गौतमी पाटील लवकरच झळकणार 'घुंगरु'मध्ये, सिनेमातील लावणी भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 19:12 IST2023-02-08T19:12:38+5:302023-02-08T19:12:58+5:30
Gautami Patil: गौतमी पाटीलच्या आगामी सिनेमातील 'मी करते तुम्हाला मुजरा' लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

गौतमी पाटील लवकरच झळकणार 'घुंगरु'मध्ये, सिनेमातील लावणी भेटीला
सोशल मीडिया सेन्सेशन आणि 'लावणी क्वीन' गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या चर्चेत आहे. आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ केल्यानंतर रुपेरी पडदा गाजवायला गौतमी पाटील सज्ज झाली आहे. गौतमी 'घुंगरु' (Ghungroo) या सिनेमातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. या चित्रपटातील पहिली लावणी आता प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'मी करते तुम्हाला मुजरा' (Me Karte Tumhala Mujra) असे या लावणीचे नाव आहे.
गौतमी पाटीलची 'मी करते तुम्हाला मुजरा' ही लावणी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र काही मंडळींकडून या लावणीवर आक्षेप घेतला जात आहे. आक्षेपार्ह डान्स स्टेप्स केल्यामुळे गौतमी गेल्या काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. आता 'मी करते तुम्हाला मुजरा' या लावणीमुळे गौतमी चर्चेत आहे.
'मी करते तुम्हाला मुजरा' या लावणीतील ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि गौतमी हिच्या दिलखेचक अदांनी चाहते घायाळ झाले आहेत. साजशृंगार आणि सौंदर्याची नजाकत पाहण्याजोगी आहे. या गाण्यातील गौतमीचा लूक खूप लक्षवेधी आहे. पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी, त्याला लाल रंगाची जरीची काठ, साज, केसात गजरा, नथा अशा लूकमध्ये ती पाहायला मिळते आहे.
'मी करते तुम्हाला मुजरा' ही लावणी साईनाथ पाटोळे आणि मारुती सोनू यांनी लिहिली आहे. वैष्णवी आदोडेने ही लावणी गायली आहे. तर महेंद्र बनसोडेने गौतमीची लावणी कोरिओग्राफ केली आहे. सिनेमातील या लावणीत तमाशाचा फड दाखवण्यात आला आहे. गौतमी पाटीलचा 'घुंगरु' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सोलापूर, मढ, हंपीसह परदेशातदेखील झालं आहे. या सिनेमात गौतमी बाबा गायकवाडसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.