भाषा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 08:35 AM2021-01-31T08:35:45+5:302021-01-31T08:36:02+5:30

भाषेला गृहीत धरतो आपण. खरंय आणि ते. म्हणजे जन्मलेलं प्रत्येक बाळ हे बोलणारंच असतं. ऐकत-ऐकत भाषा रूळत जाते जिभेवर. ती कुठे शिकायची असते? इतपत असतात आपले विचार. आणि त्यात चूक, बरोबर काहीही नाही. कारण जे जगण्यातून सहज आणि मुबलक मिळत जातं, त्याला गृहीतच धरतो आपण. आई, प्राणवायू आणि आपली भाषा. या तीन गोष्टींच्या इतकं आपण गृहीत कशालाच धरत नसू कदाचित. पण तूर्तास भाषेविषयी...

Language ... | भाषा...

भाषा...

googlenewsNext

षा आवडतात. शिकण्याची आस होती. संधी मिळाली म्हणून शिकले. त्यात बऱ्यापैकी प्रावीण्य मिळालं आणि ज्या देशात ही भाषा बोलली जाते. तिथे जाऊन पोहोचले. नोकरीसाठी. देश होता जपान, आणि भाषा अर्थातच जपानी. हे सगळं इतकं साधं आणि सरळपणे घडलं. मग तिथं जगताना या भाषेनं खूप हात दिला. मोठी बहीण असावी जणू. ही असते भाषा. जी नकळतपणे जगण्याला आधार देते. मला आठवतंय. एका दाट जंगलात आम्ही हरवलो होतो. कोणीच नव्हतं तिथं. मग असंच अंदाजानं चालत गेल्यावर एक घर लागलं. त्या अंगणात एक आजोबा खुरपत बसलेले. आत्ममग्न. किंचित हसले. हरवलेल्यांमध्ये त्यांची भाषा येणारी मी एकटीच होते. मग जाऊन विचारलं त्यांना, तर तीन तीनदा रस्ता समजावून सांगितला त्यांनी. तरी त्यांच्या मनात आम्ही नक्की पोहोचू की नाही ही दाट काळजी उरून 
राहिली. सांगण्यातून तर सापडलीच, पण काळजीचं काजळ लावलेल्या डोळ्यांमधून ती उतरली मनात. हे जे काही होतं ती असते भाषा. मनांना जोडणारी तार जणू.
एकदा एकटीच फिरत होते. दाटून आलेला हिवाळ्यातला अंधार. जो डोळ्यांमधून वाहू लागला. पण अंतर तर पार करायचंच होतं. अस्फूट काही तेव्हा मग उमटलं तोंडातून. मी म्हणणाऱ्या त्या थंडीतसुद्धा समोरच्याला ते ऐकू गेलं आणि मग पाय वळले, कॉफी प्यायला. आणि समोरच्याने अगदी साखर घालून चमचा कॉफीत ढवळावा इतक्या सहज माझा एकटेपणा वाटून घेतला. त्यानंतर ती संध्याकाळ अचानक उबदार होऊन गेली. इथं फक्त संवादाचं साधन म्हणून उरत नाही भाषा. खूप काही तुटलं असताना जोडत जाते, भाषा. एकाकीपणात साथ देते, भाषा. कधी कंटाळवाण्या, नीरस उन्हात सावली होते. तर कधी थंडगार रात्री सोबतीचा कंदील होते, भाषा. तो प्रकाश उजळून टाकतो तो क्षण आणि आयुष्यही. तो प्रकाशच मग होते भाषा.
शब्दच ते. कधी व्यर्थ वाटतात. कधी सार्थ वाटतात. कधी आर्त हाका मारत आपले आप्त होतात. हे सगळे अनुभव? देते ती असते भाषा. भाषेच्या अनुषंगाने एकुणातच जगण्याचा असा तळातून विचार करताना वाटतं आपण जगलेलं, बरंच काही भोगलेलं, काय असतं? अनुभव? शिकवणारा काही. जाताना मग तो आपल्याला आत्मभान देऊन जातो. का ते फक्त जगणं असतं? आपापलं. आणि हे सगळं उमटत असतं? ज्या मनात, त्यात? मनाची मग कोणती असते भाषा? तिची कोणती लिपी? किती असतात मुळाक्षरं त्यात? भाषेमध्येसुद्धा लिंग, वचन, शब्दांच्या जाती असतील का? निदान ती तरी लिंगनिरपेक्ष 
असावी.
बऱ्याचदा मनाची स्पंदनं ही मौनातून मोजली जातात. म्हणजे असा दंडक नाही. पण एक मापदंड मात्र जरूर आहे. मग प्रश्न पडतो की माणसाच्या मनाला भावणारं तरल, सूक्ष्म असं काही भाषेच्या कक्षेबाहेरचं असतं का? भाषा काय फक्त ठसठशीत, ठळक, गडदच व्यक्त करते? मला असं वाटत नाही. मौनाचे राग असतील आणि ते जरूर आळवावेत आपण. पण शब्दांमधून व्यक्त होणंसुद्धा वाटतं तितकं वरवरचं आणि उथळ नक्कीच नाही. शेवटी तुमच्यापाशी असलेल्या अनुभवांच्या आडात काय आहे दडलेलं ते महत्त्वाचं. आता त्या आडातून पोहऱ्यात येताना ते पाणी कधी डचमळतं, खळबळतं. सांडतंसुद्धा. तळ ढवळून निघतोच मनाचा. पण वर जे पोहऱ्यात येतं ते नितळ आणि निवळशंख असतं, पाण्यासारखं किंवा पाणीच ते. म्हणून माझ्या मते जाणिवेतून नेणिवेकडे नेणारा आणि परत नेणिवेकडून जाणिवेकडे पोचतं करतानाचा पूल होते भाषा. त्यामुळे तो पक्का, मजबूत आणि टिकाऊ असणं किती गरजेचं.
तरीही अजून भाषा म्हणजे नक्की काय? हा प्रश्न उरतोच कदाचित. पण प्रत्येक प्रश्नाला उत्तर नाही. आणि ते नसतंच हे जी सांगते ती असते, भाषा.  

एकच एक भाषा बोलणाऱ्या देशात अनेकदा मन रमत नाही. मग आपलीच मातृभाषा हरवतेय की काय अशी चिंता वाटत असताना अचानक, ‘अरे बापरे! किती महाग?’ असं आपल्याच भाषेतलं बोललेलं काही अचानकपणे ऐकू येतं तेव्हा जे वाटतं ती असते भाषा. दिलासा. नजरेतून, स्पर्शातून आणि शब्दांमधून दिला जातो. त्या शब्दांनासुद्धा आपण किती गृहीत धरतो, तो 
भाग आता वेगळा.

 

Web Title: Language ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी