देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 17:05 IST2025-09-04T17:05:26+5:302025-09-04T17:05:46+5:30
रजनीकांत यांची भेट घेण्याचा योग उपेंद्र लिमये यांच्या नशिबात आला आहे.

देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांना कोण ओळखत नाही. रजनीकांत यांचे लाखो चाहते आहेत. या ग्रेट कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीच्या या थलावयाची एकदा तरी भेट व्हावी अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा असते. मराठी अभिनेता उपेंद्र लियमेदेखील अशाच चाहत्यांपैकी एक. पण, ते रजनीकांत यांचे भाग्यवान चाहते ठरले आहेत. कारण रजनीकांत यांची भेट घेण्याचा योग उपेंद्र लिमये यांच्या नशिबात आला आहे.
नुकतंच उपेंद्र लिमयेंनी रजनीकांत यांची भेट घेतली. थलायवाला पाहून उपेंद्र लिमयेंचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रजनीकांत यांच्या सोबतचा फोटो शेअर करत त्यांनी पोस्ट लिहिली आहे. उपेंद्र लिमये यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये रजनीकांत यांना भेटण्याचा आनंद अभिनेत्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. "साक्षात दक्षिण चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय देवाची प्रत्यक्ष भेट", असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे.
उपेंद्र लिमये यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. तर सेलिब्रिटींनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. मुक्ता बर्वेने कमेंट करत "आन्ना कम्माल" असं म्हटलं आहे. तर जितेंद्र जोशीने "बापू" अशी कमेंट केली आहे. किरण गायकवाड, दिपाली सय्यद, सुयश टिळक, सिद्धार्थ बोडके यांनीही या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.