प्रशांत दामले का म्हणातेय, रंगमंच तुम्हाला एनर्जी देऊ शकतो.. जाणून घ्या आमच्यासोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 10:12 IST2016-12-19T15:17:32+5:302016-12-20T10:12:22+5:30

प्रियंका लोंढे सिनेअभिनेता प्रशांत दामले म्हटलं की विनोद, हशा आणि धमाल असते. चित्रपटांच्या माध्यमातून किंवा नाटकांमधून प्रशांत दामले विविध ...

Prashant Damle says, theater can give you energy .. Learn with us | प्रशांत दामले का म्हणातेय, रंगमंच तुम्हाला एनर्जी देऊ शकतो.. जाणून घ्या आमच्यासोबत

प्रशांत दामले का म्हणातेय, रंगमंच तुम्हाला एनर्जी देऊ शकतो.. जाणून घ्या आमच्यासोबत

प्रियंका लोंढे


सिनेअभिनेता प्रशांत दामले म्हटलं की विनोद, हशा आणि धमाल असते. चित्रपटांच्या माध्यमातून किंवा नाटकांमधून प्रशांत दामले विविध विक्रम करताना दिसतात. त्यांचे ‘साखर खाल्लेला माणूस’ हे एक नवे कोरे नाटक सध्या रंगभूमी गाजवत आहे. मराठी नाटकाचा पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल होणे हे तसं दुर्मिळच. हे भाग्य मिळालेल्या या नाटकात प्रेक्षकांना त्यांचा विनोदी अभिनय पाहायला मिळतोय. या नाटकासंदर्भात प्रशांत दामले यांनी लोकमत सीएनएक्सशी मारलेल्या या गप्पा... 

साखर खाल्लेला माणूस या नाटकाविषयी काय सांगाल?
-: हे नाटक फारच वेगळे आणि धमाल आहे, असे मी नक्कीच सांगेन. नाटक पाहतानाच प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी दृष्ये यामध्ये आहेत. एकदा तुम्ही नाटक पाहायला बसलात की,  पाहताना प्रेक्षकांना मजा येणार हे मात्र नक्की. या नाटकातील प्रत्येक प्रसंग पाहताना प्रेक्षक स्वत:शी त्याला रिलेट करतील. हे आपल्या बाबतीत पण घडलंय असं प्रेक्षकांना वाटेल. त्यामुळे हे नाटक रसिकांच्या जास्त जवळचे आहे, असे मला वाटते. 

पहिल्याच दिवशी या नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल झाला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
-: प्रेक्षक नाटकावर प्रेम करतात हे पाहून मला खरंच आनंद झाला. खरंतर प्रेक्षकांची विश्वासार्हता इतकी आहे की, ते अगदी निश्चिंतपणे नाटक पाहायला येतात. नोटाबंदी असली तरी प्रेक्षकांसाठी अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले होते. त्यामुळे आजही प्रेक्षक नाटक पाहायला येतात आणि शोज हाऊसफुल्ल देखील होत आहेत. ही आमच्यासारख्या कलाकारांसाठी फार मोठी गोष्ट आहे.

ग्रामीण भागांमध्ये नाटक पोहोचत नाही असे बोलले जाते. तुमचा काय अनुभव आहे?
-: होय, मी तर ग्रामीण भागात नेहमीच नाटकांचे प्रयोग केले आहेत. प्रामुख्याने मी मराठवाड्यात जास्त दौरे केले आहेत आणि अजूनही करतोय. औरंगाबाद, नागपूर, अमरावती अशा बºयाच ठिकाणी माझ्या अनेक नाटकांचे प्रयोग झाले आहेत. 

ग्रामीण भागातील प्रेक्षकांचा नाटकांना कसा प्रतिसाद मिळतो?
-: ग्रामीण भागातील प्रेक्षकांना नाटक पाहायला निश्चितच आवडते. कारण तिकडे नाटकांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. आपल्याला वाटत असेल की गावाकडे प्रेक्षक नाटके पाहायला येत नाहीत. पण तसे बिलकुलच नाहिये. मी तर असे म्हणतो की, ग्रामीण भागातील प्रेक्षक शांतपणे नाटक पाहतात. त्यांना सर्व गोष्टींचे ज्ञान असते. 

नाटयगृहांच्या दुरवस्थेबाबत तुम्ही काय सांगाल?
-: नाट्यगृहांची अवस्था खरंच खूप वाईट आहे. खरंतर नाट्यगृहांमध्ये उत्साहवर्धक वातावरण असण्याची गरज आहे. परंतु आपल्याकडील नाट्यगृहे पाहता तिथे बिलकुलच काही सुविधा नाहीत. शिवाय प्रेक्षकांना नाटक पाहताना उत्साह येईल असे वातावरण देखील तुम्हाला नाट्यगृहांमध्ये दिसणार नाही. त्यामुळे नाट्यगृहांची ही दुरवस्था बदललीच पाहिजे.

 रंगभूमीवर नवीन येणाºया कलाकारांना तुम्ही काय सांगाल?
-: रंगमंचावर आज अनेक नवीन कलाकार येत आहेत. मी त्यांना एकच सांगू इच्छितो की, सर्वात आधी तुम्ही रंगमंचावर उभे राहताना एनर्जी घेऊन या. तुमच्या बोलण्यात जो पर्यंत एनर्जी नसते, तो पर्यंत तुम्ही रंगमंचावर १०० टक्के देऊच शकत नाही. मालिकांमधील कलाकार देखील रंगमंचावर उभे राहतात, तेव्हा त्यांनी देखील जरा वरच्या आवाजातच बोलले पाहिजे. कारण मालिकांमध्ये छातीशी माईक लावला जातो म्हणून जास्त अडचण येत नाही. परंतु रंगमंचावर असताना स्पष्ट उच्चार आणि एनर्जी घेऊनच कलाकारांनी बोलावे असे मला वाटते.

Web Title: Prashant Damle says, theater can give you energy .. Learn with us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.