आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
By देवेंद्र जाधव | Updated: May 13, 2025 13:25 IST2025-05-13T13:25:04+5:302025-05-13T13:25:53+5:30
प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने बायकोसोबत रत्नागिरीतील गावी एका सांस्कृतिक कार्यक्रमात खास डान्स केलाय. या डान्सच्या फोटो आणि व्हिडीओची चर्चा आहे (sushant shelar)

आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
मराठी मनोरंजन विश्वातील एका लोकप्रिय अभिनेता सुशांत शेलारच्या (sushant shelar) खास परफॉर्मन्सची चर्चा आहे. सुशांतने त्याची पत्नी साक्षीसोबत (sakshi shelar) त्याच्या गावी सांस्कृतिक कार्यक्रमात डान्स केला. या डान्सचं अनेकांनी कौतुक केलंय. अनेकांना सुशांत आणि साक्षीचे डान्सचे व्हिडीओ पाहून असं वाटलं की, या दोघांनी पुन्हा एकदा लग्न केलंय. तर तसं नाही. सुशांत आणि साक्षीने गावातील सांस्कृतिक कार्यक्रमात एकमेकांच्या साथीने खास परफॉर्मन्स दिला, त्याची चर्चा आहे.
सुशांत - साक्षीचा डान्स परफॉर्मन्स
सुशांतने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ पाहून सुशांत आणि साक्षीने पुन्हा एकदा एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली अशी चर्चा आहे. पण लोकमत फिल्मीशी बोलताना सुशांतने या चर्चा खोडून काढल्या. सुशांत म्हणाला की, श्रीवर्धान सोमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा नुकताच रत्नागिरी जिल्ह्यातील गावात पार पडला. त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम थाटामाटात झाला. आमच्या डान्सचं नृत्यदिग्दर्शन अश्विनी देवेंद्र शेलार यांनी केलं होतं. या डान्समध्ये सुशांत शेलार आणि साक्षी शेलार नवरा-नवरी म्हणून सहभागी झाले होते."
सुशांतने शेअर केले व्हिडीओ
सुशांत शेलारने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसतं की, सुरुवातीला सुशांत आणि साक्षीला त्यांचे नातेवाईक लग्नस्थळी आणतात. दोघांची खास वरात दिसते. सुशांत-साक्षीने मुंडावळ्या बांधल्या असतात. सुशांत नाचतच येतो. साक्षीने हिरव्या - लाल रंगाची साडी नेसलेली दिसतेय. तर सुशांतने डोक्यावर टोपी, शर्ट आणि जॅकेट असा खास पोशाख केलेला दिसतोय. त्यानंतर सुशांतने साथीदारांसोबत खास कोळी नृत्यही केलेलं दिसलं. पुढे सुशांत आणि साक्षी एकमेकांना वरमाला घालतात. आणि फटाक्यांची आतषबाजी होत दोघांचं लग्न संपन्न होतं. खास कोळी गीतांवर सुशांत-साक्षीने हा परफॉर्मन्स दिला आहे.