राहुल देशपांडे यांची सुमधूर आवाजात भक्तीमय 'अभंगवारी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:33 IST2025-07-01T11:33:01+5:302025-07-01T11:33:24+5:30
Rahul Deshpande : पंढरपूरला निघालेल्या वारीतील वारकऱ्यांची विठ्ठलभेटीची आस एकीकडे टिपेला पोहोचलेली असतानाच मुंबईत शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील अभंगाच्या सरींत रसिक न्हाऊन निघाले.

राहुल देशपांडे यांची सुमधूर आवाजात भक्तीमय 'अभंगवारी'
पंढरपूरला निघालेल्या वारीतील वारकऱ्यांची विठ्ठलभेटीची आस एकीकडे टिपेला पोहोचलेली असतानाच मुंबईत शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांच्या आवाजातील अभंगाच्या सरींत रसिक न्हाऊन निघाले. 'वसंतोत्सव' आयोजित अभंगवारी हा कार्यक्रम श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती ऑडिटोरियम येथे पार पडला.
राहुल यांच्या 'वसंतोत्सव' या कल्पनेअंतर्गत 'अभंगवारी' हा अभंग व भक्तीगीतांचा कार्यक्रम भारतातील अकरा शहरांतून साजरा होत आहे, त्यातील मुंबईतील हे पुष्प होते. विठ्ठलाच्या गजराने कार्यक्रमाची सुरुवात करीत 'सुंदर ते ध्यान...', 'पंढरीचा वास...', 'वैष्णवांचा जथा...' यांसारखे अभंग आलापी व मुरक्यांसह गात वातावरण भक्तिमय केले. पांडुरंगाला आळवणाऱ्या संतश्रेष्ठ तुकाराम, नामदेव आदींच्या वाणीतून व पद्याविष्कारांतून साकारलेल्या अभंगाच्या व भक्तीगीतांच्या लड्या उलगडत राहुल यांनी रसिकांना आध्यात्मिक अनुभूती दिली. विशेषत: 'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल...', 'बोलावा विठ्ठल...', 'अबीर गुलाल...' अशा अनेक अभंगांतून व भक्तीगीतांतून श्रद्धा व भक्ती यांचा मेळ साधला. सुगी ग्रुपने आयोजित केलेल्या अभंगवारीच्या अंतिम चरणी 'कानडा राजा पंढरीचा...' या अभंगातून विठ्ठलाच्या नामगजरात श्रोत्यांना सामावून घेत कार्यक्रम समेवर नेला व रसिकांना मंत्रमुग्ध केले.
सुगीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय भागीदार निशांत देशमुख म्हणाले की, ख्यातकीर्त गायक राहुल देशपांडे यांच्या उत्कट सुरांवटींतून सजलेला 'अभंगवारी' हा कार्यक्रम श्रद्धा व भक्तीचा संगम साधत श्रोत्यांना आपल्या सुसंपन्न आध्यात्मिक वारशाचा अनुभव व उर्जा देणारा ठेवा आहे. या कार्यक्रमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे आपल्या सांस्कृतिक व सामाजिक जाणीवा प्रगल्भ आहेत हे अधोरेखित होते. कला व सांस्कृतिक अभिरुची जपण्याचा व संवर्धनाचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो व हा कार्यक्रमही त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे.