'तुझा दुरावा' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न,या कलाकारांच्या आहेत भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 08:00 IST2018-07-06T14:08:41+5:302018-07-07T08:00:00+5:30
चित्रपटाचे चित्रिकरण केरळ, हैदराबाद,आंबोली घाट,इचलकरंजी येथे वीस दिवसाचे चित्रिकरण झाले आणि उर्वरित चित्रीकरण कोकणात संपन्न होणार आहे .

'तुझा दुरावा' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न,या कलाकारांच्या आहेत भूमिका
काहीही क्षुल्लक कारणावरून वाद झाला तर एकमेकांच्या मनात हा राग राहून जातो आणि हा दुरावा वाढत जातो हाच दुराव्याचा धागा पकडून यशराज मुव्हीजच्या बॅनरखाली " तुझा दुरावा '' या चित्रपटाचा मुहूर्त चित्रिकरणाने पार पडला. मुहूर्ताचा शॉट अभिनेत्री सुरेख कुडची, स्मिता शेवाळे, अमित कल्याणकर यांच्यावर घेण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शन बाळ निकम यांनी केले आहे.
'' तुझा दुरावा '' हि कथा प्रेमिकांची आहे. प्रेमात आलेल्या समज गैरसमज मुळे आलेला दुरावा व त्यामुळे त्यांना होणारा मानसिक तणाव आणि त्याचे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना भोगायला लागलेले परिणाम यावर गंभीर भाष्य केले आहे लेखक मकरंद लिंगनूरकर यांनी. प्रेमातले आणि कुटुंबातले हे दुरावे मी जवळून पहिले आहेत, यात बरेचजण उध्वस्त झाले आहेत. पण या गंभीर विषयात थोडी सिने लिबर्टी घेऊन यातला दुरावा प्रेक्षकांना नक्की आवडेल असे लेखकांनी सांगितले. दिग्दर्शक बाळ निकम हे मराठी चित्रपटांची कर्मभूमी कोल्हापूर येथे लहानाचे मोठे झाले. चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना त्यांनी जवळून पहिले आहे. या दिग्गजांकडून सहाय्यक म्हणून काम करतांना खूप शिकायला मिळाले. बरेच अल्बम व बऱ्याच चित्रपटांना मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या विषयावर काही चित्रपट आलेही असतील, पण मकरंदचा हा विषय खूप वेगळा आहे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडला आहे. चित्रपटांत एकूण पांच गाणी आहेत. गीतकार बाबासाहेब सौदागर यांच्या या गीतांना तेलगू चित्रपटांचे संगीतकार श्रीधर अत्रयाव यांनी चार व अच्युत ठाकूर यांनी एका गाण्याला संगीत दिले आहे. हि सर्व गीते हैदराबाद येथील रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये ध्वनिमुद्रित झाली आहेत. छायाचित्रण नंदकुमार पाटील, कला दिग्दर्शक सतीश बिडकर आणि सतीश पाटील यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पहिले आहे.
'तुझा दुरावा' या चित्रपटात सुरेखा कुडची, स्मिता शेवाळे, अमित कल्याणकर यांच्या मुख्य भूमिका असून सोबत चंद्रकांत शेडगे, महम्मद रफिक मांगुरे, शमा जमादार, राजू कुंभार, भाऊसो केटकाळे, सुनील चव्हाण, पी. बी.कोळी, उदय शिरोडकर, दगडू माने यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाचे चित्रिकरण केरळ, हैदराबाद, आंबोली घाट, इचलकरंजी येथे वीस दिवसाचे चित्रिकरण झाले आणि उर्वरित चित्रीकरण कोकणात संपन्न होणार आहे .