'सायकल' आणि 'न्यूड' सिनेमाने मिळवली मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टीव्हलमध्ये एंट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 18:16 IST2018-07-09T17:19:21+5:302018-07-09T18:16:22+5:30
10 ते 22 ऑगस्ट दरम्यान ‘इनक्लूजन’ थीम अंतर्गत फेस्टिव्हलचा शुभारंभ होणार आहे.

'सायकल' आणि 'न्यूड' सिनेमाने मिळवली मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टीव्हलमध्ये एंट्री
इंडियन फिल्म फेस्टीव्हल ऑफ मेलबर्न (आयएफएफएम) सध्या नववे वर्ष साजरे करत असून 10 ते 22 ऑगस्ट दरम्यान ‘इनक्लूजन’ थीम अंतर्गत फेस्टिव्हलचा शुभारंभ होणार आहे. हे फेस्टिव्हल मल्टी-अवॉर्ड विनिंग आहे. दरवर्षी हे फेस्टिव्हल ऑस्ट्रेलियन आणि उपखंडातील प्रेक्षकांना वेगवेगळ्या भाषांमधील विविधांगी भारतीय सिनेमा पाहण्याची संधी उपलब्ध करून देते.
महाराष्ट्रातून, समीक्षकांनी दोन फिल्म्सची निवड केली असून यंदाच्या फेस्टीव्हलमध्ये त्या सादर करण्यात येतील. प्रकाश कुंटे दिग्दर्शित 'सायकल' ही एका सायकल-वेड्या माणसाची कथा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील हे कथानक आहे. यंदाच्या कान्स फेस्टीव्हलमध्ये देखील हा सिनेमा दाखवण्यात आला होता. ज्यात ऋषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम यांच्या मुख्य भूमिका होत्या. या फिल्मने यावर्षीच्या 65व्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये बेस्ट कॉस्च्युम डिझाईनकरिता पुरस्कार पटकावला होता.
न्यूड(चित्र), ही 'बालक पालक' आणि 'नटरंग' फेम दिग्दर्शक रवी जाधव यांची फिल्म नवऱ्याने टाकलेल्या बाईची कथा उलगडते. ही बाई मुंबईला येते आणि खर्च चालवण्यासाठी न्यूड मॉडेल बनते व आपल्या 12 वर्षाच्या मुलाचे पालनपोषण करते. या सिनेमाने यंदाच्या 65व्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये बेस्ट फिचर फिल्म इन मराठी म्हणून बाजी मारली होती.