केले. चीनमधील क्वांझुआ इंटरनॅशनल पपेटरी फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म करण्याचा अनुभव खूपच चांगला असल्याचे रामदास पाध्यांचा मुलगा सत्यजीतने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सांगितले आहे. त्याने या फेस्टिव्हलचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 
मुंबई दूरदर्शन केंद्रावरून काही वर्षांपूर्वी रामदास पाध्ये यांनी ‘अर्धवटराव’ आणि ‘आवडाबाई’ या बाहुल्यांना घेऊन कार्यक्रम सादर केले होते. आज इतकी वर्षं झाली असली तरी ते कार्यक्रम आजही प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात आहेत. तसेच लिज्जत पापडच्या जाहिरातीमधील कर्रम कुर्रम लिज्जत पापड हे वाक्य आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहे. आता तर रामदास, अपर्णा आणि त्यांची दोन मुले सत्यजित आणि परीक्षित, सत्यजितची पत्नी ऋतुजा हे सगळे मिळून बोलक्या बाहुल्यांचे खेळ करून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

Web Title: Ramdas Padhye's Ardhavatrao reached China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.