“जेव्हा ते ‘आई कुठे काय करते’च्या शूटला यायचे...”, जयंत सावरकर यांच्या निधनानंतर संजना भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 01:29 PM2023-07-24T13:29:44+5:302023-07-24T13:30:30+5:30

जयंत सावरकर यांच्या निधनानंतर रुपाली भोसले भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली...

jayant sawarkar passes away aai kuthe kay karte fame rupali bhosale shared emotional post | “जेव्हा ते ‘आई कुठे काय करते’च्या शूटला यायचे...”, जयंत सावरकर यांच्या निधनानंतर संजना भावुक

“जेव्हा ते ‘आई कुठे काय करते’च्या शूटला यायचे...”, जयंत सावरकर यांच्या निधनानंतर संजना भावुक

googlenewsNext

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांतही काम केलं होतं. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री रुपाली भोसले हिने सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.

जयंत सावरकर यांनी नाटक व मालिकांमध्येही काम केलं होतं. छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या मालिकेतही ते दिसले होते. रुपाली भोसलेने या मालिकेतील भागाचा एक व्हिडिओ शेअर करत जयंत सावरकर यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. “ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांचे निधन...आण्णा, भावपूर्ण श्रद्धांजली...जेव्हा जेव्हा ते आई कुठे काय करतेच्या शूटला यायचे...तेव्हा तेव्हा ते आम्हा सगळ्यांना खूप आशीर्वाद आणि सकारात्मकता द्यायचे. मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांना नमस्कार केला. त्यांनी खूप आशीर्वाद तर दिलेच, पण त्याचबरोबर माझ्या कामाचं खूप कौतुकही केलं. आपली मालिका आणि काम ते बघतात हे ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि जबाबदारी वाढली याची जाणीव झाली. अण्णा, आम्हा सगळ्या कलाकारांना तुम्ही खूप काही दिलं, खूप शिकवलंही. तुम्ही शेवटपर्यंत त्याच एनर्जीने काम करत होतात. म्हणून तुमच्यासोबत केलेला हा सीन पोस्ट करतेय”, असं म्हणत रुपालीने भावुक पोस्ट शेअर केली आहे.

जयंत सावरकर आधी रंगभूमी आणि नंतर दूरचित्रवाणी आणि कालांतराने चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून घराघरात पोहचले. जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे १९३६ रोजी झाला. विसाव्या वर्षी, म्हणजे १९५५पासून चेहऱ्याला रंग लावून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीची बरीच वर्षे ते ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम करत होते. प्रारंभी हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी छोटी मोठी कामे केली आणि नंतर साहित्य संघाच्या नाट्यशाखेत कार्यरत असताना त्यांनी नाटकांत काम करण्याची मिळालेली संधी सोडली नाही. 

‘एकच प्याला’तील तळीराम, ‘तुझे आहे तुजपाशी’ मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या. रंगभूमीवरील कलावंतांसाठी आजही दंतकथा असलेले केशवराव दाते, मा. दत्ताराम, मामा पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य सावरकर यांना लाभले. आजच्या आघाडीच्या चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम आदींच्या दिग्दर्शनाखालीही सावरकरांना रंगमंचावर वावरण्याची संधी मिळाली. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, ययाति आणि देवयानी, याही नाटकांमधून सावरकरांनी छाप पाडली. ते नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते. ते मूळचे गिरगावकर आणि नुकतेच ठाण्यात वास्तव्यास आले होते.  मे २०२३ मध्ये अंबरनाथ फिल्म फेस्टिवलमध्ये जीवन गौरव पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.

 

Web Title: jayant sawarkar passes away aai kuthe kay karte fame rupali bhosale shared emotional post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.